सचिनला ऑनररी ग्रुप कॅप्टन करणे हे सवंगपणाचे, पोरकटपणाचे आणि अदूरदृष्टीचे आहे काय?

सचिन हा निःसंशय क्रिकेटमधील एव्हरेस्ट आहे. भारतातीलच नव्हे तर जगभरच्या क्रिकेट शौकीन लोकांत पराकोटीचा आवडता आहे. भारताची मान त्याने जगामध्ये उंचावत ठेवली आहे. राजकारणापासून अजूनतरी अलिप्त आहे आणि खेळावर लक्ष केंद्रित ठेवल्याने तो सतत वरवर जात आहे. लोकप्रियतेच्या कळसावर असूनही त्याची नम्रता अनुकरणीय आहे. तो सामाजिक कार्यांनाही मदत करतो असे ऐकतो. त्याच्या खात्यावर कोठलीही उणी बाब नाही. त्याचे खेळाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही असेच मोठे योगदान पुढेमागे होऊ शकते आणि त्याला भारतरत्न देखील मिळणे सहज शक्य आहे.

           असे असले तरी सचिनला ऑनररी ग्रुप कॅप्टन करणे हे  सवंगपणाचे, पोरकटपणाचे आणि अदूरदृष्टीचे आहे. आर्मी, नेव्ही व एयरफोर्स मधील जवान आणि अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खेळापेक्षा सर्वस्वी भिन्न आहेत. त्यांना देशसंरक्षणाकरता सदैव मरायला तयार असावे लागते. वरवरची पदे संरक्षणाचे दृष्टीने अधिकाधिक जबाबदाऱ्या पेलणाऱ्यांसाठी आहेत. संरक्षणदलांमध्ये खेळांना खूप महत्व आहे ते शारिरिक दृष्ट्या कायम सक्षम राहावे म्हणून! पण म्हणून संरक्षण दलातील अधिकाराचे हुद्दे खेळाडूंना देण्याची प्रथा अगदी अयोग्य आहे. हे खपले. आता पुढे त्याला ऑनररी फिल्ड मार्शल, ऍडमिरल, एयर मार्शल, पोलिस महासंचालक, पंतप्रधान अशा पदव्या द्या अशाही मागण्या होऊ लागतील. करायला सोपे  असल्याने जनतेला खुष करण्यासाठी नेते त्याचाही विचार करतील. मॅच फिक्सिंग करून ज्याने भारतीय जनतेला अक्षरशः बनवले अशा बदनाम अझरूद्दीनला नेते  तिकीट देतात व लोकही त्याला खासदार बनवतात तर निष्कलंक सचिनच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी तर ते त्याला फील्ड मार्शलही करतील. या प्रथा सर्वस्वी त्याज्य आहेत. सशस्त्र दले त्यांच्या त्यांच्यामध्ये ज्या खेळाच्या स्पर्धा होतात त्यांसाठी एखादा सुवर्ण चषक ठेऊ शकतात व या पद्धतीने त्याचा गौरव करू शकतात.