आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजी...

आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक
रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी,
महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये
रूपांतरीत झालेले दिसतात.
आजचे बाबा हुशार आहेत, उच्चशिक्षितही आहेत.
समाजमनाचा दांडगा अभ्यास त्यांनी केलेला असतो. मानसशास्त्रही ते कोळून
प्यालेले असतात. समाजाची नाडी त्यांनी ओळखलेली असते. म्हणूनच त्यांच्या
सत्संगांना हजारो लाखोँच्या संख्येने गर्दी होते.
देव, देवता, स्वर्ग,
नरक, पाप, पुण्य, चौऱ्‍याऐँशीचा फेरा, आत्म्याचे अमरत्व, परमात्म्याशी
तादात्म्य पावणे, कुंडलिनी जागृत करणे, मोक्षप्राप्ती अशा अवैज्ञानिक,
बिनबुडाच्या संकल्पनांचा समाजाच्या अस्थिर मनावर भडीमार करीत हे बाबालोक
आपणाला शरण आल्याशिवाय तरणोपाय नाही हे पटवून देण्यात यशस्वी ठरतात. अशा या
भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन सूज्ञ व्यक्तिदेखील स्वतःची
सद्सद्विवेकबुद्धी बाबांच्या चरणी गहाण ठेवतात हीच ती खरी अंधश्रद्धा.
मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, आता मंगळावर मोहीम चालू आहे आणि दुसरीकडे मी
मी म्हणणारे सुशिक्षितसुद्धा मोक्षप्राप्तीच्या मृगजळामागे धावतांना
दिसतात. हीच ती आधुनिक अंधश्रद्धा.
एकदा का बुवाचे अनुयायी झाले की
आपल्याला सुख, समाधान, शांती मिळेल अशी शरणार्थी व्यक्तिची धारणा बनते. मग
ती बाबाच्या बुवागिरीत पुरती अडकते, भरडली जाते. ती कशी? ते पुढील
उदाहरणांवरून स्पष्ट होईल-
बांबांच्या कंपूत किँवा कळपात फक्त शिरता
येते बाहेर पडण्याचा विचार मुळापासूनच छाटला जातो.
बांबांच्या
कृपादृष्टीशिवाय तरणोपाय नाही असे बिंबवले जाते.
जीवनातील दुःखे, चिँता,
समस्या बाबांमुळे हमखास दूर होतील याची हमी हस्तकांकरवी दिली जाते.
आलेल्या
संकटाचा किंवा अडचणीचा सामना आपण नाही तर खुद्द आपले बाबाच करतील असा
विचार बळावून व्यक्ति निष्क्रिय बनते.
बांबांनी वेळोवेळी ठरवून दिलेले
साधना साहित्य त्यांच्या भांडारातूनच खरेदी करण्याची अलिखित सक्ती असते.
जपमाळा,
बाबांच्या प्रतिमा, फोटो, नेमून दिलेले ग्रंथ-पोथ्या, बाबांच्या गौरवार्थ
त्यांच्याच मठातून प्रकाशित होणारी मासिके, विशेषांक, कँसेटस्, सीडीज,
भिंतीवरची कँलेँडर्स, बाबांची छबी असलेल्या अंगठ्या, ताईत, पदके,
गळ्यातल्या माळा, वह्या,पेन इ.इ. भक्ताच्या माथी मारले जाते. ते साहित्य
खरिदण्याशिवाय पर्याय नसतो.
बांबांचा जाहीर कार्यक्रम वा सत्संग वा
दर्शन सोहळा जेथे असेल त्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावेच लागते.
अमूक
रोगावर तमूक औषध म्हणून भांडारातून दिल्या जाणाऱ्‍या गोळ्या भलेही
शेणा-मातीच्या असल्या तरी भक्त बाबांचे नाव घेऊन सेवन करतांना आढळतो.
बाबा
म्हणतील ती पूर्वदिशा असते. का? कसे? असले फालतू प्रश्न विचारून त्यांना
गोत्यात आणणाऱ्‍या भक्ताला जागीच ताकीद देण्याची तजवीज बांबांचे हस्तक करीत
असतात.
सर्व भिस्त बाबांवर सोपवून निँवातपणे अध्यात्माच्या नावाखाली
बाबांची व्यक्तिपुजा करण्याची सवय लागल्याने व्यक्ति वैचारिक मानसिक
शारीरिकदृष्ट्या पंगु बनविली जाते.
