मृगेंद्रकटी७... तडिद्दृष्टी८... गडे तू कंबुकंठी९
प्रिये अत्यंत अससी... जीवघेणी ।१०
तुझे कच की... ग आषाढी... घनांची होत दाटी
प्रिये अत्यंत अससी... जीवघेणी ॥ध्रु॥
शरीर नितळ... असे कि अचल... शके न कटाक्ष राहू१
उरी धडके... चमकते हे... तुझे पाहून बाहू
झुले धरणी, ... पडे चरणी ... जिथे तारुण्य अवघे२
तिथे मज सांग ... तुजवर ना ... कसा मी लुब्ध होऊ?३
हृदयस्पंदन... ग घे ऐकुन ... कधी येऊन निकटी ।१।
प्रिये अत्यंत अससी... जीवघेणी
बघे त्याच्या... ग हृदयाचा... कसा न चुकेल ठोका?
तुझा संकेत ... ज्यास घडे ... बसे निष्क्रीय तो का?
परी मन्मन ... तुझेच स्मरण ... करील विलोपताही४
प्रिये माझी... न प्रीत कधी... तुला देईल धोका
सुटायाच्या... न ह्या माझ्या... कधी रेशीमगाठी५ ।२।६
प्रिये अत्यंत अससी... जीवघेणी
पर्याय :
७. मृगेंद्रकटी = सिंहाच्या कंबरेसारखी बारीक कंबर असलेली (मृगेंद्र = सिंह) मृगारिकटी किंवा षपिंगकटी असेही चालेल किंवा साधी 'ग सिंहकटी' असेही चालेल पण सलामीलाच भरीचा 'ग' नको म्हणून ते टाळले.
८. तडिद्दृष्टी = तडित् + दृष्टी = विजेसारखी दृष्टी असलेली
९. कंबुकंठी = शंखासारखी मान असलेली
१०. शब्दशः :
प्रिये ग कमी न कल्पांताहुनी तू
१. ..... नजर शकते न राहू
२. शब्दशः ... तारुण्यसृष्टी
३. ... मी कसा ना लुब्ध होऊ ... हे म्हणायला सोपे जाईल, पण अंतर्यमके बिघडतात.
४. अनेक पर्याय :
परी मन्मन... तुझेच स्मरण... करील दुभंगताही
परी मन्मन... असे कि स्मरेल तुज जे भंगताही
परी भंगूनही तुजला स्मरेल असेच मन्मन
जरी भंगे... स्मरे तुज गे... असे माझे असे मन
५.
न सोडीन मी ... ग निष्ठेच्या ... कधी रेशीमगाठी ।२।
६.ह्या कडव्याच्या शेवटच्या दोन ओळींचा क्रम भाषांतरात बदललेला आहे.
मूळ क्रमाने भाषांतर :
परी मजसवे ... नसेल तुला... प्रिये तक्रार काही
असे मन्मन... असे कि स्मरेल तुज भंगे जरी का
टीपा :
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल आणि अंतर्यमके : चाल : लगागागा लगागागा लगागागा लगागा (वियद्गंगा पण शेवटचा गा गाळून) मूळ गाण्याचीच ! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
मूळ गाण्यात गीतकाराने बऱ्याच ठिकाणी लगागागा लगागागा ह्या तुकड्यांच्या शेवटी अंतर्यमके साधलेली आहेत (निदान स्वरांची तरी). मी भाषांतरात अशी अंतर्यमके (निदान स्वरांची) सगळीकडे जमवण्याचे शिवधनुष्य उचललेले आहे अंतर्यमकांची जागा अधोरेखित केलेली आहे.
लगागागा मधल्या ल च्या जागी भाषांतरात एक दोन ठिकाणी ग असे अगं अशा अर्थी वापरलेले आहे. ते नको वाटत असेल तर ते तेथे किंचित थांबून गाळता येते.
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... टी किंवा ठी असे जमवा बरका! यमकाची जागा ठळक केलेली आहेच.
अंतर्यमके जुळवता आली तर फारच छान अंतर्यमकांची जागा अधोरेखित केलेली आहे