जो जे वांछील तो ते लिहो

लेख चार असमान भागात आहे - विनंती, माझे मुक्त चिंतन, विचार-दीपस्तंभ, आणि खुलासा.
------------------------------------------------------


विनंती -

मुक्तचिंतन एकदाही वाचले नाही तरी चालेल.
विचार-दीपस्तंभ किमान एकदा तरी वाचावा.
स्वतःच्या मनाशी दोनदा तरी विचार करावा.

-------------------------------------------------------------


पावित्र्याची जपणूक ही एक उदात्त कल्पना आहे. प्रत्येक समाजाच्या वैयक्तिक आणि सामूहिक अभिरुचीचा, परिपक्वतेचा, इतिहासाचा ... ... हा जणू मानदंड आहे. नामांतराचे अट्टहास, इतिहासातील नानाविध उल्लेखांविषयीचे आग्रह, संस्कृतीतील आदरस्थळांचा सन्मान, भाषाशुचितेचा कटाक्ष, सर्वसाधारण संकेत (manners), असे अनेक आग्रह हे ह्या जतन करण्याच्या, संवर्धन करण्याच्या नितांत सुंदर प्रेरणेचेच अविष्कार आहेत.

 

अश्या एखाद्याच आग्रहासाठी आयुष्यभर धडपडाट करीत राहिलो, ... आणि यदाकदाचित यश मात्र इतकेसेही मिळाले नाही; तरीही ते जीवन सार्थकी लागले असेच मला वाटेल.

 

ह्या भूमिकेवर माझा पिंड पोसला गेला आहे. हे असे करणे हेच तर जीवन अशीच माझी धारणा आहे.

 

विरोधाभास हा की ह्या संस्कृतीच्या पाठपुराव्यानेच मला प्रश्न विचारायला शिकविले. लहानपणापासून आजूबाजूला पाहिलेल्या संस्कृतीच्या नावाखाली चाललेल्या दांभिकतेने स्वतःकडेच उघड्या डोळ्यांनी पाहायला भाग पाडले.

 

संस्कृतीरक्षणाच्या आवरणाखाली कित्येकांचे भोळेपणाने तर काहींचे धूर्तपणाने जळमटे आणि कोळिष्टकांचे जाळे विणण्याचे कार्यच चालू राहते. जगभराच्या इतिहासात सर्वच हुकूमशहांनी संस्कृतीरक्षणाच्याच नावाखाली देशांचा, संस्थांचा, प्रसारमाध्यमाचा आणि शिक्षणपद्धतींचा ताबा घेतला. त्यांतील साऱ्यांचे सर्वकाळ हेतू वैयक्तिक स्वार्थाचेच होते असे राजरोसपणे म्हणता येणार नाही. या हुकूमशहांच्या, त्यांना ताकद देणाऱ्या वाद, विचारप्रणाली किंवा धर्माधारांची आपल्या समाजाचे याने भलेच होणार आहे अशीच धारणा होती. हेतू काहीही असला तरी या सांस्कृतिक रखवालदारीने समाज मागे फेकला गेला; प्रगतीची दारे बंद झाली; विचारांचे आदानप्रदान थंडावले असाच इतिहास आहे. अगदी हुकूमशहा, देश, इतक्या मोठ्या पातळीवर जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूसही उद्योग, सामाजिक वा शासकीय अश्या ज्या संस्था मोडकळीस येतात त्यांमध्ये "विचार स्वातंत्र्यास बंधन" हेच सामायिक कारण असावे असा अंदाज आहे.

 

राहता राहिला प्रश्न तो स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्याच्या शक्यतेचा. हा धोका नक्कीच आहे. हा धोका टाळण्यासाठी काही विषयांवर बंदी घालणे; काही भाषेस आक्षेप घेणे; एखाद्या संघटनेने दायित्व स्वीकारणे; एका सेन्सॉर बोर्डाने यासाठी काम करणे असे प्रकार आहेतच. तत्त्व म्हणून हे मान्य होण्यासारखे आहे. पण एकदा का हे तत्त्व म्हणून स्वीकार केले की कोठे थांबायचे हे समजू शकत नाही. ज्यांनी तत्त्व म्हणून हा विषय तारतम्याने मांडला ते कदाचित योग्य ती दिशा दाखवतील देखील. परंतु दुर्दैवाने बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या हातात राहत नाहीत. वाघावर स्वार होता येते, पण उतरता येत नाही. अतिरेकी बंधने, सूत्रांचे कर्मठ अर्थ, फतवे यांच्यामध्ये हे मूळ तत्त्व गुरफटून जाते. टोकाच्या भूमिका लादणारे सत्यानाशच करून टाकतात असे दिसते. हिंदू धर्म यांस अपवाद राहील असा आशावाद, युक्तिवाद केला जातो. पण दुर्दैवाने तोही तितकासा खरा नाही. एकूणच नियंत्रणातून मिळणारे फायदे काही असलेच तर तुलनेने खूपच अल्पायुषी आहेत.

 

भाषा स्वातंत्र्यामुळे सभ्यतेवर होणारा तथाकथित घाला/ परंपरांना नागवेपणाने दिली जाणारी आव्हाने यांनी समाजाची घडी विस्कटणारही असेल. पण हे अप्रिय -- कदाचित पूर्णपणे अयोग्य -- असे विचार कोणाच्यातरी मनांत खदखदत आहेतच. मग ते वेळीच सामोरे येण्यातच सर्वांचे भले आहे. ही तळमळ, भडभड विद्रोही व्यासपीठावर मांडली जाऊन वेगळ्या पद्धतीची जातीयता निर्माण होण्यापेक्षा सर्वमान्य अशाच व्यासपीठावरची शांतता भंग पावली तर एकवेळ चालेल.

 

हे हलाहल पचविण्यास सर्वसामान्य माणूस नक्कीच समर्थ आहे. त्याची चिंता विद्वत्जनांनी बाळगू नये.

------------------------------------------------------


... ('पु. ल. एक साठवण')
अपूर्ण ('इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून)
(रंगसंगती आणि अधोरेखन एकलव्याचे.)

quote

जो जे वांछील तो ते लिहो

 

... इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं. नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात. साहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता! आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा! आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे? दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.

 

जो जे वांछील तो ते लिहो यामागे जीवन अधिक सुंदर करण्यासाठी, दुरितांचे तिमीर घालवण्यासाठी, ही भावना नसेल तर कालनिर्मितीच्या मुख्य प्रेरणेशीच ही प्रतारणा होईल. आणि म्हणून इथे लेखक आणि वाचक या दोघांनाही आपली जबाबदारी कळायला हवी.
unquote

-----------------------------------------------------------

खुलासा -

मुक्तचिंतनामध्ये उदाहरणांचा अभाव आहे याची जाणीव आहे. विस्तारभयास्तव आणि त्याहूनही मोलाचे म्हणजे विषयांस फाटे फुटण्याची शक्यता गृहीत धरून ते टाळले आहे. 

हे मुक्तचिंतनाचे पहिले प्रकटीकरण आहे. भाषा अधिक संस्कारित होऊ शकते याची कल्पना आहे.
जसजशी प्रगल्भता येईल -- ज्यांत आपलेही योगदान असेल -- तसतशी विचारांची परिपक्वता वाढेल याची खात्री असल्याने थोडा विस्कळितपणा असला तरी त्याची तमा बाळगलेली नाही.