महाभारत कथा
महाभारताचा काळ अतिप्राचीन आहे, त्या काळातील अनेक चालीरीती आता समाजमान्य नाहीत. खरे तर त्या काळातील न्याय, नीती आणि समाजव्यवस्था इत्यादींच्या संकल्पना आधुनिक काळापेक्षा प्रगत आणि पुढारलेल्या असाव्यात असे दिसते. वंश, वारस, वारसाहक्क, विवाह इत्यादी संदर्भातील नियम खूपच व्यावहारिक वाटतात. त्या काळातील चारित्र्य, योनिशुचिता इत्यादी संबंधातील दृष्टिकोन, नियम आणि चालीरीती आधुनिक काळात मान्य होऊ शकत नाहीत.
समाजव्यवस्था आणि नियम यामध्ये असा बदल घडण्याचे कारण अज्ञात आहे. कदाचित बदलत जाणारी सामाजिक स्थिती काही विशिष्ट समूहांचे वर्चस्व वाढणे, सत्ता बदल आणि सांपत्तिक स्थिती अशा काही कारणांनी बदल घडले असतील. प्राचीन काळात राजा सर्वांचा अधिपती असे, त्याच्याकडे सर्वाधिकार असत. राजा म्हणेल तीच पूर्व दिशा आहे असे मान्य करणे बंधनकारक होते. राज्य, सिंहासनाचा अधिकार हे सारे वंशपरंपरागत मिळत असत. एकाच कुळातील अनेक पिढ्या सत्ताधारी असत आणि अगदी क्वचित त्यामध्ये बदल घडून येई.
राजसत्तेवर काही प्रमाणात धर्मसत्तेचा अंकुश होता. राजदरबारात शास्त्री, पंडितांना मानाचे स्थान होते. न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था इत्यादी विषयामध्ये राजाला सल्ला देण्याकरता विद्वान ब्राह्मण, शास्त्री, पंडित राजसभेमध्ये उपस्थित असत. विद्यादान आणि धार्मिक कर्मे करण्याचा अधिकार ब्राह्मणजातीकडेच होता. तप:श्चर्या करून योगसामर्थ्य प्राप्त केलेल्या ऋषी, मुनींना सर्वत्र आदरपूर्वक सन्मानाने स्थान दिले जात असे. असे असले तरीही राजा हाच राज्यातील सर्वोच्च अधिकारी होता.
जन्मांध असलेला धृतराष्ट्र आता हस्तिनापूर राज्याचा सर्वाधिकारी होता. प्रमुख सल्लागार महाज्ञानी विदुर होते त्यांना न्याय, नीती, धर्म आणि राज्यकारभाराचे सखोल ज्ञान होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते महाराजांचे सावत्र बंधू होते. पितामह भीष्म दरबारातील अतिमहत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा शब्द नेहमीच निर्णायक होता. हस्तिनापुराच्या रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती आणि निष्ठेने त्याची पूर्ती केली होती.
सध्याची हस्तिनापूर राज्याची स्थिती विलक्षण आहे. पंडूराजा, ज्याने आरोग्यासंबंधी कारणाने राज्यत्याग केला होता, तो किंवा त्याचा उत्तराधिकारी असलेला धृतराष्ट्र आणि विद्वान विदुर हे तिघेही नियोगाद्वारे जन्मलेले वारस आहेत. पितामह भीष्म हेच खरे कुरुवंशज म्हणता येतील, परंतु त्यांनी राजसिंहासनावर कधीच हक्क सांगितला नाही. पंडूराजा आणि धृतराष्ट्र विवाहित आहेत परंतु अपत्यहीन, पुत्रहीन आहेत.
हस्तिनापूर साम्राज्याचे भवितव्य पुन्हा एकदा अनिश्चित अवस्थेत होते. गांधारी पुत्रप्राप्तीसाठी महादेवाची उपासना करत होती. कुंती आणि माद्री पतीसमवेत रानोमाळ वनवासी आयुष्य जगत होत्या.
