गांधीजी-आयर्विन/गांधीजी-बिर्ला संवाद

सध्या बरीच चर्चा चाललेली पाहिली.  म्हणून मलाही भाषांतर करण्याची इच्छा झाली.  मूळ चर्चांमधून जे संदर्भ मिळाले त्यातील काही पत्रांची भाषांतरे वाचताना भगतसिंगांच्या फाशीच्या आधी घडलेल्या प्रसंगांचे वर्णन विषयाच्या परिपूर्णतेसाठी करायला पाहिजे असे वाटले म्हणून हा प्रपंच.  यात आधीच्या चर्चेमधील कोणाचीही बाजू घेण्याचा उद्देश नाही.  वाचकांनी स्वतःपुरते ठरवावे. 


संदर्भ : व्हॉइसरॉय (आयर्विन) यांच्याशी बातचितीचा वृत्तांत


व्हॉइसरॉय (आयर्विन) यांच्याशी बातचितीचा वृत्तांत


फेब्रुवारी १७, १९३१


गांधीजी : "व्हॉइसरॉय (आयर्विन) यांनी मला चांगलेच प्रभावित केले.  लॉर्ड रीडींग यांनी जेव्हढे केले साधारण तेवढे, फक्त फरक हाच होता की लॉर्ड रीडींग धूर्त होते आणि त्यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेचा गैरफायदा घेतला.  लॉर्ड आयर्विन माझ्याशी मित्रत्वाने बोलले आणि आधीच भेट न घेतल्याची चूक केल्याचेही त्यांनी मोकळेपणाने मान्य केले.  दुसरीही एक गोष्ट म्हणजे ब्रिटिश जनतेला सर्वाधिक जाग माझ्या चळवळीमुळे आल्याचेही त्यांनी मान्य केले.  त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीमुळे लक्षात येते की त्यांना शांतता प्रस्थापित करायची आहे.  (हा) लढा त्यांच्यासाठी हृदयस्पर्शी ठरला आहे म्हणून त्यांना शांतता हवी आहे.  त्यांना वाटते आहे की असा लढा अजून किती काळ ते चालू देऊ शकणार आणि म्हणून आता त्यांच्यापुढे (ब्रिटिशांपुढे) बंदूक वापरणे हा एकच पर्याय उरणार आहे असे त्यांना वाटते आहे. 


मी ठरावाबद्दल बोललो. " ..(यानंतर गांधीजी आणि आयर्विन यांत अजून चर्चा झाली).. (यानंतर फेब्रुवारी १८, १९३१ ला ते व्हॉइसरॉय आयर्विन यांना भेटून आले.  १८ तारखेच्या संध्याकाळच्या गप्पांत बापू त्या चर्चेबद्दल म्हणाले - )


बिर्ला यांनी विचारले :-" आजच्या चर्चेत काही निराशा पदरी पडली असे वाटते का? "


त्यावर गांधीजी म्हणाले: "नाही,  ते (आयर्विन) आधीप्रमाणेच गोड बोलले.   आमच्यात काही तिखट संवादही घडले, पण ते जास्त नाहीत.  एक दोन साध्या गोष्टी घडल्या ज्या कोणाला फारश्या सांगण्यासारख्या नाहीत, पण त्यावरून चर्चा किती मोकळेपणे घडली ते कळेल म्हणून सांगतो.  एकदा ते म्हणाले की त्यांचे एक स्वप्न आहे की मला इंग्लंडला घेऊन जायचे आणि सर्व पार्टींच्या लोकांशी ओळख करून द्यायची.  त्यांनी एकदा मला सविनय कायदेभंगाची चळवळ विसरायला, त्यांच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवायला आणि त्याप्रमाणे वागायलाही  सांगितले.    नंतर मी जेव्हा त्यांच्या बाथरूमकडे जात होतो तेव्हा माझ्याबरोबर आले आणि म्हणाले " सांगा, तुम्हाला तुमच्या आश्रमात अटक केली नाही हे मी चांगले केले की नाही?"  मी म्हणालो, " हे कशावरून ठरवायचे?  हजारोंचा समुदाय आश्रमात जमला होता, मी ऐकले की कोणी खास आले आहे, आणि १२ वाजता मला अटक होईल.  आणि मग मी शांतपणे झोपी गेलो."  यावर ते मनापासून हसले. मी म्हणालो की "अनेक मित्र म्हणाले, की हा मिठाचा सत्याग्रह लवकरच बंद पडेल, महात्मा गांधींना २० दिवसात कंटाळा येईल, आणि सरकार सत्याग्रहाची दखलही घेणार नाही.  पण कोणाला माहीत होते की काय काय होणार आहे?"  व्हॉइसरॉय म्हणाले " तुम्ही मिठाच्या प्रश्नाभोवती चांगला व्यूह रचला आहेत."  हे दोन किस्से काही सगळीकडे सांगण्यासारखे नाहीत.  आता तिसरा.  मी भगत सिंग बद्दल बोललो.  मी त्यांना (आयर्विन यांना) म्हटले," ह्याचा आपल्या चर्चेशी काही संबंध नाही, आणि मी हे बोलणे कदाचित योग्य नसेलही.  पण सध्याचे वातावरण जास्त सुखकर करायचे असले तर तुम्ही भगत सिंगना फाशी देणे लांबणीवर टाकले पाहिजे.  व्हॉइसरॉयना हे खूप आवडले.  ते म्हणाले, "तुम्ही ही गोष्ट अश्या पद्धतीने मला सांगितलीत याबद्दल मी तुमचा खूपच आभारी आहे.  फाशीच्या शिक्षा सोडून  इतर शिक्षा देणे कठीण आहे, पण ती लांबणीवर टाकणे ह्याचा विचार करता येऊ शकतो. "


मी भगतसिंग बद्दल म्हटले, " तो नि:संशयपणे एक शूर माणूस आहे, पण तरी म्हणेन की त्याची मनस्थिती ठीक नाही.   परंतु फाशीच्या शिक्षेचा हाच तोटा आहे की अश्या माणसाला स्वत:ला बदलण्याची संधीच मिळत नाही.  मानवतेच्या विचारातून मी हा मुद्दा तुमच्यापुढे ठेवत आहे आणि देशात गरज नसताना खळबळ माजू नये म्हणून त्यांची (भगतसिंग यांची) शिक्षा लांबणीवर टाकली पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो.  मी स्वत: त्यांना सोडून दिले असते -पण कोणत्याही सरकारने असे करावे ह्याची अपेक्षा मी करणार नाही.  तुम्ही या विषयावर मला काहीही उत्तर दिले नाही तरी मला वाईट वाटणार नाही." 


(यानंतर त्यांचे इतर कामाविषयी बोलणे झाले).