जपानवरील अणूहल्ल्यांची कारण मिमांसा

जपानवरील अणुहल्ले


या घटनेनंतर ६० वर्षाने तटस्थपणे बघण्याची आणि योग्य विश्लेषण करण्याची भूमिका घेतली पाहिजे.  खालील घटना(क्रम) लक्षात घेतल्या पाहिजेत.


दुसऱ्या महायुद्धात पश्चिम आघाडी (जर्मनी आणि अनुयायी) ७ मे १९४५ ला जर्मनीच्या बिनशर्त आणि संपूर्ण शरणागतीने संपली.  या आघाडीवर मुख्य ब्रिटन आणि अमेरिका होते.  फ्रान्स त्यावेळेला जर्मन आधिपत्याखाली आले होते त्यामुळे त्यांचे भूमिगत सैन्य प्रामुख्याने मातृभूमीची मुक्तता करण्यात अडकले होते.  या महायुद्धात सोव्हिएत युनियन -त्यांच्याविरुद्ध जर्मनांनी हल्ला/आक्रमण केले म्हणूनच- उतरले.  या युद्धाचा फायदा घेऊन पूर्व युरोपमध्ये त्यांना आपले वर्चस्व स्थापण्यास मोठी मदत झाली.  तोपर्यंत त्यांनी जपान विरूद्ध युद्ध सुद्धा पुकारले नव्हते.  यावेळेस चीन ही नगण्य सत्ता होती.


पूर्वेमध्ये जपानविरूद्ध लढण्याचा बहुतांश भार अमेरिकेवरच होता.  या पार्श्वभूमीवरून या घटना तपासणे महत्त्वाचे आहे.



  • ७ डिसेंबर १९४१ - पर्ल हार्बर या अमेरिकन नौ-तळावर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेने अधिकृत रितीने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला.  तोपर्यंत अमेरिका फक्त शस्त्रास्त्रांची आणि इतर पदार्थांची मदत मित्रसैन्याला (अलाईज) करीत होती.

  • २० जानेवारी १९४५ - जपानी सम्राट हिरोहितो याने युद्धाच्या अंतीम टप्प्यासाठी अमेरिकन सैन्याचा हल्ला होईल तेव्हा जपानी सैनिक आणि नागरिक शरण न जाता मरेपर्यंत लढत राहतील अशा स्वरूपाचा "केत्सु-गो" हा कार्यक्रम जाहीर केला.

  • फेब्रुवारी पहिला आठवडा - सम्राटाने ७ भूतपूर्व पंतप्रधानांशी चर्चा केली आणि त्य कार्यक्रमाला एक सोडून सर्वांनी संमति दर्शविली. 

  • १९ फेब्रुवारी १९४५ - अमेरिकन सैन्याने जपानच्या "इवोजिमा" या बेटावर कडव्या प्रतिकारानंतर आणि खूप सैनिक धारातीर्थी पडल्यावर ताबा मिळवला.  ७५,००० अमेरिकन सैन्यातील ७,००० मृत्यू, २४००० जखमी. २१,००० जपानी सैनिकातले जेमेतेम १००० पकडले गेले म्हणजे २०,००० जपानी सैनिक मारले गेले.

  • मार्च १९४५ - टोकियोवर अग्निवर्षवात ८३,००० जपानी नागरीक मृत्युमुखी.

  • १ एप्रिल १९४५ ते २२ जून १९४५ - अमेरिकेची "ओकिनावा" बेट सर करण्याची प्रखर मोहिम.  यात अमेरिकेचे १२,००० सैनिक मृत्यू आणि ३६,००० जखमी.  जपानी सर्व ७०,००० सैनिक आणि बेटावरील १००,००० ते १५०,००० नागरिक बळी पडले.

  • एप्रिल १९४५ - यूरोपातले मुख्य युद्ध संपले.

  • १२ एप्रिल १९४५ - १३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि एकमेकाद्वितीय कारकीर्दीनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट याचे निधन आणि उपाध्यक्ष हॅरी ट्रूमन याचे सत्ताग्रहण.  ( फक्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकेल या पायंड्याला महायुद्धामुळे अपवाद म्हणून रूझवेल्ट हा एकच राष्ट्राध्यक्ष चार वेळा सत्तेवर होता.)

