बाहेर पाऊस पडतोय

बाहेर पाऊस पडतोय..


आपल्यासाठी नाही..


त्या भौतिक शास्त्राला किंवा पावसाच्या देवाला या ‘अखिल मानवजात’ वगैरेशी काही घेणंदेणं नाही.. तसं असतं तर मागच्या २६ जुलै सारखा कोसळला नसता आणि आपले सौंदर्य वगैरे दाखवायचे असते तर रात्री बेरात्री कोसळला नसता.. छानपैकी दिवसा छायाचित्रकार, कवी जागे असताना पडला असता..


या सृष्टींचे प्रयोजन काही वेगळेच आहे. मला नाही वाटत की संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात ते अजून कुणाला ‘दुसऱ्यांनाही ते सांगता येईल’ इतपत कळले आहे! न्यूटन काय किंवा आईन्स्टाईन काय.. मार्क्स, सावरकर.. काही विशिष्ट विषयांत ते इतरांच्या पुढे होते अगदी काही शे वर्षे पुढे होते.. पण या संपूर्ण सृष्टींचे प्रयोजन काय, कोहम?.. ची कायमस्वरूपी अशी उत्तरे कुणी दिली?. . . . कदाचित त्यांना स्वतःला कळले असेल.. सांगता नाही आले! सांगताना ‘नेति नेति’ असेच झाले!


….तर मग का पडतो पाऊस? तो काय देवाचा प्रसाद आहे का? देवस्वरूप आहे का? का एक भौतिक शास्त्राचा नियम? का कविता? सही! रोमँटिक वगैरे.. का यमस्वरूप..? माहीत नाही हो. . मग काय "मेघांच्या धारांतून प्रेमरूप भासतोस.." ला काही अर्थ नाही? नसेल कदाचित!


सगळी प्रासंगिक नावे, विशेषणे आहेत ही! आपल्यानुसार वेळेवर(?) आला तर वेळेवर शेती होऊन आपल्याला जे अन्न लागते जगायला(?) ते जास्तीत जास्त प्रमाणात मिळते म्हणून देव म्हणायचे.. हिल स्टेशनला किंवा घाटात गेलो तर डोळ्यांना सुंदर(?), छान(?) दिसते(?) म्हणायचे.. वाट लावली तर यम म्हणायचे. . पण या प्रत्येक नावाच्या, भावनेच्या, विशेषणाच्या पाठी. . "साला काय चालू आहे हे?" हा प्रश्न असतोच. मी तर फार त्रासलो आहे हो.. कुणाला कधीतरी मिळेल का हे उत्तर. . का या प्रश्नावर काट मारावी मी आणि फोटो काढावा पावसाचा खिडकीतून? छान(?) दिसतंय(?) हो बाहेर....