नायिका :
मन ... जे शके न बोलू - गुपित ते मनीचे
बोलण्याची रात आली ।ध्रु।५
तनू आज लागे - जणू गीत गाया
झंकारुनी ही - करी कंप काया
झंकारुनी ही करी कंप काया
होऽऽऽ उरी प्रीतिच्या धडकत्या - धडकत्या हवेत१ अश्या
राहण्याची रात आली ।१।
मन ... जे शके न बोलू ...
दबुन आजवर जी स्वप्नऊर्मि होती
येऊन ओठी - बने वादळी ती
येऊन ओठी बने वादळी ती
होऽऽऽ प्रीतिगूज ते बहकत्या - बहकत्या कटाक्षांनी
सांगण्याची रात आली ।२।
मन... जे शके न बोलू...
नये रात संपू - विहरु केस द्यावे
मिटुन पापण्या मी - तुला आत घ्यावे
मिटुन पापण्या मी तुला आत घ्यावे
होऽऽऽ समुत्सुकपणे थरकत्या - थरकत्या प्रकाश-छायी२
राहण्याची रात आली ।३।
मन... जे शके न बोलू...
नायक :
मन ... जे शके न बोलू - गुपित ते मनीचे
बोलण्याची रात आली ।ध्रु।५
तनू आज लागे - जणू गीत गाया
झंकारुनी ही - करी कंप काया
झंकारुनी ही करी कंप काया
होऽऽऽ तुला लाभुदे कुणाच्या - थरकत्या मिठीत सुखे
राहण्याची रात आली ।१।
मन... जे शके न बोलू ...
उपवनास कोणी फुलवुनी अरेरे
फुले३ निष्ठतेची - चुरुन टाकली रे
फुले३ निष्ठतेची चुरुन टाकली रे
होऽऽऽ उधळ कस्पटे फुलांची - कि रंगीत आसमंती
राहण्याची रात आली ।२।
मन... जे शके न बोलू ...
असो. धन्य होवो तुला स्नेहमेळा
संसार आता - तुज तुझा मिळाला
संसार आता तुज तुझा मिळाला
होऽऽऽ असे सौख्य हेच मज की - तुलाही कुणास अपुले
म्हणण्याची रात आली ।३।
मन... जे शके न बोलू ...
भरू द्यात प्याले - कुणा शल्य आहे?
सुरेहुन मनाला - कमी मूल्य आहे
सुरेहुन मनाला कमी मूल्य आहे
होऽऽऽ हृदयरक्त का असेना - अनिर्बंध पीत पाजत४ ...
(राहण्याची रात आली) ।४।
मन... जे शके न बोलू ...
टीपा :
ही गाणी मला जशी ऐकू आली आणि उमजली आणि त्यांचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
पाठभेद -
१: शब्दशः :
अशा प्रीतिच्या धडकत्या - धडकत्याच आसमंती -- राहण्याची रात आली. ह्यातला 'च' टाळण्यासाठी तडजोड करावी लागली.
पर्याय २ : अशा प्रीतिने धडकत्या - धडकत्या स्थितीत अश्या -- राहण्याची रात आली.
२: मूळ शब्द 'सावल्या' असेल तर हे भाषांतर ठीक आहे. मूळ शब्द 'इच्छा' असल्यास
समुत्सुकपणे थरकत्या - थरकत्या मनीषांनी ... असा बदल करावा.
३ : शब्दशः
स्तबक निष्ठतेचे चुरुन टाकले रे
४ शब्दशः
हृदयरक्त का असेना, चला प्या, कि पीत पाजत ...
५ मूळ गाण्याच्या मात्रा
गा - गालगालगा - लगागालगा
ललगालगा - गागा
अशा आहेत. पण चालीत मध्ये वाढीव दोन मात्रा ( एक गुरू) टाकायला वाव मिळाल्यामुळे मी
गा - गालगालगागा - लगागालगागा
अशी सोपी रचना केली.
मूळ मात्रांप्रमाणे भाषांतर असे होईल :
मन.. जे न वदु शके - मनोगुपित ते
वदण्याची रात आली ।ध्रु।
आवडेल ते घ्यावे !
काही तडजोडी :
१. अनेक ठिकाणी लगागा लगागा ऐवजी गागा लगागा किंवा गालगा लगागा असे केलेले आहे. गाताना फरक जाणवत नाही.
२. मूळ गाण्यापेक्षा भाषांतराच्या ओळी छोट्या होऊ लागल्याने अनेक ठिकाणी जास्तीचे शब्द घातलेले आहेत.
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
उत्तरे :