रंगीबेरंगी - ४

स्टाईलमध्ये टेकून उभं राहील्यामुळे, शर्टाला डाव्या वाजूला, इमारतीच्या कोलॅप्सीबल डोअरचे काळेकुट्ट ग्रीस लागले.
'अय्या, अंकल शर्टाला बघा काय लागलं?' ती मघाची भवानी.
मी कांही न बोलता वळलो.

आज आख्खा शर्ट काळा झाला असता तरी मला चालला असता.


मी नोकरीस लागलो, ही समाजाच्या दृष्टीने कांही मोठी ऐतिहासिक घटना नव्हती. पण मला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. भावी जीवनाची प्रासादतुल्य स्वप्ने पाहायचा हक्क प्राप्त झाला. कॉलनीतील 'टपोरीगिरी' करणाऱ्या नवतरूणांना सन्मार्ग दाखवण्याचा अधिकार प्राप्त झाला. (आमची 'टपोरीगिरी' करून झाली होती.)
जसजशी लग्ने होत गेली तसतशी नाक्यावरची उपस्थिती रोडावत गेली. पटेलांचा जितूभाई शनिवार रविवार तरी आमच्या ग्रुप मध्ये असायचा. त्याच्या वडीलांचा इंपोर्ट-एक्स्पोर्टचा व्यवसाय होता. जितूभाई त्यांना ऑफिसच्या कामात मदत करायचा. पण पुढे, त्यांना अमेरीकेत एक मोठे काँट्रॅक्ट मिळाले आणि प्रॉडक्ट रिप्रेझेंटीटीव्ह म्हणून जितूभाई अमेरीकेला निघून गेला. आणखिन एक मेंबर गळाला. रात्रीच्या समयी (म्हणजे आम्हाला 'उजाडल्यावर') आम्ही नाक्यावर अंधारात सिगारेटी फुंकत बसलो असलो आणि एखादा लग्न झालेला, 'एक्स मेंबर', बायको समवेत, रस्त्यातून जाताना उगीचच अपराधी भावनेने, नुसताच 'हात करून' पुढे निघून गेला की, 'जोरू का गुलाम साऽऽला' असा उघड शेरा दबल्या आवाजात मारला जायचा. हे सर्व 'जोरू के गुलाम' रविवारी दुपारी मात्र बायकोच्या हातचा मटण रस्सा चापून सिगारेट फुंकायला नाक्यावर यायचे आणि सिगारेट संपवून घरी झोपायला जाई पर्यंत 'गेले ते स्वातंत्र्याचे दिवस, तुम्ही लेको अजून मजा मारताय' असे सुस्कारे टाकत राहायचे.


दिल्प्याचे लग्न ठरले. मुलगी त्याच्या कॉलेजातीलच होती. ओरिएंटल शॉपींग सेंटर जवळ राहायची. अजून एक शिलेदार निखळला. नाका ओसाड झाला. लगेच तेवढे जाणवले नाही. कारण दिलीपच्या लग्नाच्या तयारीत आम्ही बिझी झालो. तसे, मुलाकडची बाजू म्हणून विशेष कांही काम नव्हते. तरी कधी, पत्रिका वाटायला, त्याला कंपनी म्हणून, तर कधी सुटाचे माप द्यायला त्याच्या बरोबर. अशी धावपळ सुरू झाली. संध्याकाळी, दिलीप त्याच्या भावी पत्नी बरोबर फिरायला जायचा. (तिथे आमची गरज नव्हती.)


एकदा संध्याकाळी ऑफिस मधून येताना कॉलनीतच शर्वरी भेटली. दुकानातून खाली उतरत होती. छानशी हसली. मी थांबलो.
'काय .... दुकानात?'
'हं... जरा टुथपेस्ट वगैरे. तू काय आत्ता येतोयस ऑफिसातून'
'हं आज जरा जास्त काम होतं. ... रोज नाही एवढा उशीर होत.'
'माहितीए मला. लवकर येतोस ते.'
'श्शर्रव्वर्रीऽऽऽऽऽऽऽ' शर्वरीची आई गॅलरीतून ओरडत होती.
'आलेऽऽऽ. चल् येऊ?'
'हं... दिलिपच्या लग्नाला आहेस नं?'
'सकाळ पासून. बाऽऽय!'
'बाय्!'
शर्वरीची आई म्हणजे नं... अगदी जळावू ओंडका आहे. शर्वरी आणि मी जरा कुठे बोलत होतो तर लगेच हिच्या पोटात दुखायला लागलं. दोन नंबरच्या बिल्डींग मधून गॅलरीत उभा शरद आणि त्याची बायको माझ्याकडेच पाहात होते. नजरानजर होताच शरदने हात केला. मी हात केला. त्याची बायको गालातल्या गालात हसत होती. मी सिगारेटी घ्यायला दुकानात वळलो. 