गांधारी पतिव्रता होती आणि भगवान शिवशंकराची भक्त होती. तिची भक्ती आणि निष्ठा पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी तिला वरदान दिले -- "शतपुत्रा सौभाग्यवती भव"
गांधारी शंभर पुत्रांची माता होणार होती. यासंदर्भात एक कथा अशी आहे की गांधारीला एक दिव्य रत्न प्राप्त झाले होते. कालांतराने ते फुटून त्याची शंभर शकले झाली आणि त्यातून शंभर पुत्र जन्माला आले म्हणे. ..
गांधारीचे शंभर पुत्र कौरव म्हणून ओळखले जातात, त्यापैकी ज्येष्ठ पुत्र दुर्योधन. गांधारीने एका कन्येलाही जन्म दिला होता, तिचे नाव दु:शला.
धृतराष्ट्रावर राज्याची जबाबदारी सोपवून महाराज पंडू, कुंती आणि माद्रीसह अरण्यवासी झाले होते. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत असे. महाराजांना मुक्तीची ओढ लागलेली होती, मृत्यूपश्चात त्यांचा आत्मा मुक्त होईल? का पुन्हा जीवन-मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतेल? हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक आश्रमांना भेटी दिल्या, तिथल्या ऋषी मुनींबरोबर संवाद साधला. परंतु त्यांचे समाधान होईल असे उत्तर त्यांना मिळत नव्हते. वनवास पत्करला तरी ते राजकारण विसरलेले नव्हते. अरण्यातील अन्य जाती जमातींबरोबर राजकीय संबंध त्यांनी प्रस्थापित केले होते. या सर्व काळात प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी याकरता औषधोपचार चालू होतेच. त्यांची प्रकृती सुधारण्याकरता, आजार बरा होण्याकरता परिणामकारक असतील अशा औषधी वनस्पती असलेली जंगले, पर्वत रांगा त्यांनी धुंडाळल्या. पण त्या सर्वाचा उपयोग होत नव्हता. त्यांना मन:शांती मिळत नव्हती आणि प्रकृती खालावत होती, मृत्यू समोर दिसत होता.
महाराजांना मुक्तीचे वेध लागले होते, मृत्यूपश्चात उत्तम गती प्राप्त व्हावी ही त्याची इच्छा होती. त्याकरता काय उपाय योजना करावी? असा प्रश्न ते विविध आश्रमातील ऋषी मुनींना विचारत होते. काहींनी यज्ञयाग करण्यास सांगितले तर काहींनी ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला. पण सर्वांनीच त्यांना एक समान आणि मूलभूत अशी आवश्यकता म्हणजे पुत्रप्राप्ती असे सांगितले होते. पुत्रप्राप्तीविना उत्तम गती मिळणे दुरापास्त. मृत्यूपश्चात चितेला अग्नी देण्यास पुत्र असेल तरच आयुष्याचे सार्थक होईल अन्यथा सारे व्यर्थ आहे.
प्राचीन काळातील या समजुती .. परंतु भारतदेशात अजूनही त्या प्रचलित आहेतच. अजूनही तशाच अंधश्रद्धा, अपसमजुतींचा पगडा जनमानसावर आहे. वैद्यकशास्त्राची प्रगती झाली, अनेक अज्ञात तथ्ये सामोरी आली तरीही अजून पुत्रप्राप्तीसाठी पूजा, नवस, होमहवन केले जातात. घराण्याला वारस देऊ न शकणाऱ्या स्त्रियांचा छळ केला जातो, "अर्थो हि कन्या परकीय एव" (कन्या म्हणजे परक्याचे धन) आणि पुत्र म्हणजे वंशाचा दिवा असेच पूर्वापार समजले जाते. या अडाणीपणाला काय म्हणायचे?
