दुनियादारी!

" ....अगदी सॉलिड पुस्तक आहे, लायब्ररीतून पळवून आण पण वाच(माझं ढापू नको, माझ्याकडे मागू नको!!!!) एक्दा वाचच. वेडी होशील....."
तो मला तावातावाने सांगत होता. कॉलेजमधे असताना आम्ही रोज भेटायचो. आता तो नोकरीनिमित्त कधी न ऐकलेल्या प्रदेशांच्या सफरीवर असतो सारखा. मग कधीतरी स्वारी पुण्यात अवतरली की आम्ही भेटतो. जरा मॅगी नाहीतर 'ऑफिसच्या कॅन्टीनमधे जे देतात ते' ही खाद्यपदार्थांची व्याख्या बदलते आणि ' वैशाली ' चं खरंखुरं वडा सांबार (इथे मी स्वप्नात तर नाही ना म्हणून नकळत स्वतःला एक चिमटा काढून घेते...) आणि अस्सल कॉफी (मशीनची नव्हे... खरी! गॅसवर केलेली!!) मी आधाश्यासारखी ओरपते. अशाच एका भेटीत तो मला पिळायची जुनी हौस भागवून घेत होता. बोलता बोलता विषय पुस्तकांवर आला. मी हल्ली इंग्रजी पुस्तकंच जास्त वाचते हे ऐकून तो ठसका लागेपर्यंत हसला.
 "इंग्रजीचा क्लास असतो की काय हापिसात तुझ्या?"
"गप्प बैस. बेडूक.. डुक्कर ... हिप्पोपोटॅमस कुठला.."  आमची उत्क्रांतीची साखळी त्याला ऐकवून मीही चिडल्याचं नाटक केलं.
"काय तू? इतकी वर्ष फर्गी मधे राहून तुला साध्या शिव्या पण देता येत नाहीत? इंग्रजी सोड निदान मराठी तरी...."
"बोकडा...." शेवटी मी त्याच्या राशीला आलेच...
"पांढऱ्या कॉलरला इस्त्री करून ती शिष्ठ इंग्रजी पुस्तकं वाचणं पुरे करा आता जरा. आम्ही बोकड असू पण तुम्ही मुंगीएवढ्या पण नाही झालात अजून मॅडम...."
"ए गपे. .." आता माझ्याकडचे भेसूर प्राणीही संपत आले होते.
"सभ्य आणि संस्कारक्षम अशी सगळी मराठी पुस्तकं मी वाचली आहेत आधीच. मला नको सांगूस..." आणि मी संस्कारक्षम मराठी पुस्तकांची यादी पाढा म्हणावा तशी म्हणायला सुरुवात केली.
"स्वामी, राजा शिवछत्रपती, मृत्युंजय, व्यासपर्व, राधेय, श्रीमान योगी ..."
२०-२० वर्ल्ड कप फायनल मॅचमधे पाकड्यांनी युवीला आठात गारद केला तसा माझ्या पाढ्याला पायबंद घालत तो म्हणाला
"सुशि वाचलायस? "
"होऽऽऽऽऽ...    कल्पांत, मंदार पटवर्धन, तिसारा"
"एवढंच?"
"हो...." इथे मी बुचकळ्यात. माझ्या मराठी वाचनाचा अभिमान फुग्यासारखा फुटायला आलेला.
"दुनियादारी वाचलंयस?"
"नाही... "
"सिरियल पाहून वाचायचं नाही असं ठरवलंस का?"
"नाय बा. ये किस चिडिया का नाम है?"
"कप्पाळ माझं. माझे आई, तुला जरा शहाणं करायलाच हवं आता... एवढी घोडी झालीस तरी अजून 'संस्कारक्षम' पुस्तकं वाचायला शळेत जातेस का अजून?"
