'ग' ची बाधा

'ओळख' ही 'मनोगत' वरील चर्चा भरकटली आहे. म्हणून तिथे माझे मत मांडण्याऐवजी नवा प्रस्ताव लिहीत आहे.
विषय चालला होता संगीतक्षेत्रात औपचारिक शिक्षण घेतलेले लोक आणि केवळ श्रवणभक्तीतून संगीताचे ज्ञान मिळवलेले लोक यांच्या संगीतविषयक जाणकारीचा. मुळात संगीत किंवा कलेच्या इतर कोणत्याही क्षेत्रात रसिकांनी कलेची आराधना ही स्वतःचा आनंद म्हणून - स्वान्तसुखाय अशी करावयाची असते. वुडहाऊस म्हणतो, "खरेतर लेखकाने आपल्या पुस्तकाची एकच प्रत काढावी-स्वतःच्या वाचनासाठी-" कलाक्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा वापर वैयक्तीक आनंदासाठी, फारफारतर हा आनंद आपल्या आसपासच्या लोकांमध्ये वाटण्यासाठी केला जाणे हे कलेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.  यामध्ये आपल्या कलाक्षेत्रातील अधिकाराविषयी अहंगंड, ताठा व गर्व आला की कलेचे पावित्र्यच नाहीसे होते.  "मी म्हणतो तेच खरे" ही अलवचिकता खरेतर कोणत्याही क्षेत्रात वाईटच. पण दुर्दैवाने भल्याभल्यांना हा वृथा अभिमान टाळता आला नाही.  ("बीकॉज सलीम अली सेज सो") अर्थात "उथळ पाण्याला खळखळाट फार" हे या क्षेत्रातही लागू आहेच. ("डीप वॉटर्स रन स्टील") यातूनच "असे आहेच" ,  "अमूक माझ्या घरी पाणी भरतो" अशी दर्पोक्ती सुरु होते.


येथे वयाच्या सत्तरीत "बेटा, अभी अभी तो त्रिताल का थोडाथोडा अंदाजा आ रहा है" असे म्हणणाऱ्या एका मशहूर तबला नवाजांची आठवण येते. दिल्लीतल्या दूरदर्शनवरील रेकॉर्डींगच्या वेळी स्वतःचा तबला डग्गा उचलणाऱ्या तिरखवां साहेबांची आठवण येते. नवोदित पाहुण्या क्रिकेट संघाच्या विमानतळावर बॅगा उचलणाऱ्या आणि नंतर परिचयात "आय युजड टू बॅट अ बिट" असे म्हणणाऱ्या डॉन ब्रॅडमनची आठवण येते. आणि " आय ऍम डॉ. सो ऍन्ड सो, ऍन्ड आय ऍम अ प्रोफेसर ऑफ फिजिक्स" यावर "आय ऍम अल्बर्ट आईन्स्टाईन, ऍन्ड आय ऍम अ स्टुडन्ट ऑफ फिजिक्स" हे उत्तरही आठवते!