महाभारत- नेत्रदीपक वास्तविकता! ( एक वैज्ञानिक दृष्टिकोन )

हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या, माझ्या या भारतवर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्येच नव्हे, तर तात्त्विक, वैज्ञानिक, ज्योतिषी, काव्य, साहित्य, कथा इत्यादी आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये महाभारत या महाकाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा असाधारण मारा म्हणा किंवा संबंधित सरकारचे उदासीन धोरण म्हणा, कदाचित भारतीयांची कमी होत जाणारी रुची म्हणा, महाभारतासारख्या "यदौछिष्टम् जगत्सर्वम्" ला भारतीय माणूस नव्हे, भारतीय रक्त विसरत आहे.

तत्पूर्वी पोट भरण्याची विद्या शिकून स्वतःला विद्वान स्वतःच म्हणवून घेणारे, पाश्चिमात्य संस्कृतीला सर्वश्रेष्ठ ठरवणारे, स्वतःच्याच वैचारिक दृष्टीला प्रमाण मानून त्याद्वारे वाटेल ते निकष काढणारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धेने किंबहुना अंधश्रद्धेने सर्व पाणी आहे तसे ग्रहण करणारे असे सर्वच लोक या अनमोल सांस्कृतिक ठेव्याच्या दुरवस्थेला जबाबदार आहेत.

वर वर्णिलेल्या पहिल्या तीनही प्रकारामध्ये मोडणारे लोक, याला सरळ सरळ "अंधश्रद्धा" संबोधतात किंवा याचा आजच्या "आय टी च्या"जगात उपयोग नाही, म्हणून झिडकारतात. मात्र, तथाकथित धर्मरक्षक संस्था, अंधश्रद्ध लोक, धर्मांध, धर्मवेडे यांची स्थिती यापेक्षाही लाजिरवाणी आहे. ते लोक याला आहे तसा स्वीकारून न समजून घेताच उहापोह माजवतात. वास्तविक बघता, महाभारत किंवा तत्संबंधित तात्त्विक विवेचन न वाचताच या सर्व लोकांनी महाभारताविषयी आपापले जाहीर मत प्रतिपादिले असते. मुळात एखाद्या गोष्टीचा गंध नसताना तिच्याविषयी उलट किंवा सुलट मत बनवण्यास, या "सो कॉल्ड" विद्वानांचे मन धजावतेच कसे? हा यक्षप्रश्न मला नेहमी सतावतो.

लोकशाहीने दिलेले "विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य"  या अधिकारांची फाजील जाणीव लोकांना झाली असावी असे देखिल मला येथे म्हणावेसे वाटत नाही.  कारण,  इतिहासाचा जाणीवपूर्वक अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की,  भारतीयांना स्वतःचे डोके चालविण्यापेक्षा, विचारशक्तीला पाजविण्यापेक्षा, "सांगी-वांगी" वरच विश्वास ठेवायला आवडतो किंवा झिडकारायला आवडतो.  स्वतः अभ्यास करायला नको.
तेव्हा, मला एक निष्कर्ष येथे काढावासा वाटतो-
                इतिहास अभ्यासून आपण एकच गोष्ट शिकतो "इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही. "

सर्वदूर नजर फिरविण्याची देखिल गरज नाही. आपल्या सभोवतालच्या लोकांचे मत जरी ऐकले तरी माणसाला ग्लानी येईल.  टी.  व्ही.  सीरिअल म्हणजे त्यांसाठी वास्तविकता.  आणि लोकांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी तयार झालेल्या या टी. व्ही. नेच महाभारताविषयी गैरसमज जनमानसामध्ये पसरविला ज्यान्वये लोक त्यापासून दूर गेले अथवा अंधश्रद्ध बनले. दोन्हीही वाईटच मात्र दुसरे अति घातक.

म्हणूनच, काही तात्त्विक विवेचने वाचून त्यातील काही निष्कर्ष मी येथे प्रकाशित करत आहे...............

१. श्री कृष्णाच्या आयुष्यामध्ये राधा नावाची कुठलीही मुलगी नव्हती.   राधा ही केवळ एक कवी कल्पना आहे.
२. महाभारतामध्ये युरेनस, नेप्च्यून, आणि प्लुटोचा देखिल उल्लेख आहे.
३. यामध्ये "टेस्ट ट्यूब बेबी, इलेक्ट्रोप्लेटिंग, केमिकल सेल" सारख्या अत्याधुनिक संशोधनाचा पूर्ण उल्लेख आहे.
४. "जेनेटिक्स(जनुके)" याबाबतीत तर पाश्चात्यांना लाजवणारे तत्त्वज्ञान समाविष्ट.
५. "द्रौपदी वस्त्रहरणाच्या" वेळी श्री कृष्णाचे शाल्व राजाशी युद्ध. ( श्री कृष्ण द्रौपदीला वस्त्र गुंडाळत होता हीदेखील कविकल्पना आहे. )

वर नमूद केलेल्या प्रत्येक निकषासाठी माझ्याजवळ प्रमाण आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी. तेव्हा याला केवळ प्रमाद न मानता या कडे
गांभीर्याने बघावे. ही सर्वांना विनंती.

आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.......