रंगीबेरंगी - ३.

या गणपती उत्सवा नंतर कॉलनीत बरीच भांडणं झाली. हिशोबावरून, DJला आणण्यावरून आणि शकुंतला बाईंवरून. प्रौढांनी हिच संधी साधून मंडळ पुन्हा आपल्या हातात घेतलं आणि तरूणांनी, 'पुढच्या वर्षी गणेशोत्सव होतोच कसा, तेच पाहातो' असे म्हणून बंडाचे शींग फुंकले.

त्यातल्या त्यात आनंदाची बातमी म्हणजे शर्वरी परत आली होती.


आमच्या कॉलनीत अगदी सुरूवातीला 'झाडे लावा, झाडे वाढवा' योजने अंतर्गत अनेक झाडे लावली होती. आणि त्यावर कावळे, चिमण्या, पोपट, मैना, खार, कोकीळा यांची वस्ती होती. कोकीळा हा पक्षी (की ही पक्षिण?) कारण नसताना ओरडून उच्छाद मांडते. (बहुतेक पक्षिणच असावी.) कधी काळी कोकीळरव कानावर पडल्यास आनंद होतही असेल कोणाला परंतु, काळ, वेळ (विशेशतः दुपारी झोपण्याची) न पाहता कोकलणाऱ्या या 'कोकीलेला' बेचकीत दगड भरून मारावीशी वाटते. कोकीळा गप्प बसली, तर खार खिचखिचत राहते. त्यामुळे दुपारचे जागरण होऊन, लाल डोळ्यांनी, पानांआड दडलेली कोकीळा किंवा/आणि खार शोधणे, म्हणजे वर्तमानपत्रातील न सुटणारे शब्दकोडे सोडविण्याचा प्रयत्न करण्यासारखे होते. कधी शब्द आठवतो, कधी कांहीकेल्या आठवत नाही. कधी कोकीळा दिसते, कधी ऐकू येते, पण कुठल्या पाना आड दडली आहे तेच दिसत नाही.


त्या मानाने कॉलनीतील चतुष्पाद प्राणी कमी त्रासदायक होते. एक गाय सकाळी आणि दुपारी आमच्या कॉलनीतच असायची. बिल्कुल  शांत स्वभावाची. 'जो देगा उसका भला, जो नही देगा उसकाभी भला' अशा वृत्तीची. अगदी सावकाश लचकत मुरडत चालायची. जरा सावली दिसली की विसाव्याला उभी राहायची. तिच्या सावकाश चालण्यामुळे आम्ही तिला 'गोगल गाय' म्हणायचो. तर आमच्याच कॉलनीतील ४ वर्षाची मंजूश्री तिला 'गॉगल गाय' म्हणायची.


तिन कुत्रे होते. बेवारशी. पण कॉलनीतच राहायचे, तिथेच कोणी देईल ते खाऊन गुजराण करायचे. भूक लागली की मिळेल ते खा आणि दिवसभर 'टपोरीगिरी' करीत फिर असा उद्योग. कधी कोणाला त्रास नाही. लहान मुलांशी विशेष ममत्वाने वागायचे. तीन वर्षाखालील मुलांना, कुत्र्याची सतत हलणारी शेपटी पकडण्याचा खेळ आवडायचा. पण जमायचे नाही. चुकून शेपटी हाती गवसली तर, धरून ओढायची. हाच खेळ. कुत्रंही क्यँऽऽऽव असं, ते मुल घाबरणार नाही याची काळजी घेत, ओरडायचं. मुलाचा इंटरेस्ट संपला किंवा कुत्र्याची सहनशक्ती संपुष्टात आली की कुत्रा स्वतःहून दूर निघून जायचा. असे हे निरुद्योगी कुत्रे खाण्या-पिण्यात (पाणी) आणि एकमेकांशी खेळण्यात आपले आयुष्य व्यतीत करीत होते.


