ही धरा गात आहे ...

ही धरा गात आहे - गगन हे गात आहे
आज वाटे, विश्व सारे - मजसवे गात आहे ।ध्रु।

खोडकर ह्या कळ्यांचे - पदर बघती उडाया
अन् फुलांचीहि हृदये - लागती धडधडाया
ऋतु वसंतहि मनोहर - सुस्वरे गात आहे ।१।
आज वाटे, विश्व सारे - मजसवे गात आहे

मस्तकी पर्वतांच्या - विहरती मेघमाला
प्रीतिचा काळ बहुधा - वाटते जवळ आला
हृदयही आज गाणे - प्रीतिचे गात आहे ।२।
आज वाटे, विश्व सारे - मजसवे गात आहे

वाट कोणी चुकूनी कन्यका गोजिरीशी
वा कुणी येथ येवो सुंदरी लाजरीशी
ज्या स्थळी नवयुवक हा कूजने गात आहे ।३।
आज वाटे, विश्व सारे - मजसवे गात आहे

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

१. ह्या कडव्याचे भाषांतर करताना जरा जास्तच स्वातंत्र्य घेतलेले आहे

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )