मराठी पुस्तकांना सोनियाचे दिस!

मनोगतावर जुन्या मराठी वाङ्मयाचे पुनरवतरण पाहत असतानाच महाराष्ट्रदिनी ही चांगली बातमी वाचायला मिळाली. सर्वांना ती समजावी आणि तिच्यावरच्या विचारांची देवाणघेवाण करणे सोयीचे पडावे ह्या उद्देशाने ती येथे उतरवून ठेवीत आहे.

मूळ बातमी : मराठी पुस्तकांना सोनियाचे दिस!
(महाराष्ट्र टाईम्स दि. १ मे २००७)

श्रीरंग गायकवाड

मराठी वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे जुनाट मराठी पुस्तकांची दुकाने आता नव्या प्रशस्त एसी शोरुम्समध्ये स्थलांतरित होत आहेत. यामुळे प्रकाशकांबरोबरच दिवाळीनंतर हातावर हात ठेवून बसणाऱ्या प्रिंटर्स, बाइंडर्स, डिटिपी व्यवसायिकांनाही काम मिळत आहे.

पाच वर्षांपूवीर् दुकान बंद करण्याचा विचार करणाऱ्या पुस्तक दुकानदारांनी पुन्हा या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. पुण्यात 'साधना मीडिया सेंटर', 'मेहता पब्लिकेशन्स', 'सरस्वती प्रकाशन', आदींनी स्वत:च्या बिल्डिंगमध्ये एैसपैस दुकाने थाटली आहेत. मुंबईत पार्ल्यातील आणि शिवाजी मंदिरातील 'मॅजेस्टिक'च्या वातानुकूलित दुकानात तरुण वाचकांची गदीर् होत आहे. कोल्हापूरमध्ये 'अक्षर पुस्तकालय', सांगलीत 'प्रसाद वितरण', अहमदनगरला 'उदय एजन्सी', नाशिकला 'कुसुमाग्रज मायबोली', या पुस्तकांच्या नव्या आकर्षक शोरुम्सनी त्या त्या शहराच्या वाचन वैभवात भर टाकली आहे. 'क्रॉसवर्ड'सारख्या मराठी पुस्तकांना नाके मुरडणाऱ्या इंग्रजी बुकमॉल्सनाही आता मराठीच्या कस्तुरीची जाणीव झाली आहे. त्यांच्या शोकेसमध्ये मराठी पुस्तके ठळकपणे दिसू लागली आहेत.

आश्चर्य म्हणजे विदर्भ, मराठवाड्यातील पुस्तक प्रदर्शनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याबाबत 'अक्षरधाराचेे' रमेश राठीवडेकर म्हणाले की, पूवीर् बीड, लातूरहून प्रदर्शन आटोपून येताना गाडीभाड्याची मारामार व्हायची. आता याच गावांमध्ये पुस्तकविक्रीतून दिवसाला २५ हजारांहून अधिक रक्कम मिळते. पुस्तक खरेदी करणाऱ्यांत ५० टक्क्यांहून अधिक महिलाच असतात. पुण्यातील २५० व्या प्रदर्शनात डॉ. नरेंद जाधव यांच्या 'आमचा बाप आन् आम्ही'च्या साडेतीन हजार प्रती २९ दिवसात संपल्या. 'मोबाइल व्हॅन'मधून नेलेली २५ हजार पुस्तके 'मृत्युंजय'कार शिवाजी सावंतांच्या आजरा गावात पुरली नाहीत!' असाच अनुभव 'मनोविकास प्रकाशनाचे' अरविंद पाटकर यांनी सांगितला. 'टीव्हीला कंटाळलेले लोक पुन्हा वाचनाकडे वळले आहेत, असे सांगत, सदानंद मोरेंचे 'लोकमान्य ते महात्मा' हे दीड हजार रुपये किंमतीचे पुस्तक महिन्याभरात संपले. विश्वास पाटलांच्या 'संभाजी'साठी लोक रांगेत तिष्ठत थांबतात; हे कशाचे लक्षण आहे? असा सवाल पाटकर यांनी केला.


वर उल्लेखलेल्यातली कुठकुठली पुस्तके आपण वाचली आहेत?

त्यातली कुठकुठली पुस्तके आपण विकत घेतली आहेत?

पुस्तकांची विक्री वाढण्याचे काय कारण असावे असे तुम्हास वाटते?