सुसंबद्ध आणि सार्वजनिक स्वरूपाचे लेखन

आंतरजालावर अनेक संकेतस्थळांवर सदस्यांना आपापसात ओळख, मैत्री, संबंध, संभाषण इत्यादींसाठी सुविधा पुरवून आकर्षित केलेले असते.

मनोगताच्या मुख्य आवारात कोणाही त्रयस्थ व्यक्तीला सार्वजनिकरीत्या व्यक्तिनिरपेक्षरीत्या विनासायास आस्वाद घेता येईल असे लेखन होणे अपेक्षित आहे. असे लेखन वाचून सदस्य आणि सदस्येतर पाहुणे त्याचा आस्वाद घेऊ शकतात. सदस्य त्यावर प्रतिसाद लिहू शकतात.

इथल्या लेखनाचा आस्वाद घेताना, प्रतिसाद देताना, चर्चांमध्ये भाग घेताना किंवा इतर सदस्यांनी दिलेले प्रतिसाद समजून घेताना सादर केलेला मूळ लेख किंवा त्याखाली लगोलग येणारे प्रतिसाद ह्यांशिवाय इतर व्यक्तिगत माहितीचा किंवा पूर्वघटनांचा/लेखनाचा संदर्भ माहित असणे किंवा शोधणे अपेक्षित नसावे आणि अशा संदर्भांकडे त्याला आकर्षित केले जाऊ नये असे वाटते. लेखकाच्या किंवा त्याने/तिने संदर्भिलेल्या/संबोधलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्याची माहिती, संदर्भ, त्यांनी इतरत्र (प्रस्तुत विषयाशी असंलग्न किंवा असंबद्ध) केलेले लेख किंवा प्रतिसादाच्या स्वरूपातील लेखन हे माहित असल्याशिवाय, जाणून घेतल्याशिवाय किंवा त्यात स्वारस्य असल्याशिवाय त्या लेखनाच्या संदर्भाचे /अर्थाचे आकलन होणे अशक्य किंवा कठीण आहे, असे होऊ नये.

सार्वजनिक सभा/संमेलनाच्या ठिकाणी अपेक्षित धरलेली सभ्यता आणि सौम्यता नसलेले लेखन त्याचा आनंद घेण्यापासून ज्याप्रमाणे पुष्कळांना वंचित करते त्याचप्रमाणे लेखकाच्या किंवा संदर्भित व्यक्तींच्या तपशीलाचा वारंवार होणारा वापर, त्यांच्या मैत्री, वैमनस्य इत्यादी व्यक्तिगत संबंधांचे होणारे प्रदर्शन, खासगी भेटीगाठींचे संदर्भ, त्यांनी इतर संदर्भात केलेल्या बरोबर किंवा चुकीच्या लेखनाचा, प्रतिसादाचा येथे असंबद्ध किंवा अतिदूरान्वयाने संबद्ध वापर हा देखील त्रयस्थ व्यक्तीस तितकाच तापदायक ठरतो. त्याचा तिला लवकरच उबग येऊ लागतो. आस्वादात असा वारंवार येणारा व्यत्यय कालांतराने अशा वाचकाला वाचनापासून परावृत्त करण्याची भीती असते. अशा संकेतस्थळाचे रूप लवकरच 'केवळ ओळखीच्या लोकांना भेटायची/आपापल्या लोकांशी बोलायची जागा' असे होऊ लागते.

बहुसंख्य सदस्यांना हे वेगळे सांगावे लागत नाही हे मुद्दाम लिहिले पाहिजे. व्यक्तिगत रोख असलेल्या आणि विषयांतर वाटणाऱ्या मजकुराला प्रतिसाद न देण्याचे अतिशय योग्य पाऊल पुष्कळ सदस्य उचलतात. सदस्यांच्या सहकार्यामुळे मनोगतावरील लेखनाचे हे सार्वजनिक आणि सुसंबद्ध स्वरूप सुरवातीपासून टिकलेले आहे. प्रशासनाने ह्या दिशेने काही दक्षतेच्या उपाययोजना कराव्या ह्यासाठी सदस्यांकडून पूर्वीपासून सुचवणी/प्रोत्साहन आलेले आहे. तरीही अपवादात्मक परिस्थितीत असे प्रसंग टाळण्यासाठी असे वारंवार होणारे व्यक्तिगत संदर्भाचे आणि संबोधनांचे लेखन (सभ्यता आणि सौम्यता नसणाऱ्या लेखनाप्रमाणेच) काढून टाकावे लागते किंवा त्यात बदल करावा लागतो. मनोगताचे प्रशासन करताना प्रशासनास उपलब्ध वेळापैकी संकेतस्थळाची घडण,  विकास ह्याला जास्तीत जास्त