बिचारी सीता...

परवा कधीतरी चर्चेत रामायणाचा विषय निघाला. एकामागोमाग एक मतं प्रदर्शित केली जाऊ लागली. मग सीतेचं रामा बरोबर वनवासात जाणं, तीची अग्निपरीक्षा, नंतर धोब्याचं ऐकून(लोकापवादास्तव) रामाचं सीतेला पुन्हा वनवासात सोडणं यावर चर्चेतील मुलांनी धडाडीनं मतं मांडली की हे कसं चुकीचं आहे आणि शेवटी "बिचारी सीता" म्हणून मोकळी झालीत...


वरील तिन्ही गोष्टी चुकीच्या वा बरोबर या पेक्षा सीतेला बिचारी म्हणणं मला अंतर्मुख करुन गेलं...


सीता खरोखरच "बिचारी" होती का? किंवा तिला रुपकात्मक धरलं तर तशी स्त्री बिचारी असेल का? माझ्या मते तरी सीता "बिचारी" नव्हती तर "ग्रेट" होती... एक स्त्री म्हणून ती श्रेष्ठ, सामर्थ्यशाली होती.
स्त्री ची निरनिराळी रुपं तिच्यात एकवटली आहेत.


ती रामाबरोबर वनवासात गेली - एक पतिव्रता,
रावण विमानातून नेत असता त्या प्रसंगात तिने दागिने खाली टाकले - प्रसंगावधान,
रावणाच्या सोन्याच्या लंकेला ती बळी नाही पडली- पतिनिष्ठा आणि प्रेम,
अशोकवनातील तिचं राहणं-सोशिकपणा आणि परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाण्याचे गुण,
हनुमानाकडून अंगठी पारखून घेणं, नंतर त्याच्यावर ठेवलेला विश्वास- पुन्हा प्रसंगावधान आणि माणसं पारखण्याची कला,
हनुमाना बरोबर जाणं नाकारुन रामाची वाट पहाणं- समाजाबद्दल व ईतरांच्या उद्धाराबद्दल आस्था, पतीवरील विश्वास, कठीण प्रसंगी दुर्मीळ असा आशावाद
अग्निपरीक्षा-आत्मविश्वास (मी अग्निपरीक्षेचं समर्थन करीत नाही आहे)
पुन्हा वनात जाणे- समाजासाठी स्वसुखाचा त्याग


यासर्वांबरोबरच तिनं लवकुशाला दिलेली शिकवण तिचं श्रेष्ठत्व सिद्ध करुन जाते. त्यांनी राजसूय यज्ञातील अश्व पकडणं ही गोष्ट त्यांच्या ठीकाणचं धैर्य व साहस दाखवून देतात जे एक आईच आपल्या मुलात निर्माण करू शकते. सीतेच्या मार्गदर्शनाखालीच ती मुले ऋषीकुमारांनी युद्धप्रवीण केली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ईतके सोसूनही तिने मुलांच्या मनात रामाबद्दल राग, द्वेष, किंतु निर्माण न करता, विशुद्ध प्रेम निर्माण केले. राम कथा ऐकवून रामाच्या सामर्थ्याबद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण केला.


अशी हि सीता "बिचारी" असेलच कशी?


ती तर "ग्रेट" आहे