दिलीपच्या लग्नाच्या आदल्या रात्री आम्ही बहुतेक मित्र मंडळी त्याच्या घरीच होतो. काम कांही नव्हतं. हसत खिदळत मजा चालली होती. 'दिलिपची .... ऍज अ बॅचलर शेवटची रात्र' कोणीतरी म्हणालं.
'काय म्हणतोस.... तुला काय ठाऊक?' शरद.
सगळे भस्सकन हसले.
'आता कोण कोण उरले?' 
'एकतर हा' माझ्याकडे हात करून शरद म्हणाला,' दुसरा सतिश, आणि तिसरा जितूभाऽऽय.'
'आपून तो शादीबिदी नही करने वाला, क्या?' इती सतिश.
'का? कांही 'प्रॉब्लेम' आहे' मी.
'छ्याः! 'प्रॉब्लेम' वगैरे कुछ नही यार। आपण स्वच्छंदी आहोत. आकाशात मस्तपैकी पक्षासारखं उडत राहाणार'
'पक्षासारखं नको. निदान पँट तरी घालत जा.' शरद.
पुन्हा सगळे ठ्यांऽऽ करून हसले.
'तू कधी करतोयस लग्न?' शरदने मला डायरेक्ट प्रश्न केला.
'मी? बघू. मुलगी तर मिळायला पाहीजे.' मी उगाच कांहीतरी.
'का? शर्वरी काय वाईट आहे?' शरद भिडलाच. इतरांनीही आता कांही तरी अनाउन्समेंट होणार या आशेने माझ्याकडे पाहीलं.
मी गोंधळलो.
'छ्याः! शर्वरी काय? भलतंच काय बोलतोस, शरद?' मी.
'का? बहिण मानतोस तिला?'
पुन्हा स्साले सगळे निर्मळ हसले. मला काय बोलावे कळेना.
'नाही... बहिऽऽण, असं नाही.... मैत्रीण... आहे .'
'मैत्रीण?..... माय् फ्फूट! साल्या तुला काय वाटतं? आम्हाला कळत नाही, तुझ्या मनात काय आहे ते?'
'कर डालो याऽऽर. क्या डरते हो?'
'हे पाहा. मी कधी तसा विचार केला नाही अजून'
'अरे मग कऽऽऽऽर. नाहीतर शर्वरीच्या लग्नात गुलाबपाणी शिंपडायला उभं राहावं लागेल, माहितीए? हे बघ, फक्त कथा, कादंबऱ्यात आणि सिनेमात हिरॉईन विचारते हिरोला. प्रत्यक्षात, मार खायची तयारी ठेवून, हिरोलाच पुढाकार घ्यावा लागतो.' शरद.
'घ्या.... ही आली शर्वरी.' दिलीप.
मी चमकून मागे वळून पाहीलं. मागे कोणी नव्हतं. सगळे उसळून उसळून हसायला लागले.

दिलीपच्या लग्नाच्या दिवशी पहाटे पहाटे आम्ही सर्वजणं कार्यालयात पोहोचलो. दिलीप सोवळे नेसून तयार झाला. गुरूजी होमाची तयारी करीत होते. १० वाजून २७ मिनिटांचा मुहूर्त होता. आदल्या दिवशीच फटाके आणून ठेवले होते. झेंडूची फुलं, पुष्पगुच्छ, हार, पेढे एकेक वस्तू सामानातून बाहेर पडत होत्या. शहनाईची कॅसेट चालली होती. आम्हाला विशेष काम नव्हतेच. आम्ही खुर्च्या घेऊन कोंडाळं करून बसलो होतो. सतिश, मी, शरद, सुभाष, आश्विन, दिलीपचा मावस भाऊ वगैरे. दिलीपच्या आईने फराळ आणून दिला. एवढ्या सकाळी भूक नव्हतीच पण 'टूट पडो' म्हंटल्यावर आपोआप भूक लागली. होमाचा धूर, नेम धरून आमच्या कडे येत होता. डोळे चुरचुरायला लागले. 'च्यायला, त्या होमाच्या' सगळे जणं खुर्च्या घेऊन विरूद्ध बाजूला बसले. कार्यालयाच्या नोकराने हॉल झाडून घेतला होता. आता त्याने पंखे सुरू केले.
'हाऽऽऽऽऽ हे बरं झालं. काय सालं उकडत होतं' सतिश म्हणाला.
पण त्यामुळे आता पुन्हा धूराने दिशा बदलली. पुन्हा आम्ही जागा बदलली. साडेसात वाजत आले होते. दिलीपची फर्स्ट राउंड आटोपली होती. गुरूजींचा टी-ब्रेक होता. दिलीप, सोवळ्याचा बोंगा सावरत आमच्यात आला. कार्यालयाच्या नोकराने चहा आणून दिला. घाईघाईने चहा घेऊन, दोन शब्द बोलून दिलीप गेला.

