एक नैतिक पेचप्रसंग

मला एक प्रश्न कायम पडत आला आहे, आणि बराच विचार करूनही त्याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
आज मनोगताच्या सभासदांशी शेअर करतो आहे.

ख्रिश्चन लोकांमध्ये (Catholic) चर्चमध्ये ’कंफेशन बूथ’ म्हणून एक प्रकार असतो. तिथे जाऊन लोक आपण केलेल्या कुकर्माची/पापाची कबुली देत असतात. पलिकडे बसलेला धर्मगुरू हे सगळे ऐकत असतो.
कदाचित भूतकाळातल्या आपल्या दुष्कर्माचे त्यामुळे प्रायश्चित्त घेतल्याचे समाधान भाविकास मिळत असेल. मनावरील ओझ्याचा, दडपणाचा निचरा होत असेल. आणखी काही मानसिक फायदे त्यामुळे होत असतीलही.
आपला विषय तो नाही.

माझा प्रश्न असा आहे, की पलीकडे बसलेल्या धर्मगुरूने व्यापक समाजहितासाठी ती माहिती "लीक" करावी का?

समजा, एखादा अट्टल गुन्हेगार आहे, ज्याच्या अनेक कुकर्मामुळे तो पोलिसांना हवा आहे. तो मिळाला तर आणखी अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. अशा वेळी मिळालेली माहिती त्या पोपने पोलिसांना सांगायला हवी की नको?

एक उदाहरण पाहू- समजा, उद्या अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला, आणि ते सेंट व्हॅटिकन चर्च मध्ये कंफेशन करायला गेले, (समजायला काय हरकत आहे?) त्यांनी तिथे इराक- अफगाणिस्थान बद्दल आणि एकूणच जगाबद्दल अशी काही धक्कादायक माहिती सांगीतली, जी जगाच्या भल्यासाठी जगाला कळायलाच पाहिजे, तर तिथल्या धर्मगुरुंनी लगेच संयुक्त राष्ट्रसंघाला ती माहिती कळवायला हवी की नको?

किंवा थोडे लहान उदाहरण पाहू-
समजा, तुमचा एखादा जिवलग मित्र तुमच्या परिचयातल्या एखाद्या मुलीला फसवतो आहे, तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेतो आहे. ती बिचारी लग्नाची आस लाऊन बसली आहे. तो तुमचा मित्र असल्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आहे.
अशा वेळी तुम्ही काय कराल? मित्राची फसवणूक कराल का?

थोडक्यात-
"एखाद्याचा अतूट विश्वास/श्रद्धा आणि एखाद्या व्यक्तीचे, समाजाचे हित यात निवड करण्याची वेळ आली तर तुम्ही काय कराल? "

सर्वांच्या मताचा आदर आहेच.