मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे , आलेला प्रत्यय नाही
आभास कुणा परक्याचा प्रतिबिंब होउनी भेटे
हा कोण म्हणावे माझा? तितकासा परिचय नाही
का उजाडताना अवघे अस्तित्वच गायब होते?
स्वप्नांचा अन सत्याचा अगदीच समन्वय नाही
ही कमाल झाली आता माणुसघाणा होण्याची
माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही
विरहाची वर्षे सरली , ते मीलन दूर न आता
मृत्यूला खात्री आहे , मजलाही संशय नाही
एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे , नसणेही अक्षय नाही