वजने, मापे काही जुने काही नवे !

      कालच एक मित्र भेटले.त्यांच्याशी बोलताना सोन्याचा भाव किती वाढलाय याविषयी बोलताना ( आता फक्त बोलणेच शक्य आहे.) पूर्वी शेराशेराने सोने घालायचे असा उल्लेख निघाला.पण मित्राच्या मते शेर हे वजनाचे परिमाण नसून  मापनाचे होते असे आले,पण मला निश्चित माहीत होते की शेर त्यावेळी दोन्ही पद्धतीने वापरला जायचा. आमच्या गावच्या बाजारात मी खरेदीच्या भानगडीत पडत  नसलो तरी बहिणींनी खरेदी करायची व आम्ही भारवाहक म्हणून काम करायचे अशी श्रमविभागणी होती त्यामुळे आपण किती वजन उचलत आहोत याची कल्पना असे. व ते वजन शेरात असे.

      पण मजेची गोष्ट म्हणजे तेव्हा आमच्या भागात धान्यही वजनाऐवजी मापाने  विकले व खरेदी केले जायचे व त्यासाठी सर्वात मोठे माप खंडीचे होते.त्याहून लहान मण व त्याखालोखाल पायली,अडिसरी,शेर, मापटे, चिपटे, कोळवे व निळवे अशी उतरंड होती.एका खंडीत वीस मण बसत.मणात मात्र दोन प्रकार होते त्यातील एक चाळीस शेरी तर दुसरा सोळा पायल्यांचा म्हणजे चौसष्ट शेरी  त्याला बंगाली मण म्हणत काही प्रांतात तो बारा पायल्यांचाही असे म्हणे.पायली हे परिमाण चार शेराचे तर अडिसरी(अडशेरी) जरी अडीच शेराचे असावयास हवे तरी प्रत्यक्षात दोन शेराचे असे.म्हणजे एका पायलीचा निम्मा भाग. मापटे,चिपटे,कोळवे व निळवे ही शेरापासून अर्ध्या पटीने कमी होत जाणारी मापे होती.धान्य जसे मापाने घेत असू तसे दूध,तेल असे द्रव पदार्थही अर्थातच मापाने घेत असू व त्यामुळेच मेल्या म्हशीला मणभर दूध हा वाक्प्रचार निघाला होता.या वाक्प्रचारावरून एकदा मला एका दैनिकाच्या वाचकांच्या पत्रव्यवहारात भाग घ्यावा लागला होता 

     दैनिकाच्या एका संपादकीयाला शीर्षक होते " गाभण गाईला खंडीभर दूध." असे शीर्षक वाचून मी अगदी चक्रावून गेलो.कारण त्यातून त्या संपादकाचे मूळ म्हणीचे अज्ञान तर प्रकट होत होतेच त्याशिवाय व्यावहारिक ज्ञानही शून्य होते असे दिसले.त्यावर लगेचच एका वाचकाचे पत्र प्रकाशित झाले पण त्यात त्याने आणखीनच घोळ घातला होता कारण त्याने खंडी हे मापनाचे परिमाण नसून वजनाचे होते असे पुन्हा अज्ञानमूलक विधान केले होते.शेवटी मी एक पत्र पाठवून "गाभण गाय व्याल्यानंतर तिला दूध येते शिवाय मूळ म्हण मेल्या म्हशीला मणभर दूध  (म्हणजे एकादी गोष्ट नष्ट झाल्यावर ती फार थोर होती असा गवगवा करणे) अशी आहे हे संपादकांच्या निदर्शनास आणले.त्यानंतर थोड्याच दिवसात त्या संपादक महाशयांनी त्या वृत्तपत्राचा निरोप घेतला अर्थात त्याला "गाभण गाय"कारणीभूत झाली असे काही म्हणता येत नाही.दुधाची म्हणजे द्रवमापनाची मापे मात्र शेर, अर्धा शेर, पावशेर व अदपाव अशीच होती.छटाक पण असावे, कारण  त्यावरूनच छटाकभर दारू ढोसली की कोणीही तत्त्वज्ञान सांगू लागते अशा अर्थाचे वाक्य एकच प्याला नाटकात आहे .अर्थात त्या वयात ते मला कळणे अशक्य होते.

     त्यावेळी चार पैशांचा एक आणा ,१६ आणे एक रुपया ही नाणी असल्यामुळे जेवढे पैसे शेरास तेवढे आणे पायलीस आणि तेवढे रुपये मणास असा तोंडी हिशेब करण्याचा सोपा उपाय असे.पाच शेरांचे एक परिमाणही होते व त्याला पासरी म्हणत.त्यावरूनच एकादी गोष्ट सहज उपलब्ध असेल तर " अशा गोष्टी पैशापायली पासरी मिळतात उगीच दिमाख दाखवू नको." म्हण वापरण्यात येत असे.धडा म्हणून एक पासरीहून मोठे परिमाण पण होते आणि ते   दोन पासरींएवढे होते.  तो कदाचित दहाडा( दहा पदार्थ)चा अपभ्रंश असावा.रुपया सोळा आण्याचा असल्यामुळे पिकाचे प्रमाण सोळा आणे म्हणजे उत्तम व  त्याहून कमी प्रतीचे म्हणजे  दहा आणे, आठ आणे, चार आणे  या पद्धतीने करण्यात येई. एकादे काम उत्तम पार पडल्यास " अगदी सोळा आणे काम झालं बघा" असेही म्हणण्याची प्रथा होती.

