निवृत्तिसोपान आणि मी मुक्ताबाई

साधारण दीडेक वर्षापूर्वी माझ्या वयाला साठ वर्षं पुरी झाली. परिणामतः मी सरकारी सेवेतून मुक्त (मुक्ता) झाले आणि ज्याच्याकडे मी गेले कित्येक दिवस डोळे लावून बसले होते तो निवृत्तिसोपान चढले. काही वर्षांपासून मला ऑफिसचा फारच कंटाळा यायला लागला होता. अनेकदा वाटायचं की स्वेच्छानिवृत्ती घ्यावी. पण ते हातून घडलं नाही कारण घरी बसल्यावर पुन्हा नोकरी करावीशी वाटली तर तो दरवाजा आपण स्वतःच का बंद करायचा असं वाटलं. मग विचार केला की इतकी वर्षं काढली तशीच उरलेली पण ओढू. तेवढ्यात सहाव्या वेतन आयोगची हवा वाहू लागली आणि त्यापाठोपाठ अफवा पसरू लागल्या! त्यातली एक म्हणजे सेवानिवृत्तीचं वय बासष्ठ होणार आहे. माझ्यावर लोभ असलेली मंडळी अगदी प्रेमाने मला हे सांगत असत. माझ्या पोटात मात्र गोळा येत असे. असं हाताशी आलेलं सुख आणखी दोन वर्षं लांबणार! पण तसं काही झालं नाही. साठ वर्षं पुरी झाल्यावर निरोप समारंभ, भाषणं, भेटवस्तू, उभयपक्षी थोडा अश्रूपात होऊन मी निवृत्त झाले.

आता रिकामपणच रिकामपण! पहिली गोष्ट मी ठरवली की आता घर कसं अगदी आरशासारखं लख्ख ठेवायचं! इतके दिवस म्हणजे ऑफिसच्या व्यापात एक रविवार तेवढा मिळत असे. त्यात काय काय करायचं? पण आता तसं नाही. नियमितपणे घराची स्वच्छता, आवराआवर करायची. म्हणजे पाहुणे अगदी न कळवता आले तरी हरकत नाही. शिवाय घरात चिवडा, चकल्या, लाडू वगैरे पदार्थ नेहमी करून ठेवायचे. म्हणजे आयत्या वेळेला आलेल्या पाहुण्यांच्या पुढेही काही तरी ठेवता येईल. कुठल्या तरी गाफील क्षणी मी मनात असंही म्हटलं की लोणची, मोरांबेही घरीच करूया. झालंच तर शिवण-टिपण सुद्धा करता येईल. म्हणजे पूर्वी बायका साड्या फाटल्या तरी त्यांचे दणकट काठ घेऊन, ते शिवून त्याच्या पिशव्या, उशांचे अभ्रे वगैरे करत असत. तसंच कहीतरी. आता काय वेळच वेळ आहे. हो! आणि मुख्य म्हणजे इतकी वर्षं जी दुपारची झोप साप्ताहिक मिळायची ती आता रोज मिळू लागेल. मला झोपायची फार आवड आहे. माझा एक हिंदीभाषी मित्र आहे. त्याला पण अशीच आवड आहे. एकदा आम्ही दोघे ’मनसोक्त झोप झाली की कसं बरं वाटतं, झोपेसारखं सुख नाही’ वगैरे बोलत होतो. तेव्हा तो म्हणाला ’मीराजी, इसीलिए तो उसे सोना कहते है, चॉंदी नहीं कहते।’

सोडलेल्या संकल्पांपैकी अर्थातच दुपारच्या झोपेची अमंलबजावणी लगेच सुरू झाली. बाकीच्या गोष्टी ’आता करू की हळू, हळू’ असं म्हणत माकडाच्या घरासारख्या लांबणीवर पडत होत्या. तेवढ्यात एक मोठंच काम - काम कसलं? प्रकल्पच तो- समोर आलं. मुलाने आपण लग्नाला तयार आहोत असे सांगितले. बरेच दिवस ’इतक्यात नको, इतक्यात नको’ असे म्हणत असलेल्या मुलाने हिरवा कंदील दाखवल्यावर मी उत्साहाने मुली शोधायला सुरुवात केली. त्याचं नावही वधूवरसूचक मंडळांमध्ये नोंदवलं. काही दिवसातच फोन आणि इमेलचा जो सपाटा (दोन्ही बाजूंनी) सुरू झाला तो आवरताच येईना. मनात आलं, पूर्वी आईवडिलांना मुलांच्या लग्नासाठी जोडे झिजवावे लागत. आताच्या आधुनिक युगात त्यांना संगणकाच्या कळफलकावर बोटे झिजवावी लागतात. ह्या प्रक्रियेमध्ये मजेशीर अनुभवही आले. एक मुलगी आमच्या मुलाला योग्य वाटत नाही असे  नम्रपणे सांगितल्यावर(ही) त्या वधूमातेने तर मला जवळजवळ शापच दिला. ’अशा अटी घातल्यात तर तुम्हाला मुलगी मिळणं कठीण आहे. ’ एकदा एका वधूमातेचा फोन मी पोळ्या करत असताना आला. तेव्हा मी सांगितलं की मी पोळ्या करतेय. तुम्ही पंधरा/वीस मिनिटांनी फोन करा.’  माझ्या पोळ्या झाल्या, जेवणेही झाली. फोन येऊन तीन तास होऊन गेले तरी बाईंचा फोन नाही. मला वाटलं, तिनं विचार केला असेल की ज्या घरात स्वयंपाकाला बाई नाही तिथे माझ्या मुलीला देणार नाही! (मी मीटिंगमध्ये आहे असं सांगायला हवं होतं की काय?) एकदोन वेळा असंही झालं की काही वधूमाता, वधूपिते मी ज्या कॉलेजात शिकले तिथलेच निघाले. मग तेव्हाचे प्राध्यापक, ते आता कुठे असतात वगैरेही गप्पा झाल्या. पण ’मुद्याचं’ काहीच होईना. असे बरेच महिने गेले. ’मॅरेजेस आर मेड इन हेवन, आपण केवळ निमित्तमात्र’ यावर विश्वास बसायला लागला. लग्नाचा योग यावा लागतो हेच खरे, असे विचार मनात यायला लागले. आणि खरेच योग आला. लग्न ठरले! मुलगा अमेरिकेत, मुलगीही अमेरिकेत. लग्न अमेरिकेत की भारतात, नोंदणी पद्धतीने की धार्मिक पद्धतीने ह्यावर बरीच चर्चा होऊन लग्न अमेरिकेत करायचं पण धार्मिक पद्धतीने असं ठरलं. माझ्या अमेरिकेतील बहिणीने आणि मेहुण्यांनी त्याची सर्व जबाबदारी घेतली.

