वाटायचे उडणार नाही पण उडाला शेवटी
हा पिंजरा जाळून पक्षी मुक्त झाला शेवटी
मी उत्तरे देऊनही शकलेच झाली शेकडो
वेताळ आयुष्या तुझा खोटा निघाला शेवटी
आल्या क्षणापासून मी रमलो मरेपर्यंत पण
कळलेच नाही मी इथे होतो कशाला शेवटी?
दिसताच तू मी खिन्न होतो हे जरा विसरून जा
वाटायचे ते वाटते ना माणसाला शेवटी?
सांगू नको म्हणतेस तू हेही खरे आहे म्हणा
पण सांग ना सांगायचे मीही कुणाला शेवटी?
असतो सकाळी एक मी, असतो दुपारी वेगळा
भलताच कोणी टेकतो डोके उशाला शेवटी
अगदी खुली नसली तरी वेणी तुझी सुटली जरा
काही म्हणा मुद्दा तुझ्या लक्षात आला शेवटी
'मी चांगला नाही' कुणी म्हणणार नाही वाटले
हाही म्हणाला शेवटी, तोही म्हणाला शेवटी
सुरुवात आहे तोवरी पाणी वगैरे चालुदे
मी 'बेफिकिर' होईन मग नुसतीच घाला शेवटी