एका गझलेचे रसग्रहण

मला आलेल्या असंख्य पत्रांपैकी एक विनंतीवरून इथे देत आहे.

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पत्रास कारण की तुमची "पाऊस कोसळू दे - संदिग्ध" नुकतीच वाचनात आली. खूपच आवडली. "तुम्हाला प्रसिद्ध व्हायचेय?" हे तुमचे पुस्तक आमच्या आवडत्या पुस्तकांपैकी आहे. त्या पुस्तकाने आमच्या मित्रमंडळावर खूपच प्रभाव पाडलेला आहे. विशेषतः त्यातील "गझल, एक शास्त्रीय अभ्यास" हे प्रकरण वाचून एक वाचक म्हणून गझलेचे रसग्रहण कसे करावे हे व्यवस्थित कळले. शिवाय त्यातील "झटपट गझल लिहा" हा विभाग वाचून तर गझला लिहिणे अगदीच सोपे झाले आहे. त्यामुळे तुमच्या "पाऊस कोसळू दे - संदिग्ध" या गझलेचे रसग्रहण तुम्हाला पाठवत आहे. तुमच्या चाहत्यांनी केलेले रसग्रहण तुम्हाला कसे वाटले ते अवश्य कळवा.


पाऊस कोसळू दे - संदिग्ध, एक रसग्रहण


पाऊस कोसळू दे
छपरातुनी गळू दे


"पाऊस कोसळू दे" इथे पाऊस नुसता पडत किंवा भुरभुरत नाही तर कोसळतो आहे. (ही ओळ जशीच्या तशी दुसऱ्या एका गझलेत वाचलेली आहे, पण या जगात ओरिजनल काय आहे?) "छपरातुनी गळू दे" मुळे ही गझल स्वप्नवत वातावरणात वाचकांना न नेता धगधगीत (की ओल्या किचकिचित?) वास्तवाचे दर्शन घडवते. सगळ्यांनाच घरात, गॅलरीत बसून चहाच्या फुरक्या मारत पाऊस पाहता येत नाही, अश्या लोकांना ही गझल जवळची वाटेल यात शंका नाही. शिवाय छपरातून गळणारा पाऊस कोरड्या कपड्यात पाहता येत नाही, त्यामुळे पावसात प्रत्यक्ष भिजल्याचा आनंद मिळवणारा वाचक न कळतच काव्यधारांनीही ओला होतो. (या वाक्याचा अर्थ आम्हाला नीटसा कळलेला नाही, पण अर्थ असेल तर नक्की चांगलाच असेल.)


"पाऊस" हा कविलोकांचा नेहमीचा विषय आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कितीही बेभरवश्याचा असला तरी कविता, गझलांतून पाऊस नियमित पडत असतो. पण बहुसंख्य कवी या विषयावर संवेदनशील, भावनांनी ओथंबलेली कविता/गझल लिहिण्याच्या नादात अवास्तव आणि परिणामी अतिसामान्य रचना करताना दिसतात. (त्यामुळे कधीकधी पांढऱ्या तोंडाच्या इंग्रजांसारखी "पावसा पावसा दूर जा" म्हणण्यासारखी पाळी येते.) अश्याप्रकारे नुसत्याच कोसळून नाल्यातून वाहून जाणाऱ्या पावसाप्रमाणे या रचना विस्मृतीच्या नाल्यांतून वाहून जातात. आपली गझल म्हणजे असल्या कवितांच्या पावसात रेनकोटाप्रमाणे सुखद आहे. (नुसते मत न देता काही उपमा द्यावी हे "तु.प्र.व्हा.?" मध्ये लिहिलेलेच आहे. कशी वाटली नाल्याची आणि रेनकोटाची उपमा?)


घाई कुणास आहे?
तू दे, हळूहळू दे!


"घाई कुणास आहे?" मध्ये एक प्रकारचा निष्काळजीपणा आहे. आपण घेणारे असूनही देणाऱ्यावर उपकार करत आहोत असा भाव आहे. हिंदी चित्रपटात सिगारेट फुंकून आपल्याच मालकाच्या तोंडावर धूर सोडणाऱ्या माणसासारखा. तो आमच्या मित्रमंडळाला फार आवडला.


या जगात नेहमी "मी, मी", "मला पाहिजे", "मला आताच्या आता पाहिजे!" असे म्हणणारेच दिसतात. जो तो दुसऱ्याला ढकलून आपल्यासाठी मिळवण्याच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे "तू दे, हळूहळू दे!" म्हणणारे आदर्शच म्हटले पाहिजेत, जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे हे. रेशनची रांग, लाइटबिल, फोनबिलाची रांग, डॉक्टरांची वेटिंग रूम, कॉलेज प्रवेश, वार्षिक अप्रेज़ल्स, या सर्व ठिकाणी वाट बघावी लागल्याने वैतागणाऱ्या लोकांना हे तत्त्वज्ञान उपयोगाचे आहे, मनःशांती देणारे आहे. या तत्त्वज्ञानात्मक शेरामुळे ही गझल वेगळ्याच पातळीवर जाते. (अमुक अमुक गोष्टीमुळे अमुक गोष्ट वेगळ्या पातळीवर जाते, असे प्रतिसाद देताना म्हणण्याचा प्रघात आहे ना?)


