महाभारत कथा
महाभारतातील कथा सुरस आणि चमत्कारांच्या वर्णनांनी परिपूर्ण अशा आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात जसे सुखदुःखाचे प्रसंग येतात तसेच महाभारतातील नायक, नायिकांच्या आयुष्यातही येतात. त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची त्यांची पद्धत मात्र सामान्य नाही. त्यांचे धैर्य आणि सत्त्वं, त्यांची नैतिकता, सहनशक्ती आणि बुद्धी यांची कठोर कसोटी घेतली जात असते. महाभारतातील नायक आणि नायिका त्या कसोटीमध्ये खरे सिद्ध होतात म्हणून त्यांना असामान्यत्व प्राप्त होते. विपरीत परिस्थितीतील त्यांचे वर्तन त्यांच्या अंगभूत गुणांची ग्वाही देतात.
महाभारत कथा निरनिराळ्या राजघराण्यातील व्यक्तींचे चरित्रकथन करतात. त्यातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा अनेक उत्तम गुणांनी संपन्न आहे. संकटकाळी स्थिरबुद्धी ठेवून, संयमाने वागतात, जे कदाचित सामान्य मनुष्याला शक्य होणार नाही. त्यांची नातीगोती फारच गुंतागुंतीची आहेत.
सूर्यपुत्र कर्णाची कथा --
दुर्वास ऋषींनी कुंतीला पुत्रप्राप्तीसाठी मंत्र दिला तेव्हा कुंती एक षोडशवर्षीय कुमारी आहे. कुमारवयीन कुतूहल आणि चंचल स्वभाव तिच्याकडे आहेत. तिला मिळालेले पारितोषिक नक्की काय आहे? मिळालेल्या मंत्राचा कसा परिणाम होणार आहे? हे समजून घेण्याची जिज्ञासा तिला आहे.
एके दिवशी नित्यनियमाप्रमाणे राजकन्या तिच्या दासींसह नदीतीरी आलेली होती. सूर्याचे पूजन करून तिने नदीपात्रातील जल ओंजळीत घेतले. सूर्याला अर्ध्य देत असताना महर्षी दुर्वासांनी दिलेला मंत्र तिला स्मरत होता. सूर्योदयाचा समय होता, आकाशामध्ये सोनेरी, केशरी किरणे पसरत होती आणि त्याचबरोबर तेजस्वी रविबिंब आकाशपटलावर दिसू लागले होते. कुंतीने मनोभावे ओंजळीतील जल नदीपात्रामध्ये अर्पण केले, मनोमन बीजमंत्राचा जप केला. आणि काय आश्चर्य? आकाशी तेजाने तळपणारे सूर्यदेव, साक्षात तिच्यासमोर प्रकट झाले.
--दुर्वासांनी कुंतीला दिलेला मंत्र हे आजवर न उकललेले कोडे आहे. महाभारताच्या अभ्यासकांनी त्याचे वेगवेगळे अर्थ सांगितले आहेत. अनेक प्रकारांनी त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत.
-- कर्णजन्म (आणि पाचही पांडवांचा जन्म) मंत्रजपामुळे झाला असे कथेत सांगितले आहे आणि अर्थात हा दैवी चमत्कार आहे असे म्हणले आहे.
-- ऋषिमुनी जेव्हा खूप मोठा काळ तपश्चर्या करत, तेव्हा त्यांचे दैवत त्यांच्यासमोर प्रकट होत असे. मग हा असा कोणता मंत्र असेल की त्याचा नुसता एकवार जप करताच सूर्यदेव स्वतः प्रकटले?
दुर्वासांनी दिलेला बीजमंत्र खरोखरीच प्रभावी होता कुंतीला त्याची प्रचिती आली होती. परंतु दिव्यमंत्राच्या जपामुळे मोठे संकट उद्भवले होते. अविवाहित कुमारी असलेली षोडषवर्षा राजकन्या कुंती गर्भवती होती.
कुंतीने दासी आणि सख्यांच्या मदतीने तिची अवस्था जगापासून लपवली असेल कदाचित. ती राजकुमारी असल्याने तिला ते शक्य झाले असेल. परंतु तिच्या कुटुंबातील कुणालाच या परिस्थितीची कल्पना नसणे असंभव वाटते. यथावकाश कुंतीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. प्रत्यक्ष सूर्यदेवाचा तो पुत्र. त्याला जन्मजात कवचकुंडले लाभलेली होती. त्या बाळाला त्याच्या पित्याने जणू आशीर्वादच दिलेला होता. अभेद्य अशा कवचकुंडलांमुळे तो अजिंक्य होणार होता. सर्व शस्त्र आणि अस्त्रांपासून ती कवचकुंडले त्याचे रक्षण करणार होती. असा तेजस्वी वारसा लाभलेले ते बालक मात्र दुर्दैवी होते. त्याची अविवाहित कुमारी माता त्याचे पालन पोषण करण्यास असमर्थ होती इतकेच नाही तर सर्व जगासमोर त्याचे पालकत्व स्वीकारू शकत नव्हती.