एक दिवस अचानक, तारुण्य असह्य झालेली, एक देखणी कुत्री कॉलनीत आली. सुंदर तजेलदार रंग, वेल-शेप्ड मोठ्ठे कान, मोठ्या मोठ्या डोळ्यांमध्ये, सुंदर मोठी मोठी, काळीभोर बुब्बुळं. पाळीव कुत्रीसारखी कापलेली नखं, गोचीड विरहीत स्वच्छ केसाळ कांती, आणि हसरी, पुढे जाऊन हळूच मागे वळून बघायची लकब. हाऽऽऽय! तिघाही कुत्र्यांचे देहभान हरपले. तिला नीट पाहाता यावे म्हणून दोन पावले पुढे गेलेल्या 'मोत्याचा' पुढचा पाय, पातेलेभर साचलेल्या डबक्यात गेला पण त्याला पर्वा नव्हती. दुसरा 'सीझर', जागेवरून उठला नाही पण पुढचे दोन्ही हात पसरून, त्यावर हनुवटी टेकून पडल्या पडल्या त्याने, तिला ऐकू जाईल असा, एक दीऽऽऽर्घ सुस्कारा टाकला. (तिने वळून बघीतले तेंव्हा, सीझरने, त्याचे एका ओळीतले, दात तिला दाखवले.) तिसरा, 'टायगर' तिच्याशी सलगी करू ईच्छित होता परंतु, संकोचत होता. शेपटी हलवून कूं...कूं करीत तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होता. ती थांबली....तिने वळून पाहीलं.... गालातल्या गालात हसली आणि कमरेची सूचक हालचाल करीत पुढच्या वळणावर दिसेनाशी झाली. तिन्ही कुत्र्यांचे कान पार पडले होते. चैतन्यमयी शेपट्याही 'अवाक' झाल्या होत्या. डोळ्यांत, प्रेमाचे प्रतिक, बदाम तरळत होते, ती दिसेनाशी झाली हे पाहून तिघेही एकमेकांच्या अंगावर लाडीक उड्या मारू लागले. ज्याला कान आवडले होते तो दुसऱ्याचे कान, दातात हलकेच धरून, ओढू लागला. तर केसाळ स्वच्छ अंगकांती आवडलेला दुसऱ्या कुत्र्याच्या अंगावर अंग घासू लागला. 'टायगर'ला कूं.... कूं व्यतिरिक्त कांहीच सुचत नव्हते. तेवढ्यात ती वळून आली. दूर उभी राहून त्यांच्याकडे पाहू लागली. तिघेही ओशाळले. भुंकले सुद्धा नाहीत. ती हसली (बहुतेक) आणि निघून गेली.


त्या नंतर ही 'त्रिगुणात्मक त्रैमुर्ती' सदैव तिच्या आजू बाजू दिसू लागली. तिच्या वाटेवर, दुकानाच्या पायरीवर उजवा पाय आणि बाकी तीन पाय खाली अशा पोज मध्ये किंवा आपल्या पुढच्या पायांनी (आय् मीन, हातांनी) आपलेच दोन्ही कान स्वतःच्याच डोळ्यांवर ओढून किंचीत फटीतून स्टाईलमध्ये तिची वाट पाहू लागले. चौघांमध्ये लगेच मैत्री झाली. ती टंच कुत्री, मनुष्य जाती सारखी आप्पलपोटी नव्हती. तिच्या अपेक्षा जास्त नव्हत्या. तिला फक्त, तिचा आणि पिल्लांचा, इतर शत्रूंपासून आणि म्युनिसीपालटीच्या कुत्रे पकडणाऱ्या गाडी पासून सांभाळ करू शकेल असा, 'मर्द' हवा होता. तिघेही त्या कॅटेगरीत फिट्ट बसत होते. तिची ना नव्हती. एकापेक्षा तीन बरे. तिघेही तिचे रक्षण करीत. ती मधे आणि हे तिघे आजूबाजूला असे थट्टा-मस्करी करीत कॉलनीत भटकत.


