संक्षेप कसे करावेत

नुकताच माझ्या महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेकडून एक वेगळा अनुभव आला. त्या संदर्भात मनात आलेले काही प्रश्न मी मनोगतींपुढे ठेवित आहे. नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी तिला हव्या असलेल्या पुस्तकांचा मागणी अर्ज तिने मला ग्रंथालयात आणून दिला. ती पुस्तके तिला शक्य तितक्या लवकर पाहिजे होती. तिने त्या मागणी अर्जात "शक्य तितक्या लवकर" अशा अर्थाने ('ऍज सून ऍज पॉसिबल' असा) विनंतीसूचक शेरा नोंदविला होता. मात्र तिचा हा शेरा संक्षिप्त शद्वांत म्हणजे "ASAP" असा होता. मला त्याचा अर्थ तिला विचारावा लागला. त्या वेळी मनात हे प्रश्न आले होते. काही माहिती, मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे.

१. संक्षेपांचे पूर्णांश जर विचारावे लागत असतील, तर त्याला संक्षेप म्हणण्यात काय अर्थ आहे? संक्षेप हे सर्वत्र समान व सहज आकलनशील असायला हवेत या गोष्टीला काहीच महत्त्व नाही का?

२‌ संक्षेप तयार करण्यासाठी काही नियम आहेत का?  या संदर्भात मला इंग्रजीतील "Std" व "STD" या संक्षेपांचे उदाहरण द्यावे वाटते. दोन्हीमध्ये किंचितशा फरकामुळे  अर्थ पूर्ण बदलला जातो. एकाचा वर्ग, इयत्ता आणि दुसऱ्याचा थेट दुरध्वनी असा अर्थ लावला जातो.

३. इंग्रजीत 'ऍज सून ऍज' हा वाक्प्रचार आहे. वाक्प्रचारांचा मराठीच्या संदर्भात संक्षेप मी तरी ऐकलेला नाही. मग वाक्प्रचारांचे संक्षेप होऊ शकतील का?

४. संक्षेप करण्यासाठी कोणत्या जातीचे ( म्हणजे नाम, क्रियापद , इ. इ. ) शब्द निवडता येतात किंवा या विषयी काही संकेत आहेत का?

५. संक्षेपांचा मराठी शब्दकोश (संक्षेप कोश)  आहे का? मी १९९६ मध्ये इंग्रजीतील 'डिक्शनरी ऑफ ऍब्रिव्हेशन्स" पाहिलेली होती.