अर्थात हे काही सोपं नव्हतं. हल्ली काय, अमेरिकेत सऽऽऽगळं मिळतं, अशी काहींची समजूत असते, ती चुकीची आहे. एकतर सगळं मिळत नाही, मिळालं तरी आमच्यासारखे लोक, जे रुपयांमध्ये कमावत असतात त्यांना सगळ्या वस्तू डॉलर्स मोजून विकत घेणे परवडण्यासारखे नसते. त्यामुळे काही गोष्टी आम्हाला भारतातून न्याव्या लागल्या. त्यासाठी मी आणि बहिणीने पुण्यात तोरणे, मुंडावळ्या, महिरपी, गौरीहर, सजवलेले नारळ, सप्तपदी, माप, सहाण, वाती, सुपाऱ्या, जानवी, साळीच्या लाह्या  इत्यादी वस्तू खरेदी केल्या. पण सगळ्यात लक्षात राहण्यासारखी खरेदी फेट्यांची! फेटे कुठे मिळतात ह्याची चौकशी ३/४ ठिकाणी केल्यावर ते चोळखण आळीत मिळतील असं कळलं. पुण्यात बरीच वर्षं राहूनही त्या भागात जायची कधी वेळ आली नव्हती. पण गेलो तेव्हा कळलं की चोळखण आळीपर्यंत पोहोचायचा मार्ग ’भलताच’ आहे. असो. फेट्यांची खरेदी झाली हे महत्त्वाचं. दुसरी लक्षात राहण्यासारखी खरेदी म्हणजे केळीच्या पानांची. केळीची कृत्रिम (प्लॅस्टिक किंवा इतर काही टिकाऊ पदार्थाची) पाने आम्हाला बरोबर न्यायची होती. म्हणजे जेवण्यासाठी नव्हे तर शुभकार्यात दाराला जे केळीचे खुंट लावतात तशी किंवा निदान लांब देठ असलेली. सगळं दादर धुडाळलं तरी मिळाली नाहीत. मग मी आणि बहीण क्रॉफर्ड मार्केटात गेलो. तिथेही खूप शोधाधोध केली. माझा तर पेशन्स संपला पण बहिणीने मात्र चिकाटी धरून ती पाने मिळवलीच.

साड्या वगैरेंचीही खरेदी करून, सर्व साहित्य घेऊन आम्ही अमेरिकेला गेलो. लग्न झालं. आम्ही भारतात परत आलो. त्यालाही आता काही महिने झाले आहेत. जरा स्वस्थपणा मिळाल्यावर मनात विचार आला की निवृत्तीनंतर करू म्हणून योजलेल्या गोष्टींपैकी किती गोष्टी आपण केल्या आहेत ते तपासून पाहावे. मधले बरेच महिने मुली शोधणे, नंतर लग्नाची तयारी, मग प्रत्यक्ष लग्न यात गेले पण त्यानंतर आपण काय केलं? मग स्वतःच्या मनात डोकावून पाहणं का काय म्हणतात ते केलं आणि काय आढळलं? तर हे : लोणची-मोरांब्यांचा प्रश्नच नव्हता कारण त्या कैऱ्या मिळण्याच्या काळात मी लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. शिवणटिपण म्हणावं तर लग्नात आलेल्या साड्यांना फॉल लावणं सुद्धा माझ्याच्यानं होत नाहीये. घरी अचानक आलेल्या पाहुण्यांना अजूनही चहाबरोबर द्यायला बिस्किटांशिवाय दुसरं काही नसतं. घरात धूळ, जळमटं, कोळिष्टकं पूर्वीप्रमाणेच आहेत.  आवराआवर साप्ताहिक तर नाहीच, पण पाक्षिकही होत नाही. केवळ नैमित्तिक, म्हणजे पाहुणे येणार असतील तेव्हा होते.

आणि मग साक्षात्कार झाल्यासारखं माझ्या लक्षात आलं की मुळात मला ह्या कामांची आवडच नाही. घर स्वच्छ, नीटनेटकं असावं, आलेल्या पाहुण्यांचं चांगलं आदरातिथ्य व्हावं हे सगळं वाटतं. पण त्यासाठी स्वतः काही कष्ट करण्याचा मला मुळातच कंटाळा आहे. म्हणजे नोकरी हे केवळ निमित्त किंवा सबब होती तर! आता यावर उपाय एकच. तो म्हणजे दुसरी सबब किंवा दुसरी नोकरी शोधणे. आता त्याच कामाला लागावे हे बरे!   
-------------