ग्रीक मराठी

ग्रीक मराठी म्हणजे काय ते सांगतो. पण त्या आधी, नुकत्याच पार पडलेल्या साहित्य सम्मेलनात अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणातील दोन उतारे, लोकसत्ता या वर्तमान पत्रातून घेतलेले.

"काही समीक्षक अशी तक्रार करतात की, माझ्या कथेतील पात्रे खूपदा इंग्रजी शब्दांचा वापर करतात. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा विकसित होते, समृद्ध होते- असे मला सुचवायचे आहे. आज शुद्ध समजले जाणारे बरेच शब्द कधीकाळी बाहेरूनच आले होते, हे विसरून चालणार नाही. इंग्रजी भाषा विज्ञानाची भाषा म्हणून मान्यता पावलेली भाषा आहे. जगभर ती वापरली जाते आणि म्हणून टी.व्ही., टेलीफोन, फॅक्स, रडार, रॉकेट हे इंग्रजी शब्द कथांमधून वापरले जाणे स्वाभाविक आहे. तज्ज्ञ लोकांच्या समित्या या इंग्रजी शब्दांचे कृत्रिम मराठी भाषांतर देऊ शकतील. पण सामान्य वाचक जर अशा शब्दांना स्वीकारू इच्छित असेल, तर ते शब्द वापरण्यावर बंदी का असावी?"

आता याच्या वर आजच्या लोकसत्ता मधे आलेल्या एका लेखातील काही अंश :

दुसरा मुद्दा जयंतराव, तुम्ही इंग्रजी शब्दांच्या वापराविषयी उपस्थित करता. तो अत्यंत रास्त. आपल्याकडे अनेकांचे मराठीप्रेम हे इंग्रजीविषयीच्या अपंगत्वातून आलेले आहे हे कटू सत्य आधी लक्षात घ्यायला हवे. अशा अपंगत्वाचा स्पर्शही न झालेले आपल्यासारखे काही थोडे मान्यवर चांगल्या, रसाळ मराठीत संवाद साधू शकतात. अन्यांचे मात्र हे अपंगत्व लपवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात मराठी उघडे पडते आणि त्यांना इंग्रजीचे पांघरूण मिळत नाही. अशी भीती नसलेली इंग्रजी भाषा योगा, गुरू असे अनेक अन्यभाषी शब्द आपलेसे करते आणि आपले कथित शुद्ध मराठीवादी आपल्याला इंग्रजीही कसे चांगले येते याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. . . . कथेच्या ओघात झालेले देहदर्शन ज्याप्रमाणे अश्लील वाटत नाही, त्याप्रमाणे वातावरणाशी सुसंगत परभाषाप्रयोग हा अजिबात भाषिक अपमान नसतो. 

आता मुद्दा : मराठीचा अट्टाहास धरून इंग्रजी शब्दाला काही तरी बोजड मराठी शब्द बनवायचा, काय साध्य होत या खटाटोपतून ? मागच्या वर्षी लोकसत्ता मध्ये कोणी अमृतांशू नेरूरकर इंटरनेट संबंधित विषयां वर एक सदर लिहीत असत. त्यांच्या लेखातील काही शब्द - ध्वनिवर्णपटांचा, तंतू प्रकाशिकी, असामायिक, वस्तुजालाच्या, सांकेतिक लिपीबद्ध. तंतू प्रकाशिकी म्हणजे ऑप्टिकल फायबर हे कदाचित काही लोकांना कळेल. पण ध्वनिवर्णपट किंवा असामायिक म्हणजे काय, हे किती लोकांना कळेल ? बहुतेकांना कळणार नाही, याची जाणीव असल्याने ते ब्रॅकेट मध्ये इंग्रजी शब्द पण लिहीत असत.  ध्वनिवर्णपटांचा (स्पेक्ट्रम); तंतू प्रकाशिकी (ऑप्टिकल फायबर); असामायिक (डेडिकेटेड); वस्तुजालाच्या (इंटरनेट ऑफ थिंग्स); सांकेतिक लिपीबद्ध (एन्क्रिप्टेड). मनोगत मधले ऊर्ध्वश्रेणीकरण, विपत्र हे शब्द पण याच प्रकारचे. विपत्र म्हणजे ई-मेल हे केवळ तो शब्द जिथे वापरला होता त्या संदर्भा मुळे मला कळले. काय साध्य होत या खटाटोपतून ?

इंगजीत "ग्रीक" हा शब्द अगम्य लिखाणा करता वापरतात. तर, ध्वनिवर्णपट, तंतू प्रकाशिकी, असामायिक, वस्तुजाल, ऊर्ध्वश्रेणीकरण, विपत्र हे सर्व "ग्रीक मराठी" आहे. असे  ग्रीक मराठी लिहून मराठीच  संवर्धन तर होत नाहीच, उलट वाचक मराठी पासून ठेवबंद होतात.  (ठेवबंद म्हणजे काय ? बसा डोके खाजवत ) 

याच अनुषंगाने आणखीन एक मुद्दा - जगातल्या बहुतेक भाषांनी रोमन अंक अंगीकारले आहेत. इंग्रजी नव्हे, रोमन. १ आणि 1 मधला फ़रक भाषेचा नाही, लिपीचा आहे. १ देवनागरी आहे, मराठी नाही, आणि 1 रोमन आहे, इंग्रजी नाही. भाषा मराठी असली व लिपी देवनागरी असली तरी अंक रोमन वापरावेत.