चाय गरम !!!

"चाय गरम , चाय गरम " अशी आरोळी ठोकत मळकट किटलीतून वाफ़ाळलेला चहा घेउन , इटुकले कप हिंदकळत रेल्वेच्या फ़लाटावर पळणारी मुले / माणसे हे दृश्य रेल्वेने प्रवास करण्याऱ्या बहुतेकांच्या परीचयाचे आहे. आगंतुक पाहुणे आल्यावर (आणि जेवणाची वेळ होण्याआधी कटवण्यासाठी) "काय मंडळी, चहा घेणार का ?" हा प्रश्न अगदी ठरलेला. असा हा चहा आता आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला आहे. याचा इतिहास नकीच मनोरंजक असणार यात शंका नाही. इंटरनेट वर शोध घेतल्यावर मिळालेल्या माहितीचे हे संकलन वाचकांसाठी सादर....

चहा विषयी एक आख्यायिका सांगीतली जाते ती अशी. चीन मधला शेन नुंग नावाचा राजा हा पाणी उकळुन पित असे. असे म्हणतात की याला जडी-बुटी (हर्बल) बद्दल बरीच माहिती आणि ज्ञान होते. तर त्याच्यासाठी झाडाखाली जे पिण्याचे पाणी उकळले जात होते त्यात त्या झाडाची काही पाने पडली. असे हे सुगंधित पाणी त्याने चाखले अर्थात ते झाड चहाचे होते आणि तो पहिला प्रायोगिक चहा असे नमूद केले जातेय.

पुर्वी म्हणे चहाची झाडे ३० मिटर उंच असायची. तेंव्हा पाने तोडण्यासाठी माकडांना झाडावर चढून पाने तोडुन खाली टाकण्याचे शिक्षण दिले जात असे. त्यानंतर पाने तोडणे सुलभ व्हावे यासाठी १ मिटर उंच झाडे वाढवण्यात येतात.

इंग्रजांबरोबर चहाचे आगमन भारतात झाले असे म्हणतात. यापुर्वीचे भारतात चहाचे उल्लेख आहेत म्हणे पण तो संशोधकांचा विषय आहे. सन १८२३ च्या सुमारास आसाम मधे गावठी चहा (वाइल्ड टी) ची लागवड झाली आणि १८३९ मधे भारतीय चहा लंडन मधे आणला गेला.

चहा पिणे आरोग्यदायक आहे का हानिकारक यावर बरीच मते आहेत, पण आपण बुवा चहाने येण्याऱ्या तरतरीवर खुष आहोत. चहा -मग तो टपरीवरचा असो , अमृततुल्य चा असो वा घरी केलेला वेलचीयुक्त दुधाळ चहा असो, चहाबाज मंडळी चहाचे "चहाते" आहेत आणि राहतीलच यात शंका नाही.

मॅनेजमेंट मधली मंडळी म्हणे काही समस्या चहाच्या कपाबरोबर चर्चा करत सोडवतात (over the cup of tea).

हे लिखाण चहाचे घुटके घेतानाच सुचलाय  तेंव्हा मंडळी आपलेही चहाबद्दलचे विचार कळू द्यात.

विनम्र