लाईफ ऑफ पाय : मला भलताच आवडलेला चित्रपट

म्हणजे काय आहे की -
या समस्त जगातील कोणत्याही गोष्टीचे, वस्तूचे अथवा प्राणिमात्राचे समीक्षण करण्यास मी एक अत्यंत नालायक मनुष्य आहे (हेही समीक्षण त्यात आले असावे.)
याचे कारण असे की एखादी गोष्ट /वस्तू / प्राणिमात्र मला आवडले की भलतेच आवडते आणि वाईसे वर्सा. मग त्यात उडदामाजी असलेले काळे-गोरे मला दिसत नाही. समीक्षा म्हणजे कशी 'ब्यॅलन्स्ड' असली पायजे ह्ये काय आपल्याला जमत नाही.

मागे एकदा 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ'नामक कादंबरीबद्दल प्रेमाचे असेच भरते आले होते आणि आपणही एक समीक्षा लिहावी किंवा गेलाबाजार एखादे रसग्रहण तरी लिहावे अशी प्रबळ इच्छा झाली होती.(अवांतरः 'इच्छा' या शब्दातला च 'चमचा' च असा थेट उच्चारून पहा - मजा येते/मझा येतो - माझी आजी तसा उच्चार करत असे.) पण तसे होऊ शकले नाही.म्हणजे इच्छा पूर्ण झाली नाही. त्याला अनेक कारणे होती. आणि मग आता बर्‍याच दिवसांनी जेहत्ते कालाचे ठायीं समस्त जगात कोणी फक्त तीन लोकांनी लिहिलेली हिंदूचे समीक्षणेच तेवढी कशी योग्य आहेत (पैकी एक डॉ. सदानंद मोरे आहेत हे आठवते, बाकीचे दोन कोण ते कुणाला लक्षात असल्यास कृपया कळवावे) आणि बाकीची कशी बकवास आहेत हे समजल्याने आपण एक बकवास समीक्षण लिहिले नाही याबद्दल हायसे वाटले.

असे बरेचसे भरतेस्वरूप (किंवा भरीत किंवा भारीतस्वरूप) अनुभव गाठीशी असल्याने आणि तसेच आंतरजालावर चित्रपटक्षेत्रातील ज्ञानी मनुष्यें असल्याने 'लाईफ ऑफ पाय' (किंवा पायचे आयुष्य) नामक इंग्रजी चित्रपटाबद्दल त्या ज्ञानी मनुष्यांपैकी कोणीतरी भलेबुरे दोन शब्द लिहील असे मनापासून इच्छित (च - चमच्यातला) होतो. पण हाय रे दैवा! इतके दिवस वाट पाहूनही त्यावर कोणीच काही लिहिले नाही. तेव्हा हे कार्य करणे आपल्याच नशिबी लिहून ठेवले आहे असे जाणवून हे शिवधनुष्य पेलण्याचा एक शबल प्रयत्न मी करू पाहत आहे.

'सोनी म्यॅक्स' या टीव्ही च्यॅनलवर ऑस्कर नॉमिनेशन्सवर एक टॉक शो सुरू होता. त्यात बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध आणि प्रथितयश दिग्दर्शक श्री. करण जोहर यांनी फारच महत्त्वाचे विधान केले. ते म्हटले - "लाईफ ऑफ पाय ही मूळ कादंबरी मी पाच-सहा वर्षांपूर्वीच वाचली होती. पण तिच्यात चित्रपट बनवण्याचा काही जर्म मला दिसला नाही. ती काही खास कादंबरी वाटली नाही मला. 'आंग ली'ने कसा काय बुवा या कादंबरीवर चित्रपट बनवला? थ्री-डी गिमिक्स वापरून काहीतरी केले आहे झाले. पण मला तरी तो काही ऑस्कर नॉमिनेशनवाला चित्रपट वाटला नाही." - - अशापैकी महनीय व्यक्तींनी हे मत व्यक्त केल्यावर हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे असे मला वाटले आणि माझा अंदाज चुकला नाही.

