वाचका, जातोस कोठे काय की!

आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची कविता "वासना जातात कोठे, काय की!"

काय नवलाई विडंबन चालते ?
वीण कवितांची भयानक वाढते!

हात टॅल्कम पावडर आहे तुझा
पण तरीही अंग माझे खाजते

'स्वप्न आहे मी तिचे' ती सांगते
’स्वप्न’ शब्दा ’दु:’ मनोमन लावते!

भान शब्दांचे कुठे कवितेस या?
ती नको तितकी कशाला लांबते ?

मी कशाला खाजवावे सांग ना?
ते तुझे डोके, तुला लखलाभ ते!

नाव माझे आज तू गोंदून घे
लग्नही मोडेल पण टिकणार ते

ती नशा आहे तुला पिडण्यात की
त्याचसाठी लेखणी चित्कारते

तू उभा आहेस हे मी जाणतो
वोट त्यांना नोट जे देतात ते

शेर चकल्यांसारखे पाडू नको
समजणारे लोक येथे जाणते

खाज पाठीवर असावी नेमकी
पोचले नाहीत जेथे हात ते

फायदा आहे तरी बोलून का ?
रोज येथे काव्य-अडगळ वाढते

फायदा आहे तरी बोलून का ?
वस्त्र गझलेचे टराटर फाटते

तेवढे द्या काव्य कवड्यांनो मला
जेवढे डोस्क्यात माझ्या मावते

यमक, मेला, जुळवतो यमकांसवे
काय सांगू वाचकांचे हाल ते !

वाचता कुठल्या कुठे मी पोचलो
शेर उरले पाच जडजंबाळ ते

ही असो वा ती असो, उत्सूऽऽऽकता
तोकडा पोशाख केव्हा घालते !

नीट घेतो उचलुनी तिजला जरी
बादली खालीच, पाणी सांडते

भाळतो मी एकटा काव्यावरी
वाचकांचे जाउ दे, नाठाळ ते

काय, ब्रह्मानंद झाला हा कसा ?
लागली टाळी कशी जर ’ड्राय’ ते ?

वाचका, जातोस कोठे काय की !
वेळ ’भीषण’ काव्य करते ठार ते !


........................................................
 भीषण टलाटकर तथा कवी "भी"

रचनाकाल : ३०-३१ मार्च, २००९
........................................................