मराठी आणि संगणक क्रांती.

नमस्कार मराठी समाज संगणक क्रांतीमधे खुप पुढे आहे. मात्र मराठी खुप मागे. याची कारण मीमांसा प्रत्येकाने करायला हवी. आज या चर्चेचा उद्देश्य म्हणजे प्रत्येकाला करायला काहीतरी द्यावे हा आहे.


मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहीली जाते. युनिकोड नावाचे जे जगमान्य प्रमाण आहे, त्यामुळे मराठीच्या कळसंचाचा सार्वत्रीक गोंधळ दुर होण्यास मदत होईल असं वाटतं.


आता मात्र साफ्टवेअर आणि जमल्यास समग्र चालना प्रणाली मराठीत असावी अशी मागणी होते आहे. युनिकोड वापरून मराठी लिहीणाऱ्यांचे प्रमाण पाहता हे काम खुप कठीण आहे असं वाटत नाही. मात्र गरज आहे ती प्रेरणेची.  अनेक लोकांना नेमके काय करावे ते कळत नाही. या चर्चेद्वारे जाणकार नेमकं काय करावं ही माहिती देतील असं वाटतं.


मला माहित असलेले दोन प्रमुख मार्ग म्हणजे जे प्रोग्रामर आहेत त्यांनी मराठी केन्द्रस्थानी ठेवून निर्मीती करावी. जसे आपल्या 'नीलहंस' यांनी 'गमभन' तयार केले. 


दुसरा म्हणजे आम्हा सामान्य लोकांचा , ज्यांना प्रोग्रामींग मधलं काही कळत नाही त्यांनी भाषांतराचं तितकंच महत्वाचं काम करावं. भाषांतर करण्यासाठी अनेक लोकांची गरज आहे. अनेक सॉफ्टवेअर असे आहेत की जे आपण सहज मराठीतून उपलब्ध करून देऊ शकतो. मी कुठेतरी असं वाचलं आहे की, पुरेश्या वाक्य संग्रहानंतर हे काम (भाषांतराचं) एका प्रोग्रामने सुध्दा करणे शक्य आहे. मात्र त्याला शेवटचा हात मानवी असणं गरजेचं असतं कारण भाषांतर हेच उपयोगकर्त्याशी थेट संपर्क साधते. त्यामुळे त्यात सहजता आणि संपुर्णता असणे आवश्यक आहे. याकरीता भरपुर मनुष्यबळ असने गरजेचे आहे.  आज मनोगतावर, जालनिशीवर आणि इतरत्र मराठीतून लिहीणाऱ्यांची मोठी संख्या पाहता हे अशक्य नाही. 


या दृष्टीने काही प्रयत्न सुरु झालेले आहेत . त्यांच्या विषयी खाली दुवे दिलेले आहेत. मग अडचन काय आहे?  तर अडचन ही आहे की ही कामे एका नावाखाली नाहीत , आधीच संख्येने कमी आणि त्यातही विलग त्यामुळे संवाद नाही. नविन सदस्यापुढे गोंधळ, कुणाला सामील व्हावे? खरं तर अनेक ग्रुप असने ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे नवीन कल्पनांना चालना मिळते. मात्र त्यांची संख्या वाढायला नको का? आणि हो या सर्व ग्रुप्सनी एकत्र येऊन काही भाषांतर प्रमाण ठरवायला हवेत. जसे फाईल या शब्दाला एक मराठी प्रतिशब्द नक्की करावा व तो प्रत्येक प्रकल्पात- प्रत्येक गटात कायम ठेवावा. या करीता आपल्याला मिलींद यांच्या शब्दसंग्रहाची मदत घेता येईल.


मी खाली काही ग्रुपचे आणि काही संकेतस्थळांचे दुवे देत आहे. तुमची माय मराठीसाठी काही करण्याची इच्छा असेल तर जरूर त्यांना सामील व्हा.


१) मराठीच्या भाषांतरनासोबतच त्याचे प्रमाणिकर्ण करने गरजेचे आहे. अन्यथा प्रत्येकाच्या आवडीने केलेले भाषांतर सामान्य उपयोगकर्त्याच्या अडचणीच केवळ वाढवेल. हे कसे करावे या करीता. एका अंकुर नावाच्या बंगाली ग्रुपचे संकेतस्थळ देत आहे. याचा उल्लेख जागतीक स्तरावर केला जातो. दुवा


२)आताश्या एक लिनक्स चे नवी आवृत्ती आलेली आहे. तीचं नाव उबंटू (उच्चार चुकल्यास सांगणे). या उबंटूचा मराठी भाषांतरणाचा प्रकल्प चालू आहे. तुम्ही त्या प्रकल्पाला सामील होऊ शकता. दुवा

या प्रकल्पातील मराठीची सद्यस्थीती तुम्ही येथे पाहू शकाल. दुवा

२)एक देवनागरी नावाचा ग्रुप खुप आधीपासून या क्षेत्रात आहे. तेथे जरूर जा . दुवा


३)एक नवा चर्चा गट स्थापन झाला आहे. येथील प्रशासक खुप उत्साही आहेत. येथे तुम्ही सामील होऊ शकता . दुवा


4) मराठी मुक्तस्त्रोत ग्रुप याहूवर आहे. दुवा

मुक्त स्त्रोत चालना प्रणाली ही भारतीयांसाठी वरदान ठरेल असं म्हणतात. या क्षेत्रात भाषांतराची खुप गरज आहे. तेथे जरुर मदत करा. असे अनेक ग्रुप सध्या कार्यरत आहेत. आपणास काही माहीती असेल तर ती सुध्दा येथे द्यावी.


नीलकांत.