रिकामटेकड्यांचा अहवाल

     एक सुप्रसिध्द देशी साहित्यिक रा.रा. यांनी आणखी एक तीर नेमाने सोडला आणि रसिकांना, आज उदाहरणार्थ, एक नवा साक्षात्कार झाला. साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, हा तो साक्षात्कार  होय. त्यांच्या या विधानाचा स्थूलमानाने विचार करता साहित्य संमेलनाचा जरा मागोवा घ्यावा असे वाटले. त्या मागोव्यातून डोळ्यांसमोर आलेला हा अहवाल -  
    पहिले ग्रंथकार संमेलन १८७८ मध्ये भरले. भरवणारे  बहुधा रिकामटेकडे होते म्हणूनच त्यांनी हे संमेलन घेतले. चौथ्या संमेलनात महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. त्यामागील कारण असे की, परिषद स्थापन करण्याची गरज नव्हती पण कोणाचाच वेळ जात नव्हता म्हणून काही कागद आणले, ठराव केला, नाव ठेवले. वेळ उत्तम रीतीने व्यतीत केला, याबद्दल संबंधितांचे अभिनंदनही झाले. येथून सुरुवात होऊन १९६४ पर्यंतची सर्व साहित्य संमेलने महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवली. परिषदेला दुसरा कामधंदा नसल्याने तिचा विशेष पुढाकार होता.  संमेलने भरवणाऱ्यांनाही नोकरी किंवा व्यवसाय काहीही नव्हते म्हणून त्यांनी ही सर्व  संमेलने भरवली. ही संमेलने भरविण्यामागे काही निश्चित उद्देश होते. १. संमेलने भरविण्यात चांगला वेळ जाईल. २. सर्व रिकामे साहित्यिक व रसिक एकत्र जमतील. त्यामुळे एक पुण्यकर्म केले जाईल. ३. एकमेकांची चांगली ओळख होईल. पुढे या ओळखीचा उपयोग रिकामपणच्या उद्योगांकरिता होईल. सन १९६४ नंतर विदर्भ, मराठवाडा, गुलबर्गा, मध्यप्रदेश, हैदराबाद आदी घटक संस्थांची स्थापना करण्यात येऊन या वेळघालवू संमेलनव्यवहारात त्यांनाही सामील करून घेण्यात आले. एका चांगल्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांनीही आनंद व्यक्त केला.  लोकसंख्या वाढत गेल्याने बेकारीचा प्रश्न निर्माण झालाच होता. या सर्व बेकारांनी नंतरच्या सर्व संमेलनात सक्रीय हजेरी लावली व संमेलने यशस्वी केली. आज संमेलनांना सव्वाशे वर्षे होऊन गेलेली आहेत आणि रिकामे लोक सतत वाढतच असल्याने अजूनही संमेलने सुरुच आहेत. संशोधनातील काही महत्वाचे निष्कर्ष असेः
१. महाराष्ट्रात खूप रिकामटेकडे रसिक आहेत. साहित्यिकांना पाहण्याकरिता, भेटण्याकरिता काही जण येतात. खरे तर त्यांची छायाचित्रेही पाहता येतात. प्रत्यक्ष भेटण्यात अर्थ नसतो. तरीही ते येतात, तीन दिवस संमेलनाचा आस्वाद घेतात, आनंदी होऊन जातात. आनंदी होण्याचे इतरही बरेच मार्ग आहेत, मग ते येथेच वेळ का घालवतात हे कळण्यास मार्ग नाही.(विशेष नोंदः मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे का, याचे कारण येथे आहे. संमेलने भरवत बसण्याऐवजी उद्योगव्यवसायात लक्ष घातले असते तर मराठी माणसाची आणखी प्रगती झाली असती.)
२. महाराष्ट्रात खूप रिकामटेकडे साहित्यिक आहेत. कळ्यांचे निश्वास, पानिपत, उपरा, झोंबी, व्यक्ती आणि वल्ली, गोलपीठा, अमृतवेल, मी कसा झालो अशासारख्या साहित्यकृती लिहिणाऱ्यांना भरपूर वेळ होता म्हणूनच त्या लिहिल्या गेल्या.
३. प्रकाशक व विक्रेते हे तर सर्वाधिक रिकामटेकडे आहेत. उगाच शंभर ते दोनशे कागदांचे संकलन करतात, त्यावर कादंबरी, कथा असे निरर्थक शब्द छापतात आणि रिकामटेकडे वाचक ते छापील बाड विकत घेऊन दिवसाचा बहुमोल वेळ वाया घालवतात.  कागद विकून पैसे मिळविण्यापेक्षा ते तयार करण्याचे कारखाने मराठी प्रकाशकांनी टाकले असते तर स्वर्गात त्यांची जागा नक्की झाली असती. समेलनातील स्टॉल तर सर्वात बिनडोक व वेळ घालवण्याकरिता उत्तम जागा आहे.  ज्याला पुस्तक घ्यायचे आहे तो दुकानात जातोच. एकाच ठिकाणी भरपूर व सर्व विषयांवरील पुस्तके ठेवल्याने रसिकांची सोय तर होत नाहीच उलट गोंधळ होतो ! 
४. राज्य सरकारलाही पैशांचा विनियोग चांगला कसा करावा, याचे कारण न सुचल्याने त्यांनी संमेलनासारख्या अत्यंत बिनमोल अशा संमेलनाकरिता अनुदान देण्याचे ठरवले. त्यापेक्षा दारुभट्ट्या, बीअर बार करिता निधी वापरला गेला असता तर सत्कारणी लागला असता !
५. संमेलनातील कथाकथने, कवीसंमेलने निरर्थक असतात. असे एकत्र भेटण्याने रसिकांना दोन ते तीन दिवसांत साहित्यकृतींचा आनंद देता येत नाही, एकमेकांच्या ओळखीही होत नाहीत, कोणतीही साहित्यिक समृध्दी होत नाही. त्यापेक्षा घरी बसलेले उत्तम.   
६. ज्या गावात संमेलन घेतले जाते तेथील एखादी जागा, सभागृह तीन दिवसांकरिता रिकामटेकड्यांमुळे अडवली जाते. त्यापेक्षा महसुलात भर टाकणारे कार्यक्रम घेतले असते तर पालिकांना उत्पन्न मिळून रस्त्यावरचे दिवे, गटार साफ करणे, डांबरीकरण यासारख्या त्यांच्या अत्यंत आवडत्या कामांमधे लक्ष द्यायला वेळ मिळाला असता.
७. कोणत्याही शहराला कधीही साहित्यिक भरण पोषणाची गरज नसते. समाज केवळ अन्न, वस्त्र, निवारा, टीव्ही, मोबाईल यांच्या आधारानेच चालतो त्यामुळे यापुढे साहित्य संमेलने भरवावीत की भरवू नयेत याबाबतचा निर्णय समाजाने घ्यावा. याबाबत जनहित याचिकाही दाखल करता येईल. अर्थात, ही याचिका जे लोक खूप व्यग्र आहेत तेच दाखल करू शकतील. कारण रिकामटेकडे लोक साहित्य संमेलने भरवितात. 
८. साहित्य संमेलने ही मराठी समाजातील एक अडगळच बनून राहिलेली आहे. जसे काही झूल पांघरलेले साहित्यिक अडगळ बनून राहिलेले आहेत तशी. 
८. हे देशी रा.रा.सर स्वतःच एका ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते बहुधा खूप व्यग्र माणसांनी भरवलेले होते.