रसिका

"’व्हाईट लिली नाईट रायडर’ पुन्हा सुरु करते आहे!" रसिकाच्या स्वरातूनच
तिला किती आनंद झाला आहे ते कळत होतं. या नाटकाची संकल्पना कशी सुचली हे
तिनं अनेकदा सांगितल आहे.  संवादाची अनेक साधनं असतांना  मनमोकळा,
प्रामाणिक संवाद, जिव्हाळा, नातेसंबंधातले बदल  या गोष्टी कशा आणि किती
झपाट्यानं बदलत आहेत हे तिला समाजात वावरतांना पुन्हा पुन्हा जाणवतं यावर
आमच बोलण झाल.

 एखाद्या गोष्टीची जाणीव होण, त्याच विश्लेषण
आणि त्यावर आपल अस स्पष्ट मत मांडण ही रसिकाची खासियत. आम्ही जेव्हाही
भेटतो तेव्हा आपल्या आयुष्याविषयी तिच्या कल्पना किती स्पष्ट आहेत,
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची तिला किती सखोल जाण आहे हे कळायला फार वेळ
लागत नाही.

अमूक केल की तमूक मिळेल आणि मग जीवनात आपण यशस्वी झालो या
तथाकथित वळणात वाढलेल्या प्रत्येकाला पावलोपावली ठेच लागावी असाच तिचा
मार्ग. संकुचित मानसिकतेमधून बाहेर पडायच असेल तर मोठी स्वप्ने, त्यावर
विश्वास आणि त्याकरता लागणारे प्रयत्न आणि तेही वेगळ्या क्षेत्रात हे सर्व
माझ्या कल्पनेबाहेरचे... सर्वसाधारण नोकरदार वर्गाने घेतलेला रुढ मार्ग
ज्यांना मान्य नसतो, असे अनेक असतात; पण त्याविरुद्ध जायचे बळ ज्यांच्यात
नसते त्यापैकी एक मी. ज्यांना वेगळी स्वप्न खुणावतात आणि जे ती पूर्ण
करण्याकरता आयुष्य पणाला लावतात अशांपैकी रसिका एक. गिरीश दादा आणि ती
एकत्र आले म्हणून माझी तिची गाठभेट झाली हा एक निव्वळ योगायोग. अन्यथा माझी
तिची भेट झाली असती असं वाटत नाही. नाटक सिनेमाक्षेत्राबद्दल मला फार
प्रेम नाही, शिवाय अगदी आवडता कलाकार दिसला की त्याच्याबरोबर फोटो काढून
घ्यावा अशी इच्छा सुद्धा नसते. ते क्षेत्र, तिथली स्पर्धा, कलाकारांचे
मनस्वी वागणे इत्यादी विषयी सर्वसामान्यांच्या मनात जे काही समज-गैरसमज,
कुतूहल असेल तेवढच मलाही होत, आहे. तिच्या भेटीमुळे, परखड आणि मनमोकळ
बोलण्यामुळे डोळ्यावर बांधलेली झापडं दूर व्हायला नक्कीच मदत झाली. ती तर
फक्त वरवरच, तेवढ्यापुरतं बोलती तर...? पण ते तिच्या स्वभावातच नाही.

माझ्या
आखून घेतलेल्या चाकोरीबद्ध आयुष्यात म्हटल तर सुरक्षित पण थोडे अनिश्चित
वाटावज अशा एका टप्प्यावर मी होते आणि त्यावेळी ती स्वप्नाचा पाठपुरावा
करतांना किती वेगवेगळया अवघड परीक्षा देत होती याची मला फक्त कल्पनाच होती.
मला हव असलेल कस मिळाल नाही म्हणून माझी कुरकूर सुरू असे आणि तिच्या
तोंडून मात्र एकही निराशाजनक वाक्य, खंत नसते. अनेकदा वाटायचं हा इतका
काटेरी मार्ग हा निवडला आहे दोघांनी? उपजीवीकेचे इतर अनेक सोपे सहजसाध्य
मार्ग असतांना हा अट्टाहास कशाला? प्रश्न फक्त पोटापुरत मिळवण्याचा
नव्ह्ताच हे मला कळत नव्हतं असं नाही पण वळत नव्हतं हे मात्र खरं.

इंजिनियरींगनंतर
पुण्याहून  मी मुंबईला शिकायला गेले. घर सोडून मी पहिल्यांदा बाहेर पडणार
होते. तिच्याबरोबर केलेला पुणे-मुंबई प्रवास, गप्पा कदाचित रसिका विसरली
असेल; कारण त्यात ती काही वेगळं करत होती असं नसावंच.  नातेवाईक असले तरी
तेव्हा माझ्याजवळ असणारी, मला आपला वेळ देणारी आणि परिचित असणारी पहिली
व्यक्ती रसिकाच.  त्यावेळी तिच्याशी बोलतांना जगण्याकडे बघण्याचा तिचा
दृष्टीकोन किती समंजस आणि प्रगल्भ होता याची कल्पना मला आली. किंबहुना
नात्याच्या बंधनापलिकडे दोन व्यक्ती म्हणून आम्ही बोललो असू ते तेव्हाच. 

