महाभारत कथा (१०)

महाभारत कथा (१०).२
दुसरी पत्नी...
राजमहालात प्रवेश...
मत्सर, संघर्ष, अपमान...
साऱ्यांनाच त्याची खात्री होती.
पण कुंतीने घेतला असा निर्णय,
ज्याने इतिहासालाच वेगळे वळण दिले.
त्याचवेळी पंडूनेही सोडले सिंहासन...
आणि कुरुवंशाच्या भवितव्यावर दाटू लागली अंधाराची छाया...

दुर्वास ऋषी द्रष्टे असणार. त्यांनी त्यांच्या योगविद्येने भविष्य पाहिले असणार आणि म्हणूनच त्यांनी कुंतीला तो महामंत्र दिला होता.

कुंती उपवर होती आणि तिचे स्वयंवर योजण्यात आले होते. अनेक राजे, राजपुत्र स्वयंवर मंडपात उपस्थित होते. राजकुमारी कुंतीने महाराज पंडूची निवड केली. हस्तिनापूर राज्याचे ते अभिषिक्त सम्राट होते. खरेतर धृतराष्ट्र ज्येष्ठ बंधू असल्याने त्यांचा सिंहासनावर प्रथम अधिकार होता, परंतु जन्मांध असल्याने ते सम्राट होऊ शकत नव्हते.

पंडूराजा पराक्रमी होता. त्याने अनेक राजांबरोबर युद्ध करून कुरुसाम्राज्याचा विस्तार केला होता.

दक्षिणेतील मद्र देशावर त्याने स्वारी केली होती. युद्ध झाले आणि मद्रसेना पराजित झाली होती. मद्रदेशाचा युवराज शल्य (हाच तो राजा शल्य ज्याने युद्ध समयी कर्णाच्या रथाचे सारथ्य केले होते) याने शरणागती पत्करली, मद्रदेश कुरुसम्राज्याचा मांडलिक बनला. युवराजाने पंडूराजाला अनेक नजराणे दिले. हिरे, मोती, रत्ने, माणके आणि शेकडो अश्व, गज आणि अपार गोधन दिले. या सर्व धनदौलतीसोबतच त्याने त्याची भगिनी राजकुमारी माद्री पंडूराजाला अर्पण केली... एक अमूल्य नजराणा म्हणून.

या घटनेवरून त्या काळात स्त्रीचे समाजातील स्थान काय असेल ते लक्षात येते. माद्री राजकुमारी होती, एका बलाढ्य, प्रबळ राजाची कन्या होती. पण तहातील अनेक नजराण्यांबरोबर तिचेही दान देण्यात आले होते. युद्धामध्ये ज्या राजासमोर पराभव पत्करावा लागला होता त्याच्याशी तह करून स्वतःचे साम्राज्य सुरक्षित करण्याकरता युवराज शल्याने त्याची भगिनी, हस्तिनापुराच्या सम्राटाला दिली होती, जणूकाही ती एखादी अमूल्य वस्तू असावी अशा पद्धतीने. देणाऱ्यांना आणि स्वीकारणाऱ्यांना त्यात काहीच गैर वाटले नव्हते, म्हणजे अशा पद्धतीने स्त्रियांचा वापर करणे ही सर्वमान्य प्रथा असावी. सर्वांना ज्ञात होते की पंडूराजा विवाहित आहे. त्याच्या राज्यात राजकन्या माद्रीचे स्थान काय असेल हे अज्ञात होते.

सुदैवाने पंडूराजाने माद्रीबरोबर विवाह करून तिला पत्नीचा दर्जा दिला होता. निदान माद्रीची होणारी अवहेलना तरी टळली होती. आता गृहकलह अटळ आहे असेच सर्वांना वाटत होते. पंडूराजाची प्रथम पत्नी कुंती तिच्या सवतीचे स्वागत कसे करेल याबद्दल साशंकता होती. सम्राट त्याची द्वितीय पत्नी मदारी समवेत हस्तिनापुरामध्ये दाखल झाले आणि काय आश्चर्य कुंतीने माद्रीचे यथोचित सन्मानपूर्वक स्वागत केले. कुंतीने कधीही नाराजी दर्शवली नाही, माद्रीचा योग्य सन्मान राखला जाईल याची काळजी घेतली.  