समीक्षणाच्या सुरुवातीला किंवा नमनाला विहीरभर तेल घालून (जसे मी येथे केले आहे)झाल्यावर चित्रपटाची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रघात आहे. आणि त्याबरोबरच एक धोक्याची सूचना ( पुढचा प्यारेग्राफ चित्रपटाची कथा फोडतो, तेव्हा ज्यांना तो पाहायचा आहे त्यांनी हा प्यॅरा वाचू नये इ.) लिहायचा प्रघात आहे. या प्रघाताला अनुसरून कथा आणि धोक्याची सूचनाही लिहायला घेणार होतो. पण त्याची काहीही गरज नाही. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि ज्यांना तो समजला आहे त्यांनी हे संपूर्ण समीक्षण वाचण्याची गरजच नाही. त्यांनी इथूनच कन्नी काटली तरी चालेल. किंवा आता इथेपर्यंत वाचलेच आहे तर पुढेही वाचा, बापडेहो.

तसे म्हटल्यास या चित्रपटाची कथा सांगितली काय किंवा न-सांगितली काय? त्याने काहीच फरक पडत नाही. (ऑं? खरेच.) (म्हणजे हाच तर त्या चित्रपटाचा वरच्या आवरणातला संदेश आहे.)थोडे आत गेले तर चित्रपट 'ईश्वर आहे की नाही?' या अनादि-अनंत प्रश्नाचे काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.(मंडळी सरसावून बसली असावीत.)

चित्रपटाची बाह्यकथा (म्हणजे यान मार्टेल या लेखकाने लिहिलेल्या मूळ कादंबरीची कथा)म्हणजे एक सरळसोट निवेदन आहे. [After studying philosophy at Trent University in Peterborough, Ontario, Martel spent 13 months in India visiting mosques, churches, temples and zoos, and spent two years reading religious texts and castaway stories. - विकी] भारतात इतर जगाच्या तुलनेने कमी खर्चात बराच काळ राहता येते म्हणून एक गरीब फ्रेंच लेखक कादंबरी लिहिण्यासाठी पाँडिचेरीत राहत असता एका भारतीय व्यक्तीच्या संपर्कात येतो. (पण त्याची ती मूळ कादंबरी पूर्ण होत नाही.) ती भारतीय व्यक्ती त्याला आपल्या 'पाय पटेल'(पिसिन मोलिटर पटेल) नामक भाच्याच्या आयुष्यात घडलेल्या विचित्र कथेबद्दल सांगते. ही कथा एखाद्या कादंबरीचा विषय बनू शकते असेही सुचवते.तेव्हा तो फ्रेंच लेखक पाय पटेलला भेटायला कॅनडात जातो आणि ती कहाणी ऐकतो. त्याचे हे सर्व निवेदन म्हणजेच 'लाईफ ऑफ पाय' कादंबरी.

या पाय पटेलने फ्रेंच लेखकाला सांगितलेली कहाणी मात्र अशी सरळ नाही. ती 'अकटस्य विकटो' आहे. म्हणजे ती तशीच असणे पाय पटेलला अपेक्षित आहे. त्याला कदाचित कापूसकोंड्याचीही गोष्ट अपेक्षित असेल असे कोणी म्हणेल. पण तसे नाही. कारण सुरुवात आणि शेवट हे दोन बिंदू निश्चित असणे त्याला अपेक्षित आहे. त्यांमध्ये जे काही घडते ते अकटस्य विकटो असू शकेल किंवा अत्यंत तर्कशुद्ध (तर्कदुष्ट म्हणा हवे तर)असेल - त्याने काय फरक पडतो असा पायचा सवाल आहे. (आणि पर्यायाने लेखकाचाही.) चित्रपटभर एक अतर्क्य कहाणी सांगणारा, अ‍ॅब्सेंट माईंडेड वाटणारा पाय पटेल शेवटच्या काही मिनिटांत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून वाचकाला/प्रेक्षकाला गारद करतो.(आणि इर्रफानखानने या प्रॅक्टिकल पण ईश्वराला मानणार्‍या पायला अत्यंत ताकदीने उभे केले आहे.)

चित्रपट हा एक भूलभुलैया आहे. विचार करायला लावतो. 'पाय' या नावाबद्दलच खूप घोळ घातला आहे लेखकाने. त्याचा अर्थ सांगायला बरीच रिळे (किंवा डीव्हीडीवरचे बरेच सेक्टर्स म्हणा)खर्ची पडली. मुळात फ्रेंच स्विमंग पूलचे नाव - पिसिंग (म्हणजे मुतर्‍या) पटेल हे त्याच्या नावाचे विडंबन आणि ते नाव पुसावे म्हणून पाय पटेलने केलेले प्रयत्न हेही स्वप्नवत वाटतात. पण मला काय जाणवले ते सांगतो. 'पाय' ही संख्या संमोहक आहे. (भल्याभल्यांना भुरळ घालते.)'लाईफ ऑफ पाय इज नेव्हर रिपीटिंग अँड नेव्हर एंडिंग' (- हे माझे इंटरप्रिटेशन.)

