कोणाच्या काय इच्छा असतील काही सांगता येत नाही.
माझ्या बाबतीतही हे खरे
आहे. माझी ही अशीच एक जगावेगळी इच्छा होती की माझा हात प्लॅस्टर व्हावा. इतर
लोकांनी हाताला बांधलेले ते प्लॅस्टर बघून मला त्यांचा फार हेवा वाटायचा.
त्यावर बनवलेली नक्षी, लोकांच्या सह्या, मेसेजेस सगळे काही मला हवे हवे से
वाटायचे. शेवटी देवाने माझे ऐकले आणि माझी इच्छा पूर्णं झाली.
ही तेंव्हाची गोष्ट आहे जेंव्हा मी महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाला होतो
आणी एका कंपनीत काम करत होतो. त्यादिवशी काही कंपनीच्या कामानिमित्त मी
बॅंकेत चाललो होतो. साधारण दुपारची ३-४ ची वेळ होती. काम संपेपर्यंत ५.३०
वाजले असते आणी मग घरी जायचीच वेळच येते. त्यामुळे माझ्यासाठी आजचा दिवस
संपल्यातच जमा होता.
दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे माझ्या गाडीचा
वेग जरा जास्तीच होता. माझ्या पुढे सहा सिटर होती. बऱ्याच वेळेला प्रयत्न
करून पण मला पुढे जायला जागा मिळत नव्हती त्यामुळे मी जरा वैतागलेलाच
होतो. शेवटी मी गाडीचा वेग अजून वाढवला आणी सहा सिटरच्या अगदी जवळ
पोहोचलो. आता कुठल्याही क्षणी मी उजवीकडे वळून पुढे जाणार होतो. एवढ्यात,
ती डुक्कर रिक्षा एकदमच डावीकडे वळली आणी मी समोर बघतो तर काय..!! एक
म्हैस आडवी उभी होती. तो आपला सहा-सिटर वाला शेवटच्या क्षणी वळला, मी एकदम
मागेच असल्याने आधी मला ती म्हैस दिसली नाही, आणि दिसली तेव्हा खूप ऊशीर झाला होता. मी पुरता
गोंधळून गेलो आणी सरळ त्या म्हशीवर जाऊन आपटलो. माझी गाडी एका बाजूला पडली
आणी मी त्या म्हशीच्या अंगावरून पलीकडे जाऊन पडलो. पडताना, त्या म्हशीच्या
अंगावर बसलेल्या कावळ्यालाही आपटलो.
थोड्याच वेळात आजूबाजूला गर्दी जमली. मला फार काही लागले नव्हते, थोडेसे
खरचटले होते हाताला एवढेच. त्यात एक बाई मला उपदेश पाजत होती, सावकाश
चालवायची, आजकालचे युवक वगैरे. तिने विचारले, "लागले का?" पण माझे
लक्ष नाही गेले आणी मी गाडी उचलून जाऊ लागलो, तशी लगेच म्हणाली, "काय
उर्मट आहे, उत्तर पण देत नाही वगैरे."
त्यानंतर मी काम वगैरे संपवून कंपनीत परतलो. आता हात जरा
सुजल्यासारखा वाटत होता. म्हणून प्रथमोपचार मधून थोडी औषधे घेतली आणि घरी
गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र चांगला ठणका लागला. अंगठ्याचे हाड आणी
हात खूप सुजले होते. थोड्यावेळ गरम पाण्याने शेकला,
हळद आणि सांबराचे शिंग उगाळून लावले तरी काही फरक पडेना. शेवटी
दवाखान्याचा रस्ता धरला. गाडी चालवणे अशक्य झाले होते म्हणून मित्राच्या
मागे बसून गेलो.
दवाखान्यात नंबर लावून बसलो होतो तेवढ्यात आतून कुणाची तरी किंकाळी
ऐकू
आली. मला मित्र म्हणत होता डॉक्टर हळूच हात घेतील हातात, जरा गोंजारतील
आणी एकदम हिसका देतील. बहुतेक हाडावर हाड चढले असेल,ते सरळ होईल.
त्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला. आत गेलो आणि झालेही
तसेच. डॉक ने
हात हातात घेऊन गोंजारायला सुरुवात केली. मी जाम घाबरलो आणि आधीच ओरडायला
लागलो. शेवटी x-ray काढण्यात आला आणि बोटाचे हाड थोडेसे तुटले आहे असे
लक्षात आले. डॉक ने मला तो x-ray समजावुन वगैरे सांगितला, पण मी
मुख्य गोष्ट ऐकण्यासाठी अधीर झालो होतो. शेवटी जे मला अपेक्षित होते ते
सांगीतलेच, की २-३ आठवडे, हाताला प्लॅस्टरघालावे लागेल.
माझ्या आनंदाला पारावार राहीला नाही. मी अक्षरशः त्यांचे आभार मानले.
त्यांनाही प्रथम काही कळेना, मी आभार का मानतोय याचे. पण मग मी त्यांना
सगळे सांगितले. यथावकाश हाताला प्लॅस्टर घातले गेले, मी माझी पूर्णं
कल्पनाशक्ती लढवून ते सजवले, मित्रांच्या सह्या, म्हशीचे चित्र, स्टीकर्स,
कविता,
फोन नंबर्स आणि बरेच काही.
शेवटी अश्या रीतीने माझी इच्छा पूर्णं झाली. आजही, थंडीमध्ये हातातुन कळ आली की त्या म्हशीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
हम्मा SSSSSSS !!