गेल्या वर्षी चौदा जुलैला सर्वसाक्षींनी लिहीलेला 'हमारे बाद अब मेहफिल में' हा लेख वाचला आणि वाटले की आता मदनमोहन यांच्यावर नवीन काय लिहीणार? खरोखर असे वाटते की काही लिहू नये. मदनजींच्या गाण्याची एखादी कॅसेट किंवा सीडी लावावी आणि शांत बसून रहावे. लता, तलत, गजल आणि मेलडी या चार स्तूपांवर उभं रहाणारं संगीतशिल्प नुसतं बघत बसावं. संगीतातल्या साऱ्या क्लिष्ट, तांत्रिक बाबी, घराणेशाही, शास्त्रीय संगीताची तालीम घेण्यावरून जन्मलेले वाद- सगळं सगळं विसरून जावं. मदनमोहन नावाच्या राजकुमाराबरोबर त्याच्याच परीकथेमधल्या संगीतविश्वात अथांगपणे भटकत रहावं!
पण मदनमोहन हा हिंदी चित्रपटविश्वातला नुसता राजकुमार नव्हता, तर कपाळावर चिरंतन भळभळती जखम बाळगणारा अश्वत्थामा होता. दुःखाचे अतीव काटेरी टोक बऱ्याचदा मानवी क्रियाशीलतेचा परमोच्च उत्कर्षबिंदू गाठून जाते. उण्यापुऱ्या एक्कावन्न वर्षांच्या आयुष्यात मदनमोहननी हे कित्येक वेळा केले. आपल्याला इतकं कमी आयुष्य आहे हे जणू माहिती असल्यासारखे ते अभिजात संगीताची जाणकारी पूर्वजन्मातूनच घेऊन आले होते की काय कुणास ठाऊक! कुठल्याही उस्तादाचा गंडा न बांधता मदनमोहन यांनी बागेश्री, नंद आणि भीमपलासी सारख्या सुपरिचित रागांपासून ( अनुक्रमे 'हमसे आया न गया' 'तू जहाँ जहाँ चलेगा' आणि 'नैनोमें बदरा छाये') चारुकेशीसारख्या त्या मानाने कमी परिचित असलेल्या रागात ( 'बैंया ना धरो') आणि ठुमरीच्या अंगाने जाणाऱ्या सुरावटीत ('माई री') अगदी सहजपणानं रचना केल्या. मग नौशादसारखे संगीताचे कदरदान म्हणाले की तुमची 'आपकी नजरोंने समझा' ही एक रचना द्या आणि बदल्यात माझ्या सगळ्या रचना घेऊन टाका. ओ.पी. नय्यरसारखा लताविषयी फारसं चांगलं मत नसणारा माणूस म्हणाला की देवानं लताच्या सुरासाठी तुमच्याकडून या रचना करवून घेतल्या की तुमच्या या रचनांसाठी लताचा आवाज तयार केला हे सांगणं मुष्कील आहे. बडे गुलाम अली खाँ रियाज थांबवून शागिर्दांना म्हणाले की ते रस्त्यावरून 'कदर जाने ना' चे सूर येतायत, ते ऐका. रियाज काय, आपल्याला नंतरही करता येईल. गुलजार म्हणाले की जसे शायरीत गालिब उस्ताद होते, तसे संगीतात मदनजी उस्ताद होते!