कार्यालयाच्या दरवाज्यातून शर्वरी आणि तिची आई आंत शिरत होती. मी लक्ष नाही असं दाखवून दिलीपचे लग्नविधी पाहात बसलो. शरदने मला ढोसलं. आणि नजरेनेच खूण केली. गोल्डनकलर साडी आणि उठून दिसणारे मोजकेच, नाजूक दागिने... शर्वरी सॉलीड दिसत होती. आई बरोबर असल्यामुळे तिने लक्ष दिले नाही. बायकांत जाऊन बसली. लगेच कोणी तिची साडी, हात लावून पाहू लागली, कोणी कानातलं, तर कोणी गळ्यातलं कुरुवाळू लागली.
'चला, जरा मोकळ्या हवेवर सिगारेटी फूंकूया.'
सतिशने स्साल्याने, मुद्दाम हॉलच्या बाहेर जायची टूम काढली. जावं लागलं. शर्वरीने बघितलं.
बाहेर येतो तर समोरूनच जितूभाय येताना दिसला.
'हाऽऽऽय, थिंक ऑफ डेव्हील्स. अँड दे ऑल आर देअर फॉर ग्रुप फोटो.' जितूभाय.
'अबे ओ साले, तू कब आया अमेरीकासे?'
'कालच आलोय यार. आल्या आल्या पप्पांनी सांगितलं दिल्प्याकी शादी आहे. बस. पहूंच गया.'
'काय अमेरीकेत काय बापाचं दिवाळ काढलं की नाही.'
'नो यार नो. अरे.. हां... मी जरा नवरदेवाला भेटून येतो. साल्याच्या सोवळ्याचा काष्टाच ओढून येतो.' जितूभाय आंत गेला.
'नशीबवान आहे. बापाकडे भरपूर माल आहे. अमेरीकेत ऐयाशी चाललीय.' शरद.
'पण कांही म्हण हुशार आहे. धंद्याला आवश्यक सर्व गुण आत्मसात केलेत.' मी.
'ते तर आहेच रे. पण तिकडे एक्झ्याक्टली काय दिवे लावलेत, आपल्याला काय ठाऊक?' सतिश.
तेवढ्यात आलाच जितूभाय परत.
'बोलो यार, बाकी तुम लोगोंका क्या चल रहा है। बऱ्याच जणांचा ताशा वाजलाय (लग्न झालय) असं ऐकलं.'
'तू तेरा बोल. काय करतोयस अमेरीकेत.... आय मीन बापाचे पैशे उडवण्या व्यतिरिक्त.'
'कुछ नही याऽऽर. पप्पांचं ऑफिस सेट करून दिलं. हल्ली माझा कझीन सांभाळतो ते. मी माझा स्वतःचा बिझीनेस चालू केला'
'क्या बात है। काय बिझीनेस चालू केलायस?'
'सॉफ्टवेअर ऍप्लीकेशन्स आणि नेट वर्कींग.'
'वॉव, मग इथे काय आऊट सोर्सींगसाठी'
'नो... नो. धीस इस माय फर्स्ट व्हेकेशन इन लास्ट फोर इयर्स. मजा करेंगे यार.' गप्पा अशाच रंगल्या.


