संतांचा उपदेश

महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्या अभंगांतून धनाला, उपभोगांना (आणि ते मिळवण्याच्या प्रयत्नांना) तुच्छ लेखण्याचा जो उपदेश केला, त्यामुळे महाराष्ट्र निष्क्रीय झाला, मराठी लोकांमधली स्पर्धात्मक वृत्ती संपली, ते आळशी झाले आणि त्यामुळे एकूणच सर्व महाराष्ट्राचे वाटोळे झाले, असा एक बराच लाडका विचारप्रवाह आपल्याकडे आहे. याबाबत बोलताना, तुकाराम महाराजांच्या 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या उक्तीचा प्रामुख्याने आधार देण्यात येतो. काही दिवसांपूर्वी 'मनोगत' वर देखील याच विषयावर चर्चा झाली होती. तेव्हा, या मुद्द्याबरोबरच, संतांनी लोकांना अध्यात्मिक उपदेश करण्याऐवजी वैज्ञानिक प्रगती करण्याचा उपदेश करायला हवा होता, किंबहुना स्वतः संतांनी देखील वैज्ञानिक बनायला हवे होते असाही विचार मांडण्यात आला. प्रस्तुत लिखाणात या दोन मुद्द्यांवर काही विचार मांडायचे आहेत.


१) संतांच्या उपदेशामुळे मराठी लोक निष्क्रीय झाले, हे मला पटत नाही. मला असे वाटते की मराठी लोक मुळातच जिवापाड श्रम करण्याच्या (जसे गुजराथी/मारवाडी ई. करतात) विरुद्ध आहेत. पोटापुरते कमावून इतर वेळ आरामात अगर करमणुकीत घालवणे त्यांना आवडते. आपली ही वृत्ती सरळ सरळ स्वीकारण्याऐवजी त्यांनी याला संतोपदेशाचा मुलामा देऊन तिचे समर्थन करणे पसंत केले.


तुकाराम महाराजांचे उदाहरण घेऊ. त्यांनी 'ठेविले अनंते' खेरीज इतरही भरपूर उपदेश केला आहे. उदा. 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी', 'भले तरी देउ कासेची लंगोटी', 'जे का रंजले गांजले', 'तुटो हे मस्तक फुटो हे शरीर'... मग, मराठी माणसांनी ज्या निष्ठेने 'ठेविले अनंते' पाळायचे ठरवले, त्याच निष्ठेने हा इतर उपदेश देखील का पाळला नाही ? किती माणसांनी तीर्थक्षेत्री जाण्यापेक्षा आसपासच्या सज्जन माणसांमध्ये देव पाहीला ? किती लोकांनी त्यांना जे भले वाटतात अशा लोकांना त्यांच्या अडचणीत स्वतःजवळची अगदी शेवटचीही गोष्ट दिली, किंवा अन्यायाचा प्रतिकार केला ? किती लोकांनी आपली मुलेबाळे आणि आपले सेवक (गडी/मोलकरीण) यांना एकाच नजरेने पाहीले ? किती लोकांनी आपल्या प्राणापेक्षाही आपल्या नामजपाला महत्वाचे मानले ?


जर मराठी लोकांनी हा इतरही उपदेश पाळला असता, तर आजचे महाराष्ट्राचे चित्र अधिक चांगले दिसले असते यात मला शंका नाही. कदाचित महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात समृद्ध नसताही, पण खात्रीने, किमान सगळ्यांच्या अन्न-वस्त्र-निवार्‍याची सोय झाली असती, आणि लोक परस्परांशी सहानुभूतिने वागले असते.


तेव्हा, एखाद्या संताचा संपूर्ण उपदेश न पाळता, त्यातला फक्त आपल्याला सोयीस्कर भाग पाळायचा, आणि वर आपल्या दुःस्थितीबद्दल त्या संतालाचा जबाबदार धरायचे हा मला ढोंगीपणा वाटतो. हेच विधान इतर संतांच्याही उपदेशाबाबत करता येईल. 


२) संतांनी वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने का प्रयत्न केले नाहीत ?


आज आपली कितीही वैज्ञानिक प्रगती झालेली असली तरी माणूस सुखी झालेला नाही. त्याची भिती, अस्वस्थता, असुरक्षिततेची भावना, स्पर्धात्मक वृत्ती कमी न होता वाढत आहे. याला कारण म्हणजे माणसाच्या मनोभूमिकेत अनेक शतकात फारसा फरक झालेला नाही; माणूस तोच तो राहीला आहे. त्यामुळे केवळ वैज्ञानिक प्रगतीने माणूस सुखी होणार नाही, त्याकरता प्रथम त्याला स्वतःमध्ये बदल घडवला पाहीजे हे उघड आहे. संतांनी देखील हेच केले आहे. आधी त्यांनी स्वतः प्रयत्न करुन स्वतःला बदलले, आणि जेव्हा त्यांना अनुभवाने कळले की याच मार्गाने माणूस सुखी होईल, तेव्हा त्यांनी या मार्गाचा उपदेश केला.


याबाबत एक साधा दृष्टांत द्यायचा झाला, तर पायाला खडे बोचू नयेत, म्हणून दोन उपाय करता येतील. एक म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणची सर्व जमीन एखाद्या मऊ आवरणाने अच्छादीत करणे आणि ते आच्छादन टिकवून ठेवणे, किंवा आपल्या पायांना चपलांनी आच्छादीत करणे. यापैकी दुसरा उपाय अधिक मूलभूत आणि व्यवहारी आहे.



म्हणूनच संतांनी सुखाकरता, वैज्ञानिक प्रगतीवर भर देण्याऐवजी माणसाला बदलण्याच्या उपायांवर भर दिला. आणि म्हणूनच, संतांचा हा दृष्टीकोन अधिक मूलभूत, आणि अधिक 'वैज्ञानिक' आहे असे मला वाटते.