दुसऱ्याला चांगलं म्हणणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे, असं लोकांनी मानायला सुरुवात करण्याआधीचा जमाना होता तो. मदनमोहन तर काय, अमीर खाँ साहेबांनी गायलेल्या 'झनक झनक पायल बाजे' या अडाण्यातल्या रचनेबद्दल संगीतकार वसंत देसाई यांना आणि 'अल्ला तेरो नाम' या भजनाबद्दल संगीतकार जयदेव यांना जाहीरपणे सलाम करणारा माणूस. 'हर फनकार का जजबाती होना जरूरी है' असं काहीसं अव्यवहारी मत बाळगणारा माणूस. 'हाऊ कॅन यू कंपोज इफ यू डोंट ड्रिंक?' असा प्रश्न पडलेला माणूस. मग या कठोर दिसणाऱ्या पण मनस्वी हळव्या संगीतकाराची स्पर्धा आणि पैसा यांच्या बाजारात ससेहोलपट झाली यात नवल ते काय? त्यांचे वादक पळवण्यापासून त्यांना एकही पारितोषिक न मिळू देण्यापर्यंत सगळ्या खेळी खेळून झाल्या. मदनमोहनना यातलं काहीच कळत नव्हतं. ते आपले संगीतकारानं सुमधूर संगीत द्यावं या मताला चिकटून राहिले. हे सगळं असह्य झालं तेंव्हा शराबमधे स्वतःला बुडवून जयदेवसारख्या जवळच्या मित्राच्या खांद्यावर 'यार, मजा नही आ रहा है, जिंदगी में मजा नही आ रहा है' असे म्हणत ढसढसा रडले आणि शेवटी ' अब कोई भी तमन्ना नही, अब यहाँ हमको जीना नहीं, जिंदगी तेरे जाम से , एक कतरा भी पीना नहीं' असे म्हणून निघून गेले!
आता त्यांच्या उरल्या सुरल्या चालीवरून बांधलेल्या 'वीर झरा' च्या कॅसेटस तुफानी खपतात, त्यांच्या पुण्यतिथीला होणाऱ्या त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाची तिकीटे हातोहात खपतात, मदनजींवर उसासून बोलणं हे उच्च अभिरुचीचं लक्षण समजलं जातं. जगाचा न्यायच असा आहे!
मग अशा वेळी आठवतात ते मन्नाडेला घरी बोलावून स्वतः बनवलेलं भिंडी-मटण खिलवताना 'कौन आया मेरे मनके द्वारे' ची चाल ऐकवणारे मदनमोहन, लता मंगेशकर ध्वनीमुद्रणाला येऊ न शकल्यामुळं, सोळा वर्षे जपून ठेवलेल्या धुनीवर योग्य सिच्युएशन मिळाल्यावर बांधलेले 'नैना बरसे' स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करणारे मदनमोहन, 'दिल ढूंढता है' साठी साताआठ बिनतोड चाली बांधून गुलजारची पंचाईत करणारे मदनमोहन, 'जहांआरा' च्या वेळी तलत महमूदच्याच आवाजासाठी आग्रह धरून अजरामर गाणी देणारे मदनमोहन, सतत गाण्याची धून गुणगुणणारे, संगीताच्या मस्तीत रहाणारे मदनमोहन!
माणसानं काळाच्या बरोबर रहायला शिकलं पाहिजे. 'काळाच्या पुढं असलेला संगीतकार' हे आजकाल कुणालाही म्हटलं जातं. पण मदनजी खरोखर तसे होते. पन्नास वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घ्या. पियानो व बासरीचा अफलातून वापर करून मदनजींनी बांधलेलं 'हम प्यार में जलनेवालोंको' आठवून पहा. एखाद्या बॅले नर्तकाच्या गिरक्यांची आठवण यावी तसं वाटणारं 'शोख नजरेकी बिजलीयाँ' आठवा. केवळ व्हायोलिनच्या आर्त सुरांवर पेललेलं 'मैं ये सोचकर' आठवा, 'संदेसे आते हैं' च्या पन्नासेक वर्षं आधी बांधलेलं आणि युद्धपटातील विरहगीतांमधला शेवटचा शब्द मानलं जाणारं 'होके मजबूर मुझे' आठवा, अजूनही अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारं 'कर चले हम फिजा' आठवा--- थोडक्यात, मदनमोहन यांचं कोणतंही गाणं आठवा!
मदनजींच्या एकतीसाव्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं आपण एवढं जरी केलं तरी खूप आहे.