  • ७ मे १९४५ - जर्मनीची संपूर्ण शरणागति.  एकाच वेळेला फ्रान्समध्ये ज. आयसेनहॉवर आणि बर्लिनमध्ये रशियन सेनानीसमोर जर्मनीने पूर्ण शरणागति दिल्यावर यूरोपातले युद्ध समाप्त झाले.

  • २५ मे १९४५ - अमेरिकेच्या सेनाप्रमुखांचा जपानच्या मुख्य भूमीवर हल्ला करण्याचा निर्णय झाला.  प्रत्यक्ष हल्ल्याचा दिवस १ नोव्हेंबर १९४५ मुक्रर करण्यात आला.

  • ८ जून १९४५ - टोकियोमध्ये राज्यसभा (इंपिरियल कॉन्फरन्स) भरवीन मरेपर्यंत लढण्याचा जपानीराज्याचा निर्णय.

  • २२ जून १९४५ - ओकिनावाच्या पाडावानंतर सम्राट हिरोहितो राजनैतिक मार्गे युद्ध संपविण्यास तयार होतो, आणि सोव्हिएत युलियनला मधस्ति करण्याची विनंति करतो.

  • १६ जुलै १९४५ - अमेरिकन सैन्यदलातर्फे जगातील पहिला यशस्वी अणूस्फोट तिथल्या न्यू मेक्सिको या राज्यात केला गेला.

  • २५ जुलै १९४५ - युद्धात अणूस्फोट करण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची मंजुरी दिली गेली.

  • २६ जुलै १९४५ - सर्व मित्रराष्ट्रांनी (अलाईज) पॉट्सडॅम डिक्लरेशनतर्फे जपानला बिनशर्त शरण येण्याची मागणी केली.  जपानने ती धुडकावून लावली.

  • ६ ऑगस्ट १९४५ - हिरोशिमावर पहिला अणूहल्ला केला.  यात २००,००० जपानी मृत्यूमुखी पडले.*

  • ८ ऑगस्ट १९४५ - रशिया जपानविरुद्ध युद्ध जाहीर करून मांचुरियावर चढाई सुरुवात करतो.

  • ९ ऑगस्ट १९४५ - अमेरिकेचा दुसरा अणुहल्ला नागासाकी या शहरावर होऊन त्यात १२०,००० नागरिक मृत्यू.*

  • १० ऑगस्ट १९४५ - जपान काही अटींवर युद्ध थांबविण्यास तयारी दर्शवितो.

  • १४ ऑगस्ट १९४५ - जपान बिनशर्त शरणागतीस तयार नाही हे समजून तिसरा अणूहल्ला टोकियोवर करण्याचा मनसुबा ट्रूमन करतो.  त्याच वेळी ७०० विमानांनी ४,००० टन दारूगोळ्याचा जपानवर वर्षाव केला जातो.

  • १५ ऑगस्ट १९४५ - प्रत्यक्ष "शरण आलो" असे न सांगता सम्राट हिरोहितो जपानी नागरिकांना युद्ध हरल्याचे सांगतो.  (capituation याचा अर्थ बघा)

  • १७ ऑगस्ट - जपान बाहेर लढणारे सैनिक आणि अधिकारी राजाज्ञा न मानता युद्ध चालूच ठेवतात, म्हणुन हिरोहितो त्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास पुन्हा सांगतो.

  • २ सप्टेंबर १९४५ -  USS Missouri या अमेरिकन युद्धनौकेवर ज. मॅकार्थर जपानी सेनान्यांकडून शरणागति स्वीकारतो.

  • ३ सप्टेंबर १९४३ - जपानी सैन्य पूर्णपणे शस्त्रास्त्रे खाली ठेवते.


 या नुसत्या घटना आहेत. 


यावर साधक बाधक चर्चा व्हावी हा उद्देश आहे.  त्यात राजकीय, सामाजिक, तात्त्विक मते यावीत.  तसेच ६० वर्शाने या घटनेचे जगावर कसे परिणाम झाले हे बघावे.  भारताला यापासून काय शिकता आले/येईल हे पण आपण मांडू या.


कळावे,
परभारतीय