त्याने माझ्यापुढे अक्षरशः दोन्ही हात जोडले होते. मीही जरा अस्वस्थ झालेच होते. हा बाबाजी मला चक्क शेंबडी म्हणत होता. त्याच दिवशी ठरलं की हे दुनियादारी प्रकरण काय आहे हे बघायचंच. एका शनिवारी मुद्दाम वेळ काढून मी लायब्ररीमधे गेले. दुनियादारीची मागणी करताना तिथली मुलगी माझ्याकडे पिंजऱ्यातलं अस्वल पाहिल्यासारखी पाहणार अशी माझी जवळजवळ खात्री होती. पण जराही शोधाशोध न करता ठामपणे म्हणाली, " ते सध्या वाचायला गेलंय.... पण तुझ्यासाठी ठेवून देते मी बाजूला..."
        पुढच्या शनिवारी  दुनियादारी घेऊन मी घरी आले. शनिवारची खास कामं आणि शनिवारी रात्री जमणारा आमचा ई-अड्डा यांच्यात मला ते पुस्तकाचं लक्षातही नव्हतं. रात्री झोपायच्या आधी सहज म्हणून मी दुनियादारी उघडलं. प्रस्तावनेनेच लक्ष वेधून घेतलं. एका काल्पनिक कॉलेजच्या कट्ट्यावरची ही एक काल्पनिक सत्यकथा आहे.... असलं काही फक्त सुशि च लिहू शकतो. सगळ्यात लक्षात राहिलं ते " विकत घेऊन, ढापून, शेअर करून आणि शक्य त्या मार्गाने दुनियादारी वाचणाऱ्या आणि तिच्या सहा आवृत्त्या हातोहात खपवणाऱ्या वाचकांना केलेलं अभिवादन ". पहिल्या पानापासून 'सुशि' टच जिकडेतिकडे जाणवत होता. पहिल्या परिच्छेदापासूनच पुस्तकाने जी पकड घेतली की बास. हे पुस्तक झपाटून टाकतं. जादू करतं. [float=font:swapnil;size:20;breadth:200;place:top;]आता कॉलेज कट्टा म्हटल्यावर ज्या काही गोष्टी मस्ट आहेत त्या सगळ्या इथे योग्य प्रमाणात आहेत. भेळ एकदम जमली आहे.[/float] (सुशि स्वतः कॉलेजमधे असताना काय चीज असेल असाही एक विचार माझ्या मनात डोकावून गेला.) श्रेयस, दिग्या, शिरीन आणि एम के या व्यक्तिरेखा विसराव्या म्हटलं तरी विसरता येणाऱ्यातल्या नाहीत. कट्ट्यावरचा इरसालपणा मात्र एकदम  ओरिजिनल आणि अस्सल!. कट्ट्यावर भेटलेले एकेक नमुने अक्षरशः महान आहेत. जिकडे तिकडे रचनाकाराचे हस्तस्पर्श ठळकपणे दिसतात. घटनांचा वेग आणि वर्णनशैली वाचणाऱ्याला एक क्षणभरसुद्धा पुस्तकातून बाहेर येऊ देत नाही. हे जग अनोखं तरीही चिरपरिचित वाटतं.   डाय हार्ड सुशि पंख्यांच्या पुस्तकावर पडणाऱ्या उड्या मला स्पष्ट दिसल्या. एका अनोख्या तरीही परिचित जगाची ही सफर अविस्मरणीय आहे. एकदा हातात घेतल्यावर पुस्तक संपेपर्यंत मी ते खाली ठेवू शकले नाही. हळूहळू मीही सुशि फॅन होणार हे मला पुरतं कळून चुकलं.
        माझी एस. पी. मधली वर्षं प्रॅक्टिकल्स, बेगर स्ट्रीट/ गर्ल्स हॉस्टेल रेक्टरांच्या रिकाम्या बंगल्यामागच्या झाडाखाली नाहीतर थेट क्लासमध्ये एवढ्याच ठिकाणी गेली. त्यामुळे " एस. पी. चा कट्टा नेमका आहे तरी कुठे? " हा प्रश्न ऐकून बाबांनी आपल्या बायफोकल चष्म्याच्या काचेवरून माझ्याकडे जरा संशयानेच पाहिलं. ही आता आपली काय फिरकी घेणार असा प्रश्न त्यांना पडला होता. शिवाय एस पी तून बाहेर पडून एवढी वर्षं झाल्यावर हा बॉम्ब मी त्यांच्यावर का टाकतेय हेही त्यांना समजलं नसावं. मी कारण सांगितल्यावर मात्र ते त्यांच्या 'कट्ट्यावर' हरवून गेले आणि मी पुन्हा एकदा पुस्तकात हरवून गेले .