अशाच काही प्रसंगांमध्ये कुंतीचे धैर्य आणि प्रगल्भता प्रकर्षाने जाणवतात. कुंतीची व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाची आहे. संघर्षकाळात तिने दाखवलेली समतोल बुद्धी आणि घेतलेले निर्णय त्याची साक्ष देतात. कुंतीच्या आयुष्यात तिची सत्वपरीक्षा घेणारे अनेक प्रसंग आले, अनाथ, वनवासी आयुष्य जगणे नशिबात आले. परंतु तिचे मनोधैर्य अढळ होते. तिने तिच्या पतीला संकटसमयी साथ दिली आणि पतीनिधनानंतर पुत्रांचे संगोपनही उत्तम रीतीने केले. माद्रीचे पुत्र नकुल आणि सहादेवांनाही तिने सावत्र वागणूक दिली नाही. तिचे पाचही पुत्र पांडव म्हणूनच एकत्र राहिले. कुंती यादवकुळातील राजा शूरसेनांची कन्या, कुंतिभोज राजानी तिला दत्तक घेतले होते. विवाहानंतर ती हस्तिनापुराची महाराणी होती. असे असूनही कुंतीचे आयुष्य राजमहालात सुखोपभोगांमध्ये व्यतीत झालेले नाही. आयुष्यभर संकटांनी तिचा पाठपुरावा केला ज्यांचा तिने धैर्याने सामना केला. जेव्हा पंडूराजाने राज्यत्याग करून वनवासी होण्याचा निर्णय घेतला तेव्हाही कुंतीने त्यांना साथ दिली. सवत म्हणून आलेल्या माद्रीला तिने सन्मानाने स्वीकारले, पंडूराजाच्या विनंतीला मान देऊन माद्रीला पुत्रप्राप्तीसाठी महामंत्र दिला. पंडूराजाच्या निधनानंतर माद्री त्याच्या चितेवर सती गेली, तिने मृत्यू स्वीकारला. तिच्या अनाथ पुत्रांना कुंतीने कधीच सापत्न वागणूक दिली नाही. ती नेहमीच पाच पांडवांची माता म्हणून ओळखली जाते. कुंतीने कधीही राजदरबारी येऊन निर्णय घेतले नाहीत किंवा ती कधीही लोकाभिमुख झालेली नाही. परंतु तिचा प्रत्येक शब्द पांडवांकरता अनमोल होता त्यामुळे अनेक महत्वाच्या प्रसंगांमध्ये तिचे अस्तित्व ठळकपणे जाणवते.

पंडूराजाने राजसूय यज्ञ केला आणि तो चक्रवर्ती सम्राट झाला होता. पण दुर्दैवाने त्याची मूळची कमकुवत असलेली प्रकृती बिघडू लागली होती. पंडूराजा आरोग्य संपन्न कधीच नव्हता असे असूनही त्याने राज्याचे संरक्षण, विस्तार आणि व्यवस्था ही कर्तव्ये व्यवस्थित निभावली होती, राजधर्माचे कसोशीने पालन केलेले होते. आता मात्र त्याचा नाईलाज झाला होता, आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या पंडूराजाने राज्यत्याग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात त्याच्या दोघी पत्नी, कुंती आणि माद्री सहभागी होत्या. राज्यत्याग करून वनवासी होण्याचा निर्णय त्याने जाहीर केला. राज्याची जबाबदारी जन्मांध धृतराष्ट्राकडे म्हणजेच पर्यायाने पितामह भीष्मांकडे सोपवली आणि अरण्याकडे प्रस्थान केले. त्यावेळेस त्याच्या दोघी पत्नी अपत्यहीन होत्या.

हस्तिनापूरच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या धृतराष्ट्राची पत्नी गांधारीसुद्धा निपुत्रिक होती.

कुरुसाम्राज्याचे भवितव्य अंध:कारमय भासत होते.

***