४६. भय इथले संपत नाही!

ही पोस्ट कळस यांच्या प्रश्नांना उत्तर आहे, इतक्या सुरेख प्रश्नांना प्रतिसाद म्हणून उत्तर दिलं असतं तर ते सर्वांना सहज उपलब्ध झालं नसतं म्हणून स्वतंत्र पोस्ट.

१) > स्वप्न आणि विचार...... स्वप्नं.

एक नंबर सांगितलंत. पण अजून थोडे स्पष्ट केले, थेट सांगितले तर बरे होईल. असे आहे का, की विचारांचा वेग मंदावल्यामुळे विचारांमधली पोकळी जाणवते? (सलग चित्रपट न दिसता मध्ये मध्ये पडदा दिसतो? ) त्यामुळे स्वप्नं पडायची कमी (तुटक तुटक) होतात /थांबतात का? स्वप्नांचे विषय काय असतात?

=  मनाच्या प्रोजेक्टरचं प्रक्षेपण (दृकश्राव्य)  अहोरात्र चालू आहे, दिवसा त्याची येणारी प्रचिती म्हणजे विचार आणि रात्रीच्या अंधारात त्याचा होणारा सुस्पष्ट बोध म्हणजे स्वप्न.

तुमचा प्रश्न आहे की रात्रीची स्वप्न कशी थांबवायची?

मी तुम्हाला सांगतो कुणीही सरळ रात्रीवर प्रयोग करू शकत नाही, जे  काही करायच ते दिवसाच होऊ शकतं आणि एकदा दिवसा प्रोजेक्टर थांबायला सुरुवात झाली की मग ते स्वास्थ्य रात्रीत प्रवेश करेल त्यामुळे रात्री मन सक्रिय व्ह्यायच थांबेल आणि स्वप्न बंद होतील.

भयस्वप्न पडायची सुरुवात रात्री होते असा आपला गैरसमज आहे.

भयस्वप्न पडण्याचं खरं कारण दिवसा प्रसंग व्यवस्थित हाताळता येत नाही हे आहे, ही दिवसा वाटणारी भीती सघन होत रात्रीत शिरते.

मी आजपर्यंत शेकडो लोकांच्या मनाचा जो अभ्यास केलाय त्यावरून निर्विवादपणे सांगू शकतो की अध्यात्मात जे सांगितलं जातं की माणसाला मृत्यूची भीती आहे ते फार वरवरचं आणि निरुपयोगी आहे. आपण अमृत आहोत आणि त्यामुळे खरंच जीवावर बेतलं किंवा एखादा दुर्धर आजार झाला तर शरीराला मृत्यूची जाणीव होते पण असे प्रसंग दुर्मिळ आहेत.

तुम्ही व्यक्तीगत घेऊ नका, ही साऱ्या मानवी जीवनाची कहाणी आहे, भीतीचं खरं कारण आपल्याला लाईफ हँडल करता येत नाहीये हे आहे. वरवर कुणीही कितीही सिकंदरी दाखवो तो आधार शोधतोय. कुणी संपत्तीत सिक्युरिटी मानलीय, कुणी प्रचंड मोठी इंडस्ट्रियल एम्पायर्स उभी केलीयेत, कुणी राजकीय नेता बनून आपलं नेटवर्क उभं केलंय तर यापैकी काहीही न जमलेला बहुसंख्य जनसमुदाय देवाच्या कल्पनेवर भरवसा ठेवून आहे.. तो तारेल!

पण मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो (म्हणजे नेहमी असंच सांगत असतो) की हे सगळं बोगस आहे, सिक्युरिटीनं भीती जाणं अशक्य आहे. प्रत्येकाची भीती एक असली तरी भीतीची कारणं वेगवेगळी आहेत आणि ही भीती तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत मनाचा प्रोजेक्टर थांबणं शक्य नाही.

या ही पुढे जाऊन आतापर्यंतच्या मानसशास्त्राच्या कोणत्याही दिग्गजाच्या  मग तो फ्रॉइड असो की जुंग, लक्षात न आलेली आणि जगातल्या कोणत्याही मानसशास्त्राच्या पुस्तकात न सांगितलेली किंवा कुणाही मानसविशारदाच्या कधीही लक्षात न येऊ शकणारी गोष्ट सांगतो ती अशी की मानवी मन सदैव सक्रिय असण्याचं कारणच आपण त्या भीतीचं निराकरण करायला मनाचा उपयोग करतोय ही आहे! आणि हा सक्रिय झालेला प्रोजेक्टरच पुन्हा भीती निर्माण करतोय! हा अखिल मानवी जीवनाचा पेच आहे.

हा पेच सोडवायचा एक आणि फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे निराकाराचा बोध! आपण निराकार आहोत आणि आपल्याला काहीही होत नाही हा बोध! माझ्या सर्व लेखनाचा तोच तर उद्देश आहे, जर प्रत्येकाला निराकाराचा बोध होत गेला तरच जगात शांतता नांदण्याची शक्यता आहे नाही तर प्रत्येक जण आपल्या भीतीतून आपली सिक्युरिटी निर्माण करत राहील मग त्यातून युद्ध, खोटं आणि भ्रष्टाचारी राजकारण (संपत्ती आणि नेटवर्किंग मधून शोधलेला आधार) किंवा मग भोळसट भक्तिमार्ग आणि पुन्हा त्यातून उभे राहणारे धार्मिक कलह (अमकी मशीद, तमकं मंदिर, पवित्र भूमी, खुळे चमत्कार) यातून माणसाची कधीही सुटका नाही.    

२) = पुढच्या जन्मात आपली भेट होईल याची शाश्वती नाही.

> तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? असल्यास का? नसल्यास का नाही?

=  जन्म आपला होत नाही त्यामुळे पुनर्जन्मही होत नाही.

मी ‘पुढच्या जन्मात आपली भेट होईल याची शाश्वती नाही’ म्हटलं याला दोन कारणं आहेत:
एक, मला तुम्हाला या लेखात, आता, या संकेतस्थळावर ‘तुम्ही निराकार आहात हे सांगायचंय’ आणि त्यासाठी मी एक आर्जन्सी निर्माण करतोय

आणि दोन, मला शरीर मरेल तेव्हा पुन्हा नवीन शरीरातून व्यक्त व्हावं किंवा नाही हा पर्याय उपलब्ध असेल. मी अत्यंत मनस्वी आहे, त्यावेळी मला काय वाटेल ते मी आता सांगू शकत नाही. मला जर वाटलं की आता लई झालं तर मी निराकारातच संलग्न होऊन राहीन आणि जर वाटलं की होऊन जाऊ दे आणि एक मैफिल तर पुन्हा व्यक्त होण्याचा पर्याय निवडीन पण तो फार बेभरवशाचा मामला आहे म्हणून त्याची शाश्वती नाही.

आणि जरी मी पुन्हा व्यक्त झालो तरी मी संजय क्षीरसागर नसेन आणि तुम्ही कळस नसाल म्हणून आताच काय ते समजून घ्या!

३) >तुम्ही उत्तरे देताना मजा येतेय असे म्हटलेय, म्हणून मनातल्या काहीही शंका विचारण्याची हिंमत करतोय

= येस, अँड थँक्स अ लॉट कारण तुम्ही प्रातिनिधिक प्रश्न विचारताय आणि मी अस्तित्वागत उत्तरं देतोय.

संजय