रंगीबेरंगी.

आमच्या कॉलनीची कथा मी अशरशः जगलो आहे. खरं पाहाता त्या कॉलनीत जन्मलेल्या मलाच काय पण इतर कोणालाही जगण्या व्यतिरिक्त इतर कांही करता येण्यासारखं नव्हतच मुळी.


माझ्या बालपणीच्या आठवणी, कमरे खाली कांही वस्त्र परीधान करण्याचे बंधन नसलेल्या वया पासूनच्या आहेत. ओट्यावर टाकलेली पोळी कुत्र्यासाठी आहे हे, मी पाठीत धपाटा खाऊन शिकलो. (लकीली, त्या आधी पोळीचा एक तुकडा, मी घशात कोंबला होता.) अर्धा तास तारस्वरात रडण्याचा प्रोग्रॅम मी साथी कलाकारांच्या उपस्थिती शिवायही पार पाडला. 'रडू दे. रडण्याने फ्फुफुसे सशक्त होतात.' या आमच्या जन्मदात्याच्या डिक्लरेशनला चॅलेंज करण्याचे माझे वय आणि इतरांची प्राज्ञा नव्हती. न पाळलेलं, तरीही रोजच्या पोळीसाठी आमच्या दारी येणारं कुत्रं माझ्या भावना जाणून असावं. निदान, पोळी न खाता, माझ्याकडे एकदा अशी आणि एकदा तशी मान वाकडी करून बघणाऱ्या त्याच्या डोळ्यांमध्ये मला तसे भाव दिसले होते. माझ्या जन्मदात्रीच्या ईच्छेविरुद्ध पोळीचा तो तुकडा मला द्यावासा वाटला तरीही, रोजचा रतिब तुटेल या विचारांनी, त्या श्वानाधिराजाने तो विचार, त्या तुकड्या बरोबरच स्वतःच्या गळी उतरविला. कुत्र्याने पोळी खाऊन टाकलेली पाहून, बाजूलाच पडलेला माझा स्टीलचा चंबू मी जोरात त्याला फेकून मारला. तो हल्ला शिताफीने चूकवून त्या कुत्र्याने पलायन केले आणि खण् खण् खण् खण् आवाज करीत गेलेल्या त्या चंबूने, आराम खुर्चीत पेपर वाचीत बसलेल्या माझ्या वडीलांच्या पायाला 'ए' एडक्यातल्या एडक्यासारखी धडक दिली. झाला प्रकार लक्षात येऊन आता मार पडणार या विचारानी मी, सरड्याच्या वेगाने, स्वयपांक घराच्या दिशेने रांगत धूम ठोकली परंतु, माझ्या प्रेमळ वडीलांनी एका झेपेत मला अर्ध्या रस्त्यातच गाठले आणि माझ्या मऊ मऊ पार्श्वभागी 'सटॅऽऽक' असा आवाज काढला आणि पाठोपाठ माझे तारस्वरातील रडणे, आख्या कॉलनीत घुमले.

शेजारच्या लठ्ठ आणि गोऱ्यापान पानसे काकूंची, येताजाता मला उचलून पापे घ्यायची वाईट खोड होती. मला आवडायचं नाही. आणि म्हणून त्या मुद्दाम पापे घ्यायच्या. मी गाल पुसून टाकायचो, तर माझे दोन्ही हात धरून त्या तेही करू द्यायच्या नाहीत. शीऽऽ. त्या लांबून बोलतील तेवढे चांगले असायचे. काय काय खाऊ करून आणायच्या. आमची आई पण वेडी. म्हणायची, 'काय काकू कशाला एकेक करून आणता त्याच्या साठी?' मला आईचा राग यायचा. आता आई स्वतः सुद्धा खूप खाऊ बनवायची पण काकू स्वतःहून जर कांही आणत असतील तर उगाच नाही का म्हणायचे? काकू, म्हणायच्या, 'असू द्या हो, गोड आहे तुमचा मुलगा.' मी लवकरच मोठा झालो आणि काकूंची 'ती' वाईट सवय मोडली.


