"वंदे मातरम"ला विरोध अज्ञानमूलक

"वंदे मातरम" हे गीत म्हणायला काहीजणांचा कडवा विरोध आहे. त्यांतील पहिल्या ओळीचा - वंदे मातरम चा - अर्थ मी मातेला वंदन करतो असा आहे. देशाच्या संदर्भांत ही माता म्हणजे भारतमाता. भारतमाता म्हंटल्यावर सर्वांच्या डोळ्यांसमोर एक देवीसरखी मूर्ति उभी राहते. त्यामुळे मूर्तिपूजेला विरोध असणाऱ्यांना या देवीसदृश भारतमातेला वंदन करणे हे धर्मबाह्य वर्तन वाटते. पण खऱ्या अर्थाने भारतमाता म्हणजे भारतीय जनता, ज्यांत तुम्हा, आम्हा, सर्वांचा समावेश होतो. ही गोष्ट पंडित नेहरूंनी आपल्या "हिंदुस्थानकी समस्याएं" या पुस्तकांत "भारत माताकी जय" असा जयजयकार करणाऱ्या जमावासमोर दिलेल्या भाषणांत स्वतः सांगितली असल्याचे नमूद केले आहे. या जनतेच्या आधाराने आपण जगतो, वाढतो व स्वतःची उन्नति करून घेतो, म्हणून तिला आपल्या आयुष्यांत मातेइतकेच महत्त्वाचे स्थान आहे. अशा मातेला वंदन करणे म्हणजे जिच्यामुळे आपले अस्तित्व आहे तिच्याबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करणे होय व हे करणे म्हणजे पाप किंवा धर्मबाह्य वर्तन आहे असे कुठलाही धर्म म्हणत असेल असे वाटत नाही.


सारांश, मातेला वंदन करणाऱ्या व तिच्या सुबत्तेचे व निसर्गसौंदर्याचे वर्णन करणाऱ्या "वंदे मातरम" या गीतांत कुणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे काही दिसत नाही. तसेच कुठल्याही धर्माची तरफदारी दिसत नाही. त्यामुळे निधर्मवाद्यांनी "वंदे मातरम" च्या विरोधकांसमोर नमते घेण्याचे काही कारण नाही.


तुम्हाला याविषयी काय वाटते?