केव्हाही मज स्वस्थतेत जगि तू नाहीस राहू दिले

केव्हाही मज स्वस्थतेत जगि तू नाहीस राहू दिले.
घ्यावेसे जरि वाटले विषहि ते नाहीस घेऊ दिले. ।ध्रु।

चंद्राच्या बसुनी रथात निघते जेव्हा वधू यामिनी,
कासावीस तसा स्मरून मज तू होशील अंतर्मनी.
ते नाही दुसऱ्या कुणी मज दिले, जे जे मला तू दिले.
घ्यावेसे जरि वाटले विषहि ते नाहीस घेऊ दिले. ।१।

वाटे, दुःख तुझे असे जर मनी राहील रात्रंदिन,
येतो प्राण गळ्यात, वाटुन मनी, 'कंठू कसे जीवन?'
ओढीने तव वेदनेस मनिच्या ओठी न येऊ दिले
घ्यावेसे जरि वाटले विषहि ते नाहीस घेऊ दिले. ।२।

"येता मृत्यु तरी बरे", मन म्हणे, "ऐशा दुराव्याहुन."
होवो काहि नि स्वस्थतेस अपुल्या लाभो पुनर्जीवन.
आहे जो हृदयात घाव, पळही त्याने न हासू दिले.
घ्यावेसे जरि वाटले विषहि ते नाहीस घेऊ दिले. ।३।

चाल :
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक (चित्त आणि केशवसुमार ह्यांच्या सारखा आणि सासरा ह्य कवितांपासुन स्फुर्ती मिळाली! धन्यवाद.)

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेला काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

टीपा:
१ ही ओळ मनची घुसवलेली आहे. मला जाळ्यावर हे गाणे मिळाले त्यात इथली ओळ मिळाअली नाही. (स्वातंत्र्य घेतले )