निरोप

रंग गहिरे भावनांचे चाललो घेऊन मी
मोजक्या त्या आठवांना घेतले बांधून मी


सोबती काही सुखाचे घेतले क्षण वेचुनी
ठेवली बाकी उधारी दप्तरी मांडून मी


या घरातुन न्यायची ना चीजवस्तू एकही
टाकले सारे तुझ्यावर आज ओवाळून मी


पाहिले ऋतुरंग सारे चेहऱ्यावर मी तुझ्या
शेष उडले रंग, शिशिरा गोठलो साहून मी


वाढले अंतर मनांचे, खोलवर गेला तडा
सांधता भिंती घराच्या, भंगलो आतून मी


काय उरले, काय गळले, मोजणे आता पुरे
मेळ जन्माचा जमेना, पाहिला मांडून मी