पंडूराजाच्या दोघी पत्नी होत्या पण संतानप्राप्ती झालेली नव्हती. कुंतीचा विवाहापूर्वी जन्म जन्मलेला पुत्र, पंडूपुत्र म्हणवला जाऊ शकत नव्हता आणि त्याच्याबद्दल कदाचित कुणाला माहिती असणे असंभव वाटते.
इथे आणखी एक उपकथा आहे.
पंडूराजाला (म्हणे) एका ऋषीने शाप दिलेला होता, स्त्रीसंग त्याच्या मृत्यूचे कारण होईल असा.
पंडूराजा दुःखी होता, रोगग्रस्त प्रकृतीमुळे आयुष्याची दुर्दशा झाली होतीच आणि मृत्यू पश्चातही भोग संपताना दिसत नव्हते.
कुंतीने राजाच्या दुःखाचे कारण विचारले, तेव्हा त्याने त्याच्या अशांतीचे मूळ कारण सांगितले. कुंतीला दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले. तिने राजाला त्याबद्दल सांगताच राजा आनंदला त्याने कुंतीला त्या मंत्राचा प्रयोग करण्याची विनंती केली.
कुंतीने सर्वप्रथम यमधर्माचे स्मरण केले. एका सुंदर, तेजस्वी पुत्राचा जन्म झाला तो म्हणजे ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर. त्यानंतर वायुदेवाचा पुत्र भीम आणि देवराज इंद्राचा पुत्र अर्जुन यांचा जन्म झाला. पंडूराजा सुखावला, आता त्याच्या आत्म्याला मरणोत्तर मुक्ती मिळणार होती. कुंतीला लाभलेले आपत्य सौख्य बघताना माद्रीच्या मनामध्ये मातृत्वाची इच्छा जागली. पंडू राजाने कुंतीला विनंती केली आणि कुंतीने मनाचा मोठेपणा दाखवला. तिला प्राप्त झालेला अमूल्य मंत्र माद्रीला जपण्यास सांगितले. नकुल आणि सहदेवांचा जन्म झाला त्यांचे पिता होते अश्विनीकुमार.
पांडवांची जन्मकथा अशीच सांगितली गेली आहे. कथेमध्ये घडलेल्या प्रसंगांचे अन्वयार्थ वेगवेगळ्या लेखकांनी, अभ्यासकांनी त्यांच्या मताप्रमाणे सांगितलेले आहेत. मंत्रजप केला आणि पुत्रप्राप्ती झाली असे घडणे असंभव आहे. कदाचित त्याबद्दल सविस्तर लिहिण्याचे लेखकांनी टाळले असेल, कथाकारांनी मौन बाळगले असेल किंवा कालौघात सारे संदर्भ पुसले गेले असतील. सामर्थ्यशाली मंत्राचा जप केल्याने दैवी चमत्कार घडला आणि पांडवांचा जन्म झाला अशीच कथा प्रचलित आहे.
कालांतराने पंडूराजाचा मृत्यू झाला आणि त्यांची द्वितीय पत्नी माद्री, त्यांच्यासह चितेवर सती गेली. आता पाच अनाथ पुत्रांची जबाबदारी एकाकी कुंतीवर होती. राजपुत्रांनी वनवासी आयुष्य जगावे हे पितामह भीष्मांना योग्य वाटले नाही. त्यांनी कुंतीला तिच्या पुत्रांसह हस्तिनापुरामध्ये येण्याचे आमंत्रण दिले. कुंतीला राजपुत्रांच्या भविष्याच्या दृष्टीने ते योग्य वाटले आणि ती पांडवांना घेऊन हस्तिनापुरामध्ये वास्तव्यासाठी आली.
धृतराष्ट्र पत्नी गांधारीचा जेष्ठपुत्र दुर्योधन याचा जन्म, ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांच्यानंतर अगदी थोड्या काळाच्या फरकाने झालेला होता. युधिष्ठिर राजसिंहासनाचा प्रथम वारसदार होता, धृतराष्ट्राला ते मान्य नव्हते. गृहकलहाची ठिणगी पडली होती.