एक
डिग्री, आणखी एक डिग्री, एक नोकरी आणखी मोठी नोकरी हे आपल्याला हवं आहे
का? हेच आपलं ध्येय आहे का? हे प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत
राहिले. त्याची मला पटतील अशी समाधानकारक उत्तरे शोधून मी एका रीतीनं
आयुष्याचा स्वीकार केला. पण ते सर्व करत असतांना मनाला आतून एक  घोर लागला
होता. तो म्हणजे रसिका जर या जीवघेणी स्पर्धा असणाऱ्या क्षेत्रात माणुसकी
कायम ठेऊ शकते ती माणुसकी आपल्याला तथाकथित यशस्वी आणि सोपा मार्ग निवडून
तरी शिल्लक ठेवता येईल का?  

 एका तपाहून अधिक काळात आम्ही
दोघी आमच्या वाटेवर चालत राहिलो. ’प्रपंच ’,"घडलय बिघडलय’ याशिवाय काही
मालिका, चित्रपट यात तिच काम सुरु होत. तिन तिच स्वप्न पूर्ण केल, ते करत
असतांना एकाहून एक अवघड प्रसंगाना तोंड दिल. एक अभिनेत्री म्हणून पदड्यावर 
रसिकाला पाहण जेवढ आनंदायी त्याहून जास्त आणि जिवंत अनुभव म्हणजे तिच्याशी
झालेल्या मोजक्या प्रत्यक्ष भेटी. जेवढ मन लावून तिने प्रत्येक भूमिका
केली तसंच तेवढंच जिव्हाळ्याचं तिचं बोलणं. नक्षत्रांचे देणे या
कार्यक्रमात ’आता खेळा नाचा’ हा मुलांकरता असलेला गाण्यांचा कार्यक्रम तिन
केला. रसिकाने त्यातले एक गाणे म्हणून दाखवल्यावर माझ्या मुलीच्या
चेहऱ्यावरचा आनंद काही आगळाच होता.

’खुपते तिथे गुप्ते’ मधे रसिका
म्हणाली ’की गिरीशच्या घरी जातांना एक सून, एक वहिनी असाही रोल म्हणून करून
पाहू जमतो का? गंमतीचा भाग वेगळा, रोल म्हणून जरी केले तरी मी  ते
मनापासून केले.’’

प्रत्येक घरात स्त्रीला असे रोल करावे लागतात आणि
अनेकदा मनाविरुद्ध .. त्यांचे कार्यक्षेत्र अभिनय नाही म्हणून माणसाच सगळ
वागण खर असतं असं कुठे, हा माझ्या मनात त्याचवेळी उमटलेला प्रश्न.अभिनेत्री
म्हणून कधी खरखुर जगण्याचा प्रयत्न केला, अभिनय केला नाही तरी हा सर्व
अभिनयच असावा असा पूर्वग्रह सुद्धा रसिकासारख्यांच्याबाबत असू शकतो ना?

पण रसिकाचे वागणे या सर्वांपलिकडच आहे.  माणुसकीच्या खूप जवळच आहे हाच अनुभव अनेकांना येतो.

तिच्या
बोलण्यातला आत्मविश्वास, उत्साह आणि सकारात्मकता तिला मिळालेल्या यशाबरोबर
वाढत रहिली.  तिच ’स्टार’ असण कधी आम्हाला तिच्या वागण्यातून जाणवत नाही.
ती तस जाणवू देत नसली तरी त्यान ती स्टार आहे हे सत्य बदलत नाही! ’बिल्लू
बार्बर’मधे तिचे काम बघून शाहरूख खानला भेटायच असेल तर रसिकामामीच ती भेट
घडवून आणू शकते हे माझ्या मुलांना वाटल यात काही नवल नाही. 

बिनधास्त,
मनमोकळ बोलणारी रसिका ’खुपते तिथे गुप्ते’ मधे दिसली आणि पुन्हा सगळ्या
आठवणी जिवंत झाल्या.  स्पष्ट विचार, तशीच स्पष्ट मांडणी आणि तेवढ्याच
समर्थपणे आपले प्रवाहाविरुद्ध असणारे विचार मांडण्याची तिची तीच ताकद
पुन्हा जाणवली. फोनवर ती बोलत होती, जिव्हाळ्याने.  मी शिकागोचे अधिवेशन,
माझ्या कविताबिविता यावर बोलत राहिले. या कवितांसाठी एकटीने एकदा भारतवारी
करावी, मुलांना अमेरिकेत ठेऊन, असा महत्त्वाकांक्षी बेत मी तिला सांगितला.
त्यावर तिने तिच्या स्वभावानुसार उत्तर दिले. त्यावर दोघी मनापासून हसलो.
ती एकदम म्हणाली, ’आई ती आईच असते ना.. मुलांना आई हवी असते.." तिच्या जागी
दुसरीकुणी असती तर कदाचित "काय हा कोणत्या नाटकातला संवाद आहे" असे मी
तितकेच पटकन विचारले असते. पण तिला विचारणार नाही.  कारण अर्थातच तिचा
उत्साह आणि सकारात्मक दृष्टीकोनाचा अखंड वाहता झरा.

तो झरा इतकी वर्षे अनेकांमध्ये उत्साह वाटून देखील झुळझुळता आहे, तो तसाच राहावा हेच मला अगदी मनापासून वाटत.