      वजनातही खंडी,मण, शेर ही परिमाणे असत व त्याखालोखाल रत्तल म्हणजे अर्धा शेर,पावशेर म्हणजे शेराचा एक चतुर्थांश भाग,तर सव्वाशेर हे अधले मधले माप होते कारण ते रत्तलपेक्षा लहान होते तर पावशेरापेक्षा मोठे होते.म्हणजे पावशेर वीस तोळ्यांचा तर सवाशेर बत्तीस तोळ्यांचा.म्हणजे शेरास सव्वाशेर ही म्हण खऱ्या अर्थाने अयोग्यच होती. पावशेरापेक्षा छोटी परिमाणे अदपाव,छटाक,औंस अशी होती.   एक छटाक पाच तोळ्यांचा अर्थात एका शेरात १६ छटाक बसत.

        सोने जरी शेराने घालणारी  ( आताही किलोने घालणारी आहेतच) माणसे असली तरी खरेदी तोळ्याच्या भावानेच व्हायची व त्यात सगळ्यात लहान परिमाण गुंज हे असे.हे परिमाण गुंज या वनस्पतीच्या बारीक गोळीसारख्या फळाच्या वजनाचे होते.या गुंजेच्या लालभडक रंगावरून रागावलेल्या किंवा आजारलेल्या माणसाचे डोळे गुंजासारखे लालभडक झाले आहेत म्हणत. आठ गुंजांचा एक मासा, बारा मासे एक तोळा अशी ती उतरंड होती.गुंजेला काही ठिकाणी रत्ती असेही म्हटले जाई व ते सगळ्यात कमी वजनाचे परिमाण असल्याने एकाद्याच्या बोलण्यात तथ्य नसल्यास "त्याच्या बोलण्यात रत्तिभर अथवा गुंजभरही सत्य नाही" असे म्हटले जाई.

     वजनी शेर ऐंशी तोळ्याचा असे.बडोद्यात भाजीपालाही वजनी शेराच्या परिमाणात मिळे व मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेणाऱ्यांसाठी खंडेराव मार्केट या प्रमुख बाजारात बाजाराचा स्वतंत्र भागच होता त्या बाजारास पाच शेरी बाजार म्हणत. (अजूनही ते नाव चालूच आहे म्हणतात) तेथे कमीतकमी पाच शेर तरी भाजी घ्यावीच लागे.

        इंग्रजांचा अंमल असून वजनात पाउंड कसा शिरला नाही हे आश्चर्यच आहे.मात्र माणसाचे वजन मात्र पौंडात असे. (शेरात नसे)पण त्या पद्धतीचे शेराशी तुलनात्मक मूल्य त्यावेळी आम्हांस माहीत होते.शेर पाउंडच्या जवळ जवळ दुप्पट वजनाचा म्हणजे पाउंडाला भारीच होता.त्यानंतर नवी परिमाणे वापरात येऊ लागल्यावर आलेला किलो मात्र शेरालाही भारी होता.  त्याचे जुन्या परिमाणाशी तुलनात्मक मूल्य एक किलो शाण्णव तोळ्यांचा असे होते.   ब्रिटिश वजनांचा परिणाम मण या परिमाणावर दिसतो कारण तो शब्द Mound या ब्रिटिश परिमाणाचे अपभ्रष्ट रूप आहे. तसेच ब्रिटिश औंस (Ounce) पण वजनात शिरला व तो पौंडाचा १६वा भाग होता तर एक छटाक दोन औंसाचा होता

    मात्र आम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकताना ब्रिटिश पद्धतीची वजने मापे आम्हाला अभ्यासक्रमात वापरावी लागली व त्यात प्रामुख्याने पौंड हे वजनाचे,तर गॅलन हे मापनाचे परिमाण होते.त्या पद्धतीला एफ.पी.एस.( म्हणजे फूट पौंड सेकंड) पद्धती असेच म्हणत. वजनाचे सर्वात भारी परिमाण टन होते व ते २२४० पौंडाचे होते.या दोन्हींच्या मधले हंड्रेडवेट ११२ पौंडाचे.त्यावेळी वजन करण्याच्या यंत्रांवर  वजन स्टोन व पौंड मध्ये मिळे व त्यामागे "आपका भाग्य जल्दही खुलेगा" वगैरे आपल्याला आनंदित करणारे भविष्य असे.त्या भविष्यावर अं.नि. स.ने बंदी घातली नव्हती (आता तरी कुठे आहे म्हणा ?) हा स्टोन म्हणजे दगड १४ पौंडाचा असे.त्यानंतर मेट्रिक परिमाणे व्यवहारात  आली तरी शासकीय धोरणानुसार काही काळ दोन्ही पद्धती चालू राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांना शिकवणाऱ्या आम्हाला या दोन पद्धतींची तीन पायांच्या शर्यतीची कसरत बरीच वर्षे करावी लागली. त्यानंतर अभ्यासक्रमात आणखी एक बदल घडून आला व त्यात मेट्रिक पद्धतीची जागा एस. आय. पद्धतीने घेतली पण त्याचा वजनामापावर फारसा परिणाम झाला नाही.

           आश्चर्य म्हणजे ब्रिटिश मापन पद्धतीचा ब्रिटनने त्याग करून मेट्रिक पद्धत अवलंबली तरी  अमेरिकेत मात्र अजून पौंड, औंस व गॅलनच आहेत.(अर्थात त्यामागे आम्हीच तेवढे शहाणे हे दाखवण्याचा अमेरिकी बाणाच आहे) त्या तुलनेत दशमान पद्धतीतील नाणेपद्धत,वजने व मापे यांच्याशी आपल्याकडील खेड्यातील लोकांनीही अतिशय झपाट्याने जुळवून घेतले असे म्हणावे लागेल.