थोड्याच दिवसांत, तिच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागले. ती धावेना. सांभाळून चालू लागली. कॉलनीतल्या डॉ. मालती कानविंदे (गायनॉकॉलॉजिस्ट) यांच्या दवाखान्याच्या पायरीवर तास न् तास बसू लागली. येणाऱ्या जाणाऱ्या पोटाळू बायकांकडे निरखून पाहू लागली. मधून मधून आपला मागचा उजवा पाय स्वतःच्याच पोटावरून फिरवू लागली. दुपारी विसाव्याला कैरीच्या झाडाखाली बसू लागली. तिघेही लाजले बिचारे. हळु हळू तिचे चालणे फिरणे बंद झाले आणि ती ४ क्रमांकाच्या इमारतीच्या जिन्याखाली आराम करू लागली, तिघांची धावपळ वाढली. कोणी पोळी दिली तर, कितीही भूक असली तरी स्वतः न खाता, मान खाली घालून,  जिन्याखाली तिला आधी नेऊन द्यायचे. ती प्रेमार्द नजरेने पाहायची आणि त्यांनाही आपल्या पंजाने पोळी पुढे सरकवून खायला लावायची. खरंतर तीला २ क्रमांकाच्या बिल्डींग मध्येच जिन्याखाली आपले बाळंतपण व्हावे असे वाटत होते. (डॉ. मालती बाई कानविंदे त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहात होत्या) पण त्या इमारतीत पाटील इन्स्पेक्टरच्या घरी एक आडदांड आल्सेशियन होता. तो वाईट नजरेने तिच्याकडे पाहायचा. म्हणून तिघांनी तिला ४ क्रमांकच्या इमारतीतील जिन्या खालील जागाच कशी योग्य आहे हे पटवून दिले होते. कालांतराने तिने, डोळे न उघडलेल्या, १२ अर्भकांना जन्म दिला. तिघेही बावचळले. बाळ बाळंतीण सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. चौघांनीही तो आनंद एकमेकांना चाटून व्यक्त केला. 'टायगर'ने दोनदा ऍडिशनल कूं.... कूं केलं. दूसऱ्या दिवशी, दारात 'गोगल गाय' आली. कुत्री, झोपली होती. बारा-बारा मुलं दर तासाला दूध प्यायची. तिला ग्लानी यायची. टायगरने कुठुन तरी मिळविलेले चिझचे दोन तुकडे तिथेच पडले होते. 'गोगल गायी'ने हम्म्म्माऽऽ करताच कुत्रीने डोळे उघडले. गायीला पाहून, ताकद नव्हती तरी, उठून चार पावलं गाई जवळ आली. दोघी नुसत्या डोळ्यांनीच बोलल्या. गायीने जिन्याखाली वाकून बघीतलं. प्रेमजीभाईच्या दुकानात मिळणाऱ्या अर्धा लिटरच्या पॉलीथीन बॅगसारखे लबलबीत बारा जीव एकमेकांच्या अंगावर हात, पाय, डोकं, ढुंगण मिळेल ते ठेवून मस्त निजले होते. त्यांची इवली इवली पोटं वरखाली होत होती. 


रविवारी मला बातमी लागल्यावर मी गेलो होतो पाहायला. ४ क्रमांकाच्या इमारतीत शर्वरी राहायची. जिन्या खाली लहान-लहान ५-६ मुलं मुली जमली होती. सगळ्यांत पुढे शर्वरी होती. कुत्रीपुढे साजूक तुपातला शिरा ठेवून ती कुत्रीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवीत होती.
'ए, मुलांनो बाजूला व्हा. चावेल हं ती कुत्री.' मी शर्वरीचे लक्ष वेधून घ्यायला म्हणालो.
'अँऽऽ काऽऽय करत नाय. शाणी आहे ती कुत्री. आणि आम्ही काय तिला त्रास देत नाय्ये, हो की नाही शर्रव्वर्री ताई?' एक ५-६ वर्षाची भवानी म्हणाली. 
शर्वरीने वळून पाह्यलं.
'हाय' ती म्हणाली.
'हाय' मी म्हणालो.
दोन मिनिटं काय बोलावं/विचारावं कळेना.
'छान आहेत नं पिल्लं?' शर्वरी.
'हो, पण अजून डोळे उघडलेले दिसत नाहीत.'
'हं'
'२१ दिवसांनी उघडतात, नं?'
'कांही माहीत नाही.'
'हो, मला वाटतं'
'चला, ए मुलांनो. बाळांना हात लावायचा नाही हं. अजून खूप लहान आहेत ते खेळायला.'
निघाली वाटतं. काय बोलावं अजून. नको. मुद्दाम बोलणं वाढवल्या सारखं वाटेल.
'दूरूनच पाहा रे' शर्वरी लिफ्टकडे निघाली. मी कांही बोललो नाही.
लिफ्टचे दार बंद होता होता शर्वरीची आणि माझी नजरानजर झाली.
लिफ्ट वर गेली. इतकावेळ लक्षात न येऊन रोखून धरलेला श्वास मी सोडला.
स्टाईलमध्ये टेकून उभं राहील्यामुळे, शर्टाला डाव्या वाजूला, इमारतीच्या कोलॅप्सीबल डोअरचे काळेकुट्ट ग्रीस लागले.
'अय्या, अंकल शर्टाला बघा काय लागलं?' ती मघाची भवानी.
मी कांही न बोलता वळलो.


आज आख्खा शर्ट काळा झाला असता तरी मला चालला असता.



क्रमशः