काळातील दोन बिंदूमध्ये एक अतिरंजित वाटणारी कथा घडू शकते किंवा एक तर्कशुद्ध वाटणारी कथा घडू शकते. एका कथेत माणसाळत जाणारा वाघ, तरंगणारी बेटे, मनुष्यभक्षी वनस्पती असू शकतात तर दुसरीत नरभक्षण करून स्वतःला जगवणारी माणसे असू शकतात. आयुष्याचेही असेच आहे. आयुष्य सरळसोट असू शकते किंवा अनेक चित्रविचित्र घटनांनी भरलेले असू शकते. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमध्ये जे काही घडू शकते ते सर्व म्हणजे आयुष्य. पण ज्या कथेत वाघ आहे, बेटे आहेत ती कथा रंजक वाटते. तद्वत ज्या आयुष्यात ईश्वर आहे ते आयुष्य रंजक आहे असे आपले मत पाय पटेलच्या तोंडून लेखक व्यक्त करतो.

व्यामिश्रता हेच या चित्रपटाच्या कथेचे वैशिष्ट्य. आरंभ,गणिते,तर्क,शक्यता,उपमा,कार्यकारणभाव,शेवट अशा सर्वच पैलूंवर विचारतरंग निर्माण करणारे हे कथानक आहे. इतक्या ताकदीच्या कथानकावर चित्रपट निर्माण करणे धाडसाचे होते. योग्य हाताळणीखेरीज हा चित्रपट फसला असता.

या चित्रपटाचे नेमके यश कोणते? तर मूळ कथेला दिग्दर्शकाने प्रेक्षकांपर्यंत सरळ पोचवले. जसेच्या तसे. पायच्या कथेतला अकटस्य-विकटोपणा अंगावर यावा ही कथेची गरज होती.त्यातली काही दृश्ये जवळजवळ अ‍ॅनिमेशनपटातली वाटतात. (आंग लीच्या जागी मी असतो तर कदाचित निवेदनाचा भाग टू-डी आणि पायच्या कहाणीचा भाग थ्री-डी केला असता. हॉ, हॉ, हॉ - म्हणायला माझे काय जाते? पण कदाचित तुम्हालाही ते पटेल. पिक्चर पहा.)

दबंग२ जिथे लागला होता त्याच्या शेजारच्याच स्क्रीनवर हा पाहिला. हाही विचित्र योगायोग असावा. (जास्त खोलात विचार केला तर दबंग२ पेक्षा सरळसोट कहाणी आणि अकटस्य विकटो सादरीकरण कोणते असेल? दबंग२ आणि लाईफ ऑफ पाय हे चित्रपटसृष्टीचे दोन धृव आहेत.)

कदाचित इतकेच नसेलही. इतर कोणा प्रेक्षकाला 'लाईफ ऑफ पाय'मधून आणखी काही जाणवेल.एखाद्या शेरामधले शब्द स्पष्ट पण त्याचा अर्थ संदिग्ध पाहिजे.त्याचा अर्थ बहुपदरी पाहिजे. ज्याचा जसा अनुभव तसा त्याला तो भिडला पाहिजे.तरच तो शेर श्रेष्ठ! (नाही का,चित्तरंजन?)या चित्रपटाबाबतही असेच म्हणता येईल. किंवा 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीबाबतही असे म्हणता येईल.

लाईफ ऑफ पाय आणि हिंदूमध्ये मला एक समान स्वर ऐकू आला. तो एक स्वर ऐकण्यासाठी ऐकणार्‍याचा कान 'हिंदू' असला पाहिजे. लाईफ ऑफ पाय कादंबरीच्या लेखकाचा कान दोन वर्षे तेरा महिन्यांत हिंदू झाला.अँग ली ला हा चित्रपट बनवावासा वाटला म्हणजे त्याला तो स्वर ऐकू आला.

शेवटी एक वाद निर्माण करणारे विधान - 'कान हिंदू असतील तर आपोआपच शांतिमंत्र ऐकू येईल'.