बगळ्यास मान दे अन्
हंसास कावळू दे


"हंस पडलेले दाणे खाईल आणि कावळ्याला मोती मिळेल" अश्या अर्थाचे, कलियुगाचे वर्णन करणारे वाक्य आहे. या शेरात त्या वाक्याला बगळ्याच्या रूपाने नवे पंख लाभले आहेत. (इथे वाक्यरचनेत काहीतरी गडबड झाली आहे पण वाचण्याच्या नादात कुणाच्या लक्षात येणार नाही. किंबहुना ('किंबहुना' हा शब्दही या लेखात आणला आहे याकडे तुमचे लक्ष जाईलच)  ह्या रसग्रहणाच्या जाहीर वाचनात या वाक्याने टाळ्या घेतल्या आहेत.)

बालपणापासून दशक्रिया विधी पर्यंत विविध पदे भूषवणाऱ्या ("पदावर काम केले" ऐवजी "पद भूषवले" बरोबर ना?) कावळ्याला "कावळू" च्या रूपात एक स्वतंत्र क्रिया"पद" मिळणे हे संपूर्ण काकसमाजाला जीवनगौरव पुरस्कार मिळण्यासारखेच आहे. (इथेही टाळ्या पडल्या होत्या. "कावळू" सारखे शब्द ऐकून प्रमाणभाषेचा आग्रह धरणाऱ्या एका काकांनी निषेधाच्या घोषणा देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे फारसे कोणी ऐकत नाही.)

"बगळ्यास मान दे" मध्ये मानेवर (म्हणजे "मान" या शब्दावर) श्लेष आहे की काय असे आम्हाला वाटले पण "मान" अवयव म्हणून घेतल्यास काहीच अर्थबोध होत नाही. तसे सर्व कवितांचा/गझलांचा अर्थबोध होतोच असे नाही. त्यामुळे यातून तुम्हाला काहीतरी गूढ संदेश द्यायचा आहे की काय असे वाटून गेले.


दे बैल दे कधी दे
गायी कधी वळू दे


वरवर पाहता हास्यास्पद शेर आहे. निषेधाच्या घोषणा देणाऱ्या काकांनी तर हा शेर निरर्थक आहे, भरीचा आहे असेही म्हटले. पण यातही काही गर्भितार्थ दडला आहे असे वाटते.  (गर्भितार्थ नेहमी दडतोच ना?) या शेरावर बराच सामूहिक विचार केल्यानंतरही ही जनावरे ह्या गझलेत काय करताहेत ते कळेना. (आपण दुधव्यवसायाशी निगडीत आहात की काय अशी शंकाही आली)


बैल, गाय आणि वळू ह्या इथे निरनिराळ्या प्रवृत्तीच्या माणसांसाठी प्रतिमा म्हणून वापरल्या आहेत हे शेवटी कळले. आमच्या चर्चेतून आम्ही त्यांचे अर्थही काढले. बैल म्हणजे मारकुटी माणसे जी या ना त्या कारणाने नेहमी दिसेल त्याला शिंगावर घेण्यासाठी टपलेली असतात. वादविवाद, हाणामाऱ्या, हमरीतुमरी यांना फार प्रिय. कोणाला एका शब्दाने म्हणून चांगले म्हणणार नाहीत, नेमके चुकीवर बोट ठेवतील. गायी म्हणजे अगदी निरुपद्रवी, कोणाच्या अध्यात न मध्यात. कोणी ताल आणि सूर यांचे पुरेपूर बारा वाजवले तरी "कित्ती छान गातेस गं!" म्हणतील. कोणी "माझा कुत्रा मोती" सारख्या विषयावर अगदी गाईडाबरहुकूम निबंध लिहिलेला असला तरी "छान हं! बाळ, तू मोठ्ठा लेखक होशील!" असे म्हणतील. वळू म्हणजे अगदी वेगळीच जमात आहे. मग्रुरी यांच्या अंगात पुरेपूर भिनलेली असते. काहीही कर्तृत्त्व नसताना हे माजलेले असतात, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात. (म्हणी, वाक्प्रचार पुरेसे वापरले आहेत ना?) जगात काय मीच तो शहाणा अशी यांची खात्री पटलेली असते. बैल आणि गायी कसेही असले तरी उपयोगाचे आहेत, पण वळू प्रकारचे लोक खऱ्या वळूप्रमाणे अगदीच कुचकामी. इकडे तिकडे फिरून उगाच घाण करण्याशिवाय यांना काहीच येत नाही.


या शेराचे वैशिष्ट्य म्हणजे अश्या सर्व लोकांना त्यांच्या गुणावगुणांसह स्वीकारले आहे. मला न आवडणारे लोक देऊ नकोस असे स्वार्थी  मागणे नाही. उलट सर्व प्रकारच्या लोकांची मागणी केली आहे, जेणेकरून जीवन एकसुरी न होता वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होईल. (हे वाक्य आम्ही बऱ्याच प्रयत्नानंतर तयार केले आहे. याहून चांगले वाक्य कदाचित आम्हाला लिहिता येणार नाही हे पटल्याने यापुढे काही लिहून या वाक्याचे महत्त्व कमी करू नये आसे आम्ही सर्वानुमते ठरवले. त्यामुळे इथेच थांबतो.)


आपले नम्र,
अचानक पुस्तकवाचक, साहित्यप्रसारक आणि रसिक मंडळ