झुणका

  • बेसन पाव किलो
  • मध्यम कांदे सहा
  • सुके खोबरे पाऊण वाटी
  • दाण्याचे कूट अर्धी वाटी
  • लसूण पाकळ्या पंचवीस
  • आमसुले १०
  • तेल तीन पळ्या
  • फोडणीचे साहित्य
  • लोखंडी कढई
दीड तास
चार जणांना पोटभर

बेसन एक लिटर पाण्यात घालावे. गुठळ्या मोडत त्याचे एकजीव मिश्रण करावे.
आमसुले पाव लिटर पाण्यात भिजवावीत.
कांदे मध्यम कापावेत.
सुके खोबरे जाड किसणीने किसून घ्यावे.
लसूण बारीक ठेचून घ्यावी .
लोखंडी कढईत तेल धुरावेपर्यंत तापवावे.
त्यात मोहरी, ती तडतडल्यावर ज्योत बारीक करून हळद, दोन चिमटी मेथीदाणे, ते तडतडल्यावर ठेचलेली लसूण घालावी. ज्योत मोठी करावी. दहा सेकंदांनी लाल तिखट घालावे.
सर्व सारखे करून त्यात सुक्या खोबऱ्याचा कीस आणि दाण्याचे कूट घालावे. तेल सुटायला लागल्यावर कांदा घालावा आणि सारखे करावे. गरजेनुसार मीठ घालावे.
खमंग वास यायला लागल्यावर आमसुलांचे पाणी घालून सारखे करावे. ते आळायला लागल्यावर बेसनमिश्रण घालून पटापट हलवावे.
ज्योत मोठीच ठेवून हे मिश्रण शक्य तेवढे आळवावे. मग मंद आचेवर हे साधारण अर्धा तास रटरटू द्यावे. दर दोन-तीन मिनिटांनी खसखसून हलवावे, अन्यथा खाली लागते.
मग ज्योत बंद करून साध्या भांड्यात काढावे. लोखंडी कढईतच गार केल्यास कळकते.

(१) लोखंडी कढई नसल्यास साधी चालेल, पण चवीत फरक पडतो.
(२) सोबत ज्वारीची कडंगलेली भाकरी असल्यास उत्तम.