राजकन्येसमवेत असलेल्या काही जाणत्या दासी आणि तिच्या सख्यांनी तिला परिस्थितीची जाणीव करून दिली. कुंती एक राजकन्या होती आणि तिच्या अनौरस पुत्रामुळे तिचे भवितव्य धोक्यात येणार होते. तिचे पिता महाराज कुंतिभोजांच्या कीर्तीला कलंक लागणार होता. स्वपुत्राचा त्याग करणे हा या सर्व अनर्थाला थांबविण्याचा एकमेव उपाय होता, कुंतीने तो सल्ला मान्य केला.
दासींनी एक वेताची टोपली आणली त्यामध्ये रेशमी आणि मखमली वस्त्रे ठेवून त्यामध्ये बाळाला ठेवले, त्याला एका मऊ रेशमी शालीचे पांघरूण घातले आणि ती टोपली नदीमध्ये सोडून दिली.
ओघवत्या जलप्रवाहाबरोबर टोपली वाहत चालली होती आणि अचानक नदीपात्रातील जलपर्णीमध्ये अडकली. टोपलीतील बालक हातपाय हालवीत उच्चं रवाने आक्रंदत होते. त्याचवेळेस नदीकाठी पाणी नेण्याकरता आलेल्या स्त्रीने बाळाचे रडणे ऐकले. तिने कानोसा घेतला तेव्हा नदीतील लाटांवर हेलकावणारी टोपली नजरेस आली. ती स्त्री होती हस्तिनापूर सम्राटांच्या रथशाळेतील कर्मचारी अधिरथ याची पत्नी राधा.
राधेने त्या बालकाला घरी आणले. अपत्यहीन राधेला ते बालक म्हणजे दैवी वरदान वाटत होते. अधिरथ आणि राधेने या बालकाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. बालकाचे नामकरण करण्यात आले -- नाव होते वसुषेण. परंतु राधेचा पुत्र म्हणून राधेय याच नावाने त्याला सर्वजण संबोधत होते. प्रतिष्ठित जनांसमोर सांगण्याकरता त्याला आणखी एक नाव देण्यात आले होते. .. कर्ण.
कर्णजन्माची कथा चमत्कार आणि योगायोग यांनी घडलेली आहे परंतु त्यातील काही घटनांचे संदर्भ आणि अन्वयार्थ नीट जुळत नाहीत --
-- कुंतीपुत्राच्या जन्माची माहिती तिच्या कुटुंबातील सदस्यांना (निदान माता-पित्यांना) असणारच. कुंतीने पुत्राचा त्याग करणे या घटनेमध्ये तिचे कुटुंबीय सहभागी असू शकतात.
-- त्या बालकाला हस्तिनापुरामध्ये आश्रय मिळणे आणि कुंतीचा विवाह हस्तिनापूरनरेश पंडू समवेत होणे हा दैवी योगायोग होता? का सुनियोजित घटना होती?
-- बालकाचे असामान्य रूप, त्याची कवच कुंडले, रेशमी वस्त्रे इत्यादी पाहून ते बालक राजघराण्यातील असणार हे अगदी सहज लक्षात येण्यासारखे होते. त्याचा प्रतिपाळ करण्याचे निश्चित करण्यापूर्वी अधिरथ-राधेने बालकासंबंधी काही शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल का?
-- आणि सर्वात महत्त्वाचे पंडुराजाला कर्णाबद्दल माहिती असेल का? बहुदा नसावी, कारण कथेमध्ये असा उल्लेख आहे की राज्यत्याग केल्यानंतर वनवासात असताना कुंतीने राजाला मंत्राबद्दल माहिती दिली होती.
असे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत आणि सत्य हेच आहे की राजकन्या कुंती आणि सूर्यदेवाचा पुत्र कर्ण, एक सामान्य सारथ्याचा पुत्र म्हणून ओळखला जाणार होता. राधेय कर्णाला सूतपुत्र म्हणून वारंवार हिणवले गेले. त्याची योग्यता असूनही राजपुत्रांच्या तुलनेत त्याला कमीपणा पत्करावा लागला होता. द्रौपदीने स्वयंवर मंडपात त्याला नाकारले होते आणि हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता. कुंतीने कधीही जाहीरपणे त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला नाही.
महाभारतामध्ये कर्णाची व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आणि गुंतागुंतीची आहे. सर्वगुणसंपन्न असा दानशूर महावीर कर्ण खलप्रवृत्तीच्या दुर्योधनाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहतो. कर्णाच्या मनात पांडवांविषयी द्वेष असतो, आणि त्यांचा सूड घेण्यासाठी तो आयुष्यभर प्रयत्नशील राहतो. पांडवांविषयी त्याच्या मनात असलेल्या वैरभावनेचे कारण काय असेल? मत्सर, द्वेष का आणखी काही? कदाचित दुर्योधनाचे पांडवांशी वैर होते आणि कर्ण दुर्योधनाचा एकनिष्ठ साथीदार होता .. म्हणून तो पांडवांना वैरी मानत असेल का?
कर्ण उच्चं योग्यतेचा, उत्तम गुणांनी युक्त आणि पराक्रमी असा सेनानी होता. दुर्दैवाने त्याच्या गुणांचा योग्य सन्मान होऊ शकला नाही आणि त्याला दुय्यम स्थानी राहावे लागले. कर्णाचे आयुष्य ही एक शोकांतिकाच होती असे म्हणावे लागेल.
***