ताई, बाई, काका आणि जी

मनोगतावर आणि बहुतेक सर्व भारतीय गटांवर (याहू - गूगल ग्रुप, इत्यादी), कोणत्याही स्त्रीला ताई, बाई वगैरे विशेषण लावले जाते, जे (बहुदा) कोणत्याच स्त्रीला आवडत नाही. (आंटी मत कहो ना.. प्रकार)

तसंच थोडासा वयाने मोठा (म्हणजे नेमकं किती, हे माहिती नाही) पुरुष असला की त्याला जी किंवा काका (मामा) म्हटल्या जाते. ज्याची चीड येत असली तरी व्यक्त केल्या जात नाही.  (करता येत नाही).

मला तरी जी/ काका (अजून बाबासुद्धा नाही हो मी  ) वगैरे म्हटलेलं आवडत नाही. तुम्हाला काय वाटतं?

एका इंग्रजी स्पिकिंगच्या गटावर मी एकाला "सर" म्हणून प्रतिसाद देताच तडक त्याने उत्तर पाठवले, " मी ५५ वर्षाचा तरुण आहे. मला रँड म्हटलेलंच आवडेल, किंबहुना रँडच म्हण.... माझ्या थडग्यावरसुद्धा सर नाही राहणार... वगैरे"

एकाने मला ऊ. प्र. मध्ये असताना "प्रोफेसर विजयसाहब देशमुखजी सर" असं नाव लिहून पत्रिका पाठवली होती. याला अतीविनय म्हणावं की अजून काही ?

अश्या लोकांना काय सांगावं कळतच नाही.

अवांतर :- लग्नाच्या पत्रिकेत पदवी लिहिण्याची काहींना हौस असते. माझ्या आत्तेभावाकडे अशीच एक पत्रिका (छापण्यासाठी) आली होती. त्यावर लिहिले होते, चि. सौ. कां. ........ ताई/ ......... ताई, COMII. हि कोणती पदवी म्हणून आम्ही विचारात पडलो. शेवटी मुलीच्या भावालाच विचारले, तेव्हा तो म्हणाला, " आवो ते कॉमर्स सेकंड इअर आहे". आता बोला...