माझी माँटेसरी, कॉलनीतच होती. बाई मात्र कॉलनीतल्या नव्हत्या. त्यांना कांही नीट शिकवता यायचं नाही असं माझ प्रथमदर्शनी मत झालं होतं. कांहीतरी, 'चांदोमामा, चांदोमामा भागलास का, निबोणीच्या झाडामागे.....' असं कांही तरी शिकवायच्या. तिथपासून, त्या कोवळ्या वयापासून, मला 'भागाकार' या प्रकाराचा तिटकारा मनात निर्माण झाला तो कॅलक्यूलेटरचा शोध लागे पर्यंत. माँटेसरीत एक सुख होतं, ते म्हणजे घरचा डबा. लिमयांच्या विशालच्या डब्यात चिकन सॉसेजिस असायची तर नेन्यांचा राजू उकडलेले अंडे आणायचा. माझ्या डब्यात मला आवडतात म्हणून कधी धीरडी तर कधी गरम गरम गुळ-तुप-पोळी (सुरळी करून) असायची. इतर वेळी माझ्याशी न बोलणारी शर्वरी डबा खाताना माझ्या शेजारी बसायची, गोड बोलायची, माझ्यासाठी इतरांशी भांडायची, माझ्यातली थोडी गुळ-तुप-पोळी (सुरळी करून) खायची, मला तिच्या डब्यातली ग्लुकोजची बिस्किटे द्यायची. मला आवडायची ती. (बिस्किटे.) तिला घ्यायला तिची आई यायची, ती मला नाही आवडायची. ओठ रंगवलेले, बिन बाह्यांचं पोलकं आणि फुलाफुलांचं सुळसुळीत पातळ नेसायची. बिस्किटं मला देते म्हणून शर्वरीला धपाटे घालायची. ती कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीत कुठल्यातरी मॅनेजरची सेक्रेटरी आहे (म्हणजे काय, ते मला तेंव्हा कळले नहते.) असे पानसे काकू, आईला सांगत असताना मी ऐकलं होतं. 
मी तिसरीत असताना कॉलनीच्या वार्षिक क्रिडामहोत्सवात (हा गणपतीत असायचा) मला संगीत खुर्ची स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस म्हणून एक वॉटर बॅग मिळाली होती. खरा माझा दुसरा क्रमांक आला असता पण पटेलांच्या जितूने मला पाय घालून पाडले (खूप खरचटले) आणि त्याला दुसरा आणि मला तिसरा नंबर मिळाला. त्याच्या आईने त्याला अगदी प्रेमाने 'जीतू, एऊ नई करवानू हंऽऽऽ' असे म्हंटले आणि तो दुसरा आल्या बद्दल टाळ्या वाजवल्या.
माझी आई, 'हे गुजराथी मेले असेच आमच्या मुलांना पाय घालून पाडणार आणि स्वतः मात्र पुढे जाणार' असं बाबांना सांगत होती. माझ्या पायाला खोबरेल तेल लावत बाबा म्हणाले, 'अग जाऊदे, तिसरा नंबर तरी पटकवला नं? शेवटी मुलगा कोणाचा आहे? अं?'
'ही.. ही वृत्तीच मराठी माणसाला मागे ठेवते. आणि आणि या धांदरटाला नीट बघून धावता येत नाही?' माझ्या पाठीत धपाटा बसला. मी भोकाड पसरलं. तेवढंच करणं मला शक्य होतं. आई बाबांच्या भांडणात, माझ्या तिसऱ्या नंबरचा आनंद पातळ होत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने गरम गरम दुधात पोहे आणि साखर घालुन मला दिले. मला खूप आवडायचं ते. 'पुढच्या वर्षी नीट धाव हं. पहिला नंबर काढायचा. उगीचच धपाटा घातला मी काल. अरे, चुका काय, मोठ्यांच्या हातूनही होतात होऽऽ.' मला कांही कळत नव्हते. आईचा राग आता गेला आहे एवढे कळले.
मी सातवीत असताना शर्वरी कॉलनी सोडून गेली. तिच्या वडीलांची भोपाळ की इंदुरला बदली झाली होती. पण त्यांनी कॉलनीतला फ्लॅट विकला नव्हता. त्यांनी फ्लॅट विकला नाही याचा मला का आनंद व्हावा हे त्यावेळी कळले नाही. सातवी-आठवी पासून कॉलनीतील माणसं (एकेक रत्न) यांची ओळख मनात पक्की होत गेली. वैविध्याने नटलेल्या आमच्या या कॉलनीतील आमचे आयुष्य मात्र रंगीबेरंगी होते.


क्रमशः