घटस्फोट घेणे हे निसर्गाविरुद्ध जात आहे! ... शास्त्रज्ञ सांगताहेत.

घटस्फोटात पतिपत्नी एकमेकांविरुद्ध तर जातातच पण तसे करून त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी राहणे हे निसर्गाविरुद्धही जात असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आलेले आहे!

अमेरिकेतच नाही तर चीनसारख्या विकसनशील देशातही धार्मिक बंधने असूनही घटस्फोट वाढत आहेत. त्यामुळे पाणी जागा आणि ऊर्जा ह्यांचा वापरही वाढत आहे. नवे घर बांधले की आत कमी माणसे असली तरी बांधकामाची संसाधने आणि जागा काही कमी लागत नाही. हवा तापवायला, थंड करायला इंधन लागतेच. घरात दोन माणसे असोत वा चार फ्रीज तितकीच ऊर्जा खातो. २००५ मध्ये एकट्या अमेरिकेतच घरे नांदती राहिली असती तर ७३ अब्ज किलोवॉट तास वीज आणि ६२७ अब्ज गॅलन पाणी वाचले असते. अमेरिका, ब्राझील, कोस्टा रिका, इक्वाडोर, ग्रीस, मेक्सिको द. आफ्रिका, ह्या देशांमध्ये ९८ ते २००२ दरम्यान सगळे संसार सुखाने नांदले असते, तर ७४ लक्ष घरे कमी बांधली गेली असती. घटस्फोटित घरांमुळे दरडोई ३३% जास्त खोल्या वापरल्या जाऊ लागल्या.

घटस्फोटित लोक जर पुन्हा लग्न करून राहू लागले तर ही सगळी आकडेवारी पुन्हा नांदत्या घरांशी मिळतीजुळती होऊ लागते असे दिसलेले आहे.

[float=font:dhruvB;background:ffffff;place:top;]तेव्हा ह्या समस्येवर उपाय काय? पुन्हा प्रेमात पडा! एकत्र राहणे म्हणजे शहराची वाढ कमी आणि पर्यावरणावर बोजा कमी![/float]

हे सगळे मी माझ्या मनचे सांगत नाहीये. प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनलऍकॅडमी ऑफ सायन्स च्या प्रकाशनात प्रसिद्ध झालेला युनिस यू आणि जँगो लिऊ ह्यांचा पर्यावरणावर घटस्फोटाचा प्रभाव हा शोधनिबंध वाचलात तर तुम्हाला ही ते ताडून पाहता येईल. अनेक सारण्या आणि आलेख देऊन त्यांनी आपले निष्कर्ष अतिशय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत.

हे सर्व वाचून मला असे वाटले की, घटस्फोटाकडून पुनर्मीलनाकडे जाण्याने निसर्गसंगोपनास इतकी मदत होणार असेल तर ह्याच पद्धतीने विभक्तकुटुंबपद्धतीकडून एकत्रकुटुंबपद्धतीकडे जाण्याने निसर्गसंगोपनास कितीतरी मदत होईल.

तुम्हाला काय वाटते?