शब्दवेल्हाळ

मला सांगतो रोज वृत्तांत सारा...
तुझ्या गावचा शब्दवेल्हाळ वारा!


दुरापास्त झाली - नजरभेटसुद्धा!
असा बसवला आसवांनी पहारा...


धुक्याची कशाला तमा बाळगू मी?
धुके दूर होईल - उगवेल तारा!


लढू लागले लोक त्याच्याच नावे -
किती भासला देव तेव्हा बिचारा!


(लढू लागले लोक त्याच्याच नावे -
कुठे राहिला ईश्वराचा दरारा?)


तडाखे सदा सोसतो सागराचे
तरी शांत असतो कसा हा किनारा?


तुझे गीत गाईन मी जीवना, पण
जरा देत जा नीट लावून तारा!


- कुमार जावडेकर, मुंबई