काळानुरूप शास्त्र (आचरण) बदलणे आवश्यक आहे!

आपल्या हिंदू धर्मात असंख्य शास्त्रे आहेत. हिंदू धर्मातील जाती व पोटजातीप्रमाणे त्या त्या शास्त्राच्या आचरणात खूप विविधता दिसून येते. हि शास्त्रे जेव्हा बनवली गेली तेव्हाचा काळ, लोकसंख्या, जीवनमान, लोकांची विचार करण्याची पद्धत आजच्यापेक्षा पूर्णं निराळी होती. त्या काळी शास्त्राप्रमाणे आचरण समाजजीवनाला सहाय्यभूत ठरत असे (काही अपवाद वगळता. जसे सती जाणे, केशवपण इ. ) आजच्या २१व्या शतकात काही बाबतीत शास्त्राप्रमाणे आचरण खरेच तपासून पाहावे असे वाटते.

इथे नमुन्यादाखल शास्त्रातील काही चालीरीती मांडल्या आहेत. त्यावर मी त्यामागील कारण नमूद करत आहे. मी लिहिलेली कारणे ही सर्वस्वी शक्यता ह्या वर्गवारीत येतात. ह्याला कुठल्याही लिखित स्वरूपाचा आधार नाही. (मला तरी आढळला नाही)

१. रात्री केर काढू नये. संपत्ती जाते.

- पूर्वी विजेचे दिवे नव्हते. दिवसा सूर्यप्रकाश व रात्री मिणमिणते तेलाचे दिवे असायचे. तसेच पूर्वी संपत्ती मातीच्या मडक्यात भरून जमीत गाडून ठेवली जात असे. जर एखादा दागिना, चलन इ. जमिनीवर पडले असेल व ते आपल्या लक्षात नसेल तर केराबरोबर ते कचऱ्यात टाकले जाऊन नुकसान होऊ शकते. पण सध्याच्या जमान्यात रात्री केर काढणे गैर नाही. (मी स्वतः खूप वेळा रात्री केर काढला आहे. मला तरी संपत्तीनाशाचा अनुभव आला नाही. )

२. रात्री नखे काढू नयेत.

- वरीलप्रमाणेच प्रकाशाचे कारण. एखादे नख जमिनीवर पडले असेल तर ते कुणालातरी टोचू शकते. खास करून लहान रांगणारे बाळ अथवा मूल.

३. शनिवारी नखे काढू नयेत / केस कापू नयेत.

- शनिवार हा मारुती व शनी ह्या शक्तीच्या देवतांचा वार आहे. ह्यायोगे आपल्या शरीरातील शक्तीचे व संरक्षक अवयवांचे महत्त्व कळावे व त्यांचे योग्य ते संवर्धन व्हावे हा हेतू असावा.

४. शौचास जाऊन आल्यानंतर पाय धुवावेत.

- पूर्वी लोक झाडाझुडुपांच्या आधारे जमिनीवर शौचास बसत. नंतर घरात येताना पायाला चिकटून माती, घाण, किडे मुंग्या आत येण्याची शक्यता असते. पण आताच्या काळात चकचकीत संडास बाथरुम असताना २-२ तांबे पाणी सांडण्यात काय अर्थ आहे? (हे कदाचित वारेमाप पाणी वापरणाऱ्या लोकांना पटणार नाही. पण जिथे पाणीटंचाईमुळे भांडे भांडे भरून पाणी वाचवून वापरावे लागते त्यांचा विचार करावा.)

पण खालील गोष्टींबाबत कारण मला समजत नाही.

१. बुधवारी व शनिवारी तेल व मीठ आणू नये.
२. मीठ एकमेकाला हाताने देऊ नये. भांडण होते.
३. केरसुणी उभी / आडवी ठेवू नये.

कृपया मनोगतींनी ह्यावर आपले निखळ मत नोंदवावे. आपल्याला खरेच असे वाटते का? असे वागल्याने व काळाच्या कसोटीवर आपले शास्त्र पारखून त्यात बदल केल्याने आपला फायदा होईल की तोटा?

(कळकळीची विनंती: इथे फक्त शास्त्रावरच चर्चा व्हावी. ती कोणी निर्माण केली, त्यांचे वागणे कसे होते / आहे ह्यावर नको.)