आंत मंगलाष्टके सुरू झाली आणि आम्ही आत गेलो. एका लहान मुलीने अक्षता दिल्या. प्रत्येक 'सावधान'ला आम्ही वधू-वरांवर अक्षता टाकत होतो. शर्वरी कुठे दिसेना. भिंतीवर घड्याळाचा काटा १०.२७ कडे सरकू लागला आणि गुरूजींनी 'तदेव लग्नम्....' सुरू केलं. अंतरपाट दूर झाला. कोणीतरी वाजवा रे वाजवा करून सनई-चौघडावाल्यांची शेपटी पिरगळली. बाहेर फटाक्यांचा कडकडकडकडकडकड आवाज घुमला. वधु-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. वधूच्या जवळच शर्वरी उभी होती. वधूकडच्या बायका सूं सूं करीत नाक पुसत होत्या. मघाची अक्षतावाली मुलगी पेढे वाटायला आली.
मधे तास दीड  तास भाकड गेला. आणि जेवणाची तयारी झाली आहे असा निरोप आला. जेवणासाठी बुफे होता त्या मुळे आग्रह वगैरे नव्हता. पैजेने जिलब्या उडवण्याची गंमत नाही. आम्ही दोस्त लोकं हातात प्लेटा घेऊन जेवणावर ताव मारत होतो. दूर बायकांत, शर्वरी, ओठांची लिपस्टीक न बिघडवता नुसत्या दातांनी जिलबी तोडत होती. आमची जेवणं आटपली आणि दारावरच्या माणसा कडून पान घेऊन आम्ही पुन्हा बाहेर आलो. जेवण मस्त होतं त्यामुळे, अंगावर आलं होतं. दिलीप 'सीव्हील ड्रेस'मध्ये बाहेर आला. गळ्यात मंगळसुत्र न अडकवताही तो 'शादीशुदा' दिसायला लागला होता. त्याचं अभिनंदन केलं. मुलीकडच्यांनी रिसेप्शन, एका पंचतारांकीत हॉटेलात ठेवले होते. संध्याकाळी  भेटण्याचे आश्वासन देऊन आम्ही पांगलो.
संध्याकाळी मी नवा चुडीदार चढवला. वेळेवर हॉटेलला पोहोचलो. ७-८ प्रकारची आईस्क्रिम, ड्राय-फ्रुट्स आणि इतर स्वीट्स असा थाट होता. शर्वरी जांभळ्या शालूत होती.


दिलीपच्या लग्नाला आठ दिवस झाले होते. तो उटीला हनिमुनून आला होता. आज रविवार, दुपारी जेवून नाक्यावर आम्ही चौघे उभे होतो. सतिश, सुभाष, दिलीप, आणि मी. दिलीप उटीच्या 'गमतीजमती' सांगत होता. हास्याचे फवारे उसळत होते. तेवढ्यात शरद आला.
'काय रे शऱ्या. बायको दुपारची पण सोडत नाही काय.... '
'नही यार आज जितूभाय बरोबर होतो, त्याच्या पत्रिका वाटायला.'
'काय सांगतोस..... जितूची विकेऽऽऽट?' आम्ही जवळ जवळ किंचाळलोच.
'येस्. १५ दिवसांत लग्न आहे. पुढच्या ५ तारखेला, ताज मध्ये.'
'ग्रेट यार. धम्माल करू.' मी.
'मुलगी कुठली इथली की अमेरीकेतली?' सतिश.
'हां यार, मड्डम आहे का?'
'नाही, इथलीच आहे' शरद. 'आपल्या कॉलनीतली, श..र्व..री.'
'व्हॉऽऽऽट. काय सांगतोस काय?' मी सोडून सगळे ओरडले. मी तर सुन्नच झालो होतो. काय बोलावे कळेना. सगळे माझ्याकडे पाहू लागले.
मी स्वतःला सावरले. (निदान मला तरी तसे वाटले.)
'अरे, पाहाताय काय असे. मी म्हणालो नव्हतो शऱ्या तुला, आमची नुसती मैत्री होती. तुमचाच कांही तरी गैरसमज झाला होता.......... आ...णि.. कदाचीत......माझाही?'
मी मान वळवली. शरदने माझ्या खांद्यावर हात ठेवला..... मला मान वर करायच धाडस झालं नाही. मी घराकडे निघालो......एकटाच.


घरी आलो. बाबा घरी नव्हते. आई किचन मध्ये ओट्याला टेकून उभी होती. हॉलमध्ये टी-पॉयवर गुजराथी घाटणीची एक नवीकोरी लग्नपत्रिका पडली होती. मी सरळ माझ्या रूम मध्ये गेलो. माझ्या पाठोपाठ आई आंत आली. मी टेबलावर हाताची घडी ठेवून त्यावर डोकं टेकून बसलो होतो. आईने माझ्या पाठीवर हात ठेवला.
'जाऊदे, शशांक, होतं कधी कधी असं. मनाला लावून घेऊ नकोस.'
माझ्या चेहऱ्याकडे न बघता तिने माझं दुःख वाचलं होतं.
आई होती ती माझी.


भावना अनावर होऊन मी अश्रुंना वाट करून दिली..........


संपूर्ण.