बाबांचा अनुग्रह नामांकित व्यक्तिंनी
(उदा. नेते, अभिनेते, खेळाडू इ.) घ्यावा असे जाळे हस्तकांमार्फत पसरवले
जाते. बाबांचे चरणस्पर्श करा तुम्हांला अपयश येणार नाही असे त्या
वलयांकितांना पटवून दिले जाते आणि एकदा का अशी व्यक्ति बाबांकडे आली की
प्रसारमाध्यमांना हाताशी धरून त्या बातमीचा उपयोग बाबांची प्रसिद्धी
करण्यासाठीच केला जातो. बाबांकडे नक्कीच काहीतरी अद्भूत शक्ति असल्याशिवाय
ती व्यक्ति अनुग्रह घेणार नाही अशी समाजमनाची ठाम समजूत होते आणि बाबांचा
कळप वाढीस लागतो.
काही व्यक्तिँच्या अगतिकतेचा, असहायतेचा गैरफायदा
बुवाबाबांकडून घेतला जाऊन प्रसंगी संमोहन विद्या वापरून तिचा शारीरिक
उपभोगसुद्धा घेतला जातो. बाबांना ईश्वरतुल्य मानले जात असल्याने अशी
प्रकरणे मठाच्या शयनगृहातच दडपली जातात. फार क्वचितवेळा बाहेर पडणाऱ्‍या
भानगडी म्हणजे हिमनगाचे टोक असते.
अशा अनेक प्रकाराने ही
बाबागिरी,बुवाबाजी सामान्यजनांची लूट ठरते...

बाबांच्या भजनी लागले
जाण्याची कारणे कोणती?
बहुदा ती मानसिक असतात. धावपळीच्या संघर्षमय जगात
टिकून राहण्याचा तणाव प्रत्येकाच्या मनावर असतो. त्यातून उद्भवणाऱ्‍या
चिँता, काळज्या, विवंचना ह्या मनोकायिक आजारांचे रूप घेऊन येतात. कितीही
तपासण्या केल्या तरी शारीरिक आजार सापडत नाही. अशावेळी समुपदेशनाची गरज
असते परंतु चांगले सांगणारा गोड बोलणारा कोणी भेटत नाही. पैशालाच सर्वस्व
मानणाऱ्‍या या दुनियेत हितचिँतक, मित्र, स्नेही, नातलग भेटतील म्हणता भेटत
नाहीत. त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेमुळे म्हणा किँवा पैशापाठी धावून
थकल्यामुळे म्हणा जोडीदारांमध्येही फारसा सुसंवाद होत नाही. परिणामी ताण
तणाव वाढतात. मग व्यक्ति मनःशांतीच्या शोधात बाबांपर्यँत येऊन ठेपते.
बाबांची अतिसमाधानी मुद्रा, तेजःपुंज चर्या, डोळ्यातील सुखाची शीतल चमक या
सर्वाँचा एकत्रित परिणाम म्हणून विदीर्ण मनाच्या व्यक्तिला बाबांची ओढ
लागते. बाबांचे मोहमयी दर्शन म्हणजे दुखऱ्‍या व्रणांवरचा लेप वाटतो.
त्यांची मिठास वाणी व मधुर संभाषणाची नशा हवीहवीशी वाटू लागते आणि
क्षणार्धात व्यक्ति बाबांची भक्त होते.
दडपणाखाली वावरणाऱ्‍या, न्यूनगंड
असलेल्या किँवा पारतंत्र्य सोसणाऱ्‍या व्यक्तिँना बाबांच्या सत्संग,
प्रवचनांना जाणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे किँवा स्वतःला सिद्ध करून
दाखवणे अशा प्रकारातले असते.
काहीजण खून, दरोडे, चोऱ्‍या, भ्रष्टाचार,
व्यभिचार आदी पापांचे क्षालन बाबांच्या माध्यमातून होईल अशा हेतूने
बाबांच्या भजनी लागतात.
या बुवाबाजीच्या अंधश्रद्धेला लगाम घालण्यासाठी
प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे, हरेक घटनेच्या मुळाचा चौकस नजरेने
शोध घेणे, स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे यासारखे उपाय
अंगिकारता येतील.