सखये माझ्या - ऐक जरा की

सखये माझ्या - ऐक जरा की - आर्जव माझ्या प्रीतिचे
मंदमंदसे - फुटे तांबडे - ओठावर अनुरक्तिचे।ध्रु।
सखये माझ्या ...

वारे प्रेम नि प्रीतिचे - आधी वाहतसे
बट होऊन नकार तो - गाली राहतसे
खरे ना हे गडे?
घडो मग एवढे-
हटव ती बट मुद्रेवरुनी - ग्रहण दृष्टीला दाहतसे ।१।
सखये माझ्या ...

गंध झुळुक नेते तुझा - जगता गंधाया
चोरुन ढग नेतो तुझ्या - पदराची छाया
खरे ना हे गडे?
घडो मग एवढे-
झलक किंचित मजही बघुदे - ध्यास माझाही पुरवाया ।२।
सखये माझ्या ...

पाठभेद :

१ वारे प्रेमाचे जरी/जिथे ...
२ मग बट होत नकार तो ...
३ ... अधिरता मन ना साहतसे (हे मूळ अर्थाला जास्त जवळ .... मी वर स्वातंत्र्य घेतले आहे  )
४ ... मनीषा माझी पुरवाया (हे वृत्तात नेमके बसते)

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

ध्रुवपदाची चाल -
गागागागा - गागागागा - गागागागा गाऽलगा
गागागागा - गागागागा - गागागागा गाऽलगा
कडव्याची चाल -
गागागागा गाऽलगा - गागागागागा
गागागागा गाऽलगा - गागागागागा
लगागा गालगाऽऽ
लगागा गालगाऽऽ
लगागा गागागागागा - लगागा गागागागागा

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचल्यास तेही कळवा