        जसजसं पुस्तक पुढे सरकलं तसतसा एसपी चा सगळा चिरपरिचित परिसर डोळ्यासमोर उभा होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एखाद्या चित्रपटासारख्या घटना घडत होत्या. पण केवळ सगळा परिसर ओळखीचा आहे एवढंच त्या घटना मनाला भिडायचं कारण आहे असं काही वाटलं नाही. उनाड आणि अवखळ वाऱ्यासारखं ते कॉलेज लाईफचं 'स्पिरिट' इथे सूत्रधार म्हणून काम करत होतं. आणि सगळी मंडळी त्या स्पिरिटच्या रंगपंचमीत नखशिखान्त भिजत होती. सगळा कट्टा त्या रंगांमध्ये भिजून जात होता.  या सगळ्याचं वेगळं वर्णन मी काय करणार? त्यातून सुशिने लिहिल्यानंतर आम्ही कोण लिहिणारे...
        त्यातला टारगटपणा, मारामाऱ्या, प्रेमप्रकरणं वगरे गोष्टींमधे तसं काही नाविन्य नाही पण हे पुस्तक लिहिलं गेलं तेंव्हा त्यात सॉलिड चार्म असणार हे नक्की जाणवत होतं. श्रेयस, दिग्या, प्रीत, रीन ही  मुख्य स्टार मंडळी डोळ्यासमोर सहज उभी राहत होती. त्यांच्यात आणि आमच्यात जनरेशन गॅप नक्कीच होती पण काळी एकच्या मध्य सप्तकात गाणाऱ्यांचे आणि काळी एकला मंद्र मानून गाणाऱ्यां आमचे सूर सुपरिंपोझ होऊन तंतोतंत जुळावेत तसं काहीसं होत होतं. भाषा, फॅशन आणि विषय बदलले तरी त्यांच्यात - आमच्यात मूळ तत्त्व एकच आहे हे जाणवत होतं. अर्थात पुढच्या पिढीला  मागची पिढी नेहमीच शामळू वाटते त्याला मीही अपवाद नाही. पण एका अनिर्बंध वयातले ते मनस्वी दिवस पिढीला बांधील नाहीत. आमच्या कट्ट्याच्या जागा वेगळ्या असतील आणि 'कडक' वाटणारी, भक्ती करण्याची ठिकाणं वेगळी असतील पण वय तेच होतं. दुनियादारी म्हणजे ते वय चाफ्याच्या फुलांच्या घरी केलेल्या अत्तरासारखं बाटलीत भरून ठेवलंय की काय असं वाटलं मला. त्यातल्या अनेक गोष्टी मला पटल्या नसतील पण तरीही पुस्तक मात्र मनापासून पटलं.
        या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते एखाद्या वर्तुळासारखं आहे. कुठल्याही पानापासून वाचायला सुरुवात केली तरी आपल्याला अचूक धागे लागत जातात. हे सुशि चं जग पुस्तकाच्या पानांच्या  द्विमितीत राहतच नाही. बघता बघता ते आपल्या मनातलं गजबजलेलं गाव होऊन जातं. डोळ्यासमोर दिसायला लागतं.   ' अलका ' पासून मंडईपर्यंतच्या त्या चिरपरिचित परिसरात पुन्हा एकदा भ्रमंती करून आल्यावर मला पुन्हा एकदा ताजंतवानं झाल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं. सुशि ची ही अजब दुनिया आणि त्याची तितकीच अजब दुनियादारी वाचणाऱ्या प्रत्येकाच्या भूतकाळातल्या एका लाडक्या दुनियेला नकळत स्पर्श करून जाते. तरुणाईच्या उड्या पडण्यासाठी आणखी काय हवं?
        अर्थात मला शेवट फारसा आवडला नाही आणि पिढीतल्या अंतरामुळे असेल कदाचित पण प्रेमभंगाबद्दल इतका गळा काढण्यासारखं त्यात काही असावं असं मला वाटलं नाही. शेवटचं आकाशाचं रूपक मात्र ' टचिंग '. तरीसुद्धा प्रेम आणि प्रेमभंग ही इतकी गळा काढण्याची आणि टिपं गाळायची गोष्ट नाही असं पुन्हा पुन्हा वाटून गेलं. अर्थात कॉलेजवरच्या कादंबरीमध्ये प्रेमकथा नाहीत म्हणजे केमिस्ट्री प्रॅक्टिकलमधून टायट्रेशन काढून टाकणं किंवा सी प्लस प्लस च्या अभ्यासक्रमातून vtbl वगळण्यासारखं आहे हेही पटल्यामुळे इन स्पाईट ऑफ ऑल दॅट पुस्तक जाम आवडून गेलं हे मात्र खरं. आमच्या पिढीने अनेक प्रेमप्रकरणं पाहिली, जपली, फुलवली आणि क्षुल्लक कारणांवरून मोडतानाही पाहिली. पण कुठेही या दुःखाचं प्रदर्शन करावं किंवा त्याबद्दल फिल्मी पद्धतीने शोक व्यक्त करावा असं आम्हाला वाटलं नाही. याचा अर्थ आम्हाला दुःखच झालं नाही असा निश्चितच नाही पण माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये तरी ते दुःख स्बीकारून पुढे जाण्याचा शहाणपणा आहे म्हणूनही हा भाग मला इतका पटला नसेल. हेच बहुधा पिढीचं अंतर आहे.  पण जाता जाता माझ्या आई - बाबा - काका - मामा - मावशी - आत्यांच्या पिढीचं कॉलेज लाईफ जवळून बघितल्याचा सूक्ष्म आनंदही नक्कीच मिळाला.
        नोकरीत सत्तेचे गुलाम होताना आपल्या हातून सर्वपथम हे बेडर, बेफिकीर वय हिरावून घेतलं जातं ही जाणीव अस्वस्थ करून गेली. पुस्तक वाचायला लागलेले तीन - साडेतीन तास आणि गमावलेली रात्रभराची झोप सत्कारणी लागल्यासारखी वाटली. त्या धुंदीतच संगणक सुरू केला आणि बोलण्याच्या खिडकीत त्या मित्राला शोधायचा खूप प्रयत्न केला. इतक्या अपरात्री(!) मी रेघेवर आलेली बघून बऱ्याच इतर मित्रमैत्रिणींनी चिंता व्यक्त केली पण हातातून कायमच्या निसटून गेलेल्या त्या वेड्या वयासारखाच तोही कुठेतरी निसटला आहे बहुतेक.  आता कधीतरी माझा शिळा झालेला निरोप वाचून तो मला फोन करेल. मग आम्ही पूर्वीच्याच जिव्हाळ्याने गप्पादेखिल मारू. अर्थात या वेळी त्याचा उद्धार करण्यासाठी मला ऍनिमल किंगडमवर अवलंबून रहावं लागणार नाही याबद्दल मला खात्री आहे. आठवून आठवून (अर्थातच फुल्यांसहित) सुशिने शिकवलेली लाखोली मी त्याला वाहणारच आहे. पण पुस्तक वाचून झाल्याझाल्या मला त्याला जे काही उत्कटतेने सांगावंसं वाटलं होतं ती ऊर्मी त्या संवादात असेल का? मला ठाऊक नाही.
--अदिती
(१९ नोव्हेंबर २००७,
कार्तिक शुद्ध ९ शके १९२९)