प्रसंग बांका होता. 'स्वदेस'ची तबकडी हातात होती. त्यावरची गायत्री जोशीची मोहक छबी खुणावत होती. मग अडचण काय? "अडचण"? पडद्यामागे नियतीमॅडम खिदळल्या. पुन्हा तो मध्ये आला होता. हो, तोच. ज्याच्या डायलॉकबाजीने हे कर्ण किटले होते, ज्याच्या एकसुरी अभिनयाने हे नेत्र विटले होते, ज्याचा मै हू ना.. नको, नकोच ती आठवण.
शेक्सपिअरसाहेब, आपण महान आहात. चारशे वर्षांनंतरही आपले शब्द आठवतात म्हणजे आपण लिहिलेले साहीत्य अभिजात की काय म्हणतात तसे असावे. टू बी ऑर नॉट टू बी? जगायचे की मरायचे? गायत्रीला बघत जगायचे की शाहरुखला बघत (तीळ-तीळ) मरायचे?
मेजरसाहेबांची ऑर्डर आल्यावर सैनिक जसे गुमान रांगा लावतात, तसेच मनाचे
विविध भाग वेगळे झाले.
भावनाप्रधान मन : विचार कसला करतोयस? अरे बघ त्या गायत्रीकडे. किती गोड दिसते ती.
मी : हो रे. चल बघूनच टाकतो. काय व्हायचे ते होऊ दे.
व्यवहारी मन : थांब. विसरलास मै हू ना? आणि त्यानंतरची प्रतिज्ञा?
मी शहारलो. मै हू ना ची जखम अजून ओली होती.
भावनाप्रधान मन : त्याचं ऐकू नकोस. अरे त्याला कोरड्या व्यवहाराशिवाय
दुसरं काही दिसलंय का आयुष्यात?
व्यवहारी मन : हा! ह्याच कोरड्या व्यवहारामुळे उत्तुंग अभिनयाची उंची दाखवणारे
कलात्मक चित्रपट बघायला मिळाले आहेत.
मी(मनातल्या मनातल्या मनात) : मरू दे ते कलात्मक चित्रपट आणि
ती अभिनयाची लांबी-रुंदी. गायत्री...
व्यवहारी मन : काय म्हणालास? मला दिसतंय की तो शेवटी तुला गोत्यात
आणणार. नंतर पश्चाताप करत माझ्याकडे येऊ नकोस.
आणि परत अशा फुसक्या प्रतिज्ञा करू नकोस.
भावनाप्रधान मन : साहेब, केलेल्या सर्व प्रतिज्ञा पाळायला तो काही महान
वगैरे नाही. दोन घटका जरा त्याला दिलासा मिळतोय नाही मिळतोय
तर आले लगेच प्रतिज्ञेची आठवण करून द्यायला.
मी : असं करू या का? मध्यंतरापर्यंत बघू मग ठरवू पुढे काय करायचे ते.
व्यवहारी मन : दीड तास शाहरुख? हे कदापि होणे नाही. एक वेळ सूर्य पश्चिमेला
उगवेल, एक वेळ..
भावनाप्रधान मन : अहो महाराज..इथे काही रायगड वगैरेचा सीन नाही चाललेला.
लागले लगेच पल्लेदार संवाद ठोकायला. कुठल्याही गोष्टीत चांगलं दिसतच नाही का हो
तुम्हाला? दीड तास शाहरुख दिसला, दीड तास गायत्री का नाही दिसली?
आणि बरं का, या चित्रपटामध्ये नासाचं वास्तववादी चित्रण आहे म्हणे.
व्यवहारी मन : हा! हिंदी चित्रपट आणि नासा? त्याला कधी अपोलो १३ ची सर
येणार आहे का?
भावनाप्रधान मन : अपोलो १३ मधे गायत्री कुठे आहे?
मी(म.म.म.): ह्यांची भांडणे नेहमीप्रमाणे जगाच्या अंतापर्यंत चालू रहाणार.
मी : जरा ऐकून घ्या, असं वादावादी करून प्रश्न सुटणार नाही.
सामोपचाराने काही तोडगा निघतोय का बघू या.
व्यवहारी मन : सामोपचार? अरे ज्याला व्यवहारच माहीत नाही त्याच्याबरोबर काय बोलायचं? आणि इथे आपलं काही ठरलं तरी एकदा त्या गायत्रीला पाहिलं की हे महाराज गेले कामातून. मग आम्ही कितीही कंठशोष केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.
भावनाप्रधान मन : असतो एखाद्याचा स्वभाव. उद्या तुमच्या दाराची बेल वाजली आणि साक्षात गायत्री गोड हसत, फुलांचा गुच्छ घेऊन आली तरी तुम्ही विचाराल, काही काम होतं का?
व्यवहारी मन : प्रश्न एका चित्रपटाचा नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही...
मधुबालासाठी भारत भूषण, आशा पारेखसाठी विश्वजीत, साधनासाठी राजेंद्रकुमार अशी सहनशक्तीची लाजिरवाणी परंपरा आपल्या वाडवडिलांपासून चालत आली आहे. ते काही नाही, ह्या अनिष्ट प्रथा थांबायलाच हव्यात.
भावनाप्रधान मन : याच्या नादी लागलास तर तुझं सगळं आयुष्य
नसिर, ओमपुरी यांना बघण्यात जाईल हे लक्षात ठेव. नो गायत्री.
व्यवहारी मन : विचार कर. त्याचं ऐकून तू एम. टी. व्ही. वर शाकिराची गाणी बघायला लागलास, अरे, त्याला काय संगीत म्हणायचं? छ्या!
भावनाप्रधान मन : बरोबर, हे संगीत त्यांच्या तथाकथित उच्च अभिरुचीत बसत नाही ना. अरे शाकिरापुढे संगीतच काय सगळं आयुष्य ओवाळून टाकलं तरी थोडं आहे.
मी(म.म.म.): ह्या दोघांचं काय करावं? हल्ली हे नेहमीचंच झालंय म्हणा. हा रविवार वाया जायला नको..
मी : मंडळी, आता वाद पुरे. आपण नाणेफेक करू. जो जिंकेल त्याचं ऐकू या.
नाणेफेक झाली. पहिल्यांदा व्य.म. जिंकला, पण जोराचा वारा होता असं भा.म.चं आणि माझं मत पडलं. म्हणून परत नाणेफेक केली आणि गायत्री.. आपलं भा.म. जिंकला. आम्ही तिघांनी मिळून स्वदेस पाहिला. व्य. म. शाहरुखच्या चक्क संयत अभिनयाने आश्चर्यचकित झाला. नंतर डुलक्या घ्यायला लागला आणि मधेच "छ्या, हा प्रसंग गांधीतून उचललाय!" असे काहीसे पुटपुटत होता. इकडे गायत्रीची एंट्री झाली आणि भा.म. ला ब्रह्म भेटले.
आता तुम्ही विचाराल, मी कुणाबरोबर होतो? अर्थात दोघांबरोबर कारण शेवटी दोघेही माझे परममित्र. पण एक गुपित सांगू का? काही वेळा भा. म. प्रभावी ठरतो, जसा इथे ठरला. मलाही कळत नव्हते असे का होते ते. म्हटले, व्य. म. लाच विचारावे, तो पठ्ठ्या नाही नाही त्या कठीण प्रश्नांची सुसंबद्ध उत्तरे शोधून काढतो. विचारले तर हसला आणि म्हणाला,
"क्या करें यार, दिल है के मानता नही."
हॅम्लेट
जाहीर माफीनामा : शाहरुखच्या समस्त पंखे-पंखिणींनो, जमणार नाही हे मला माहीत आहे पण तरीही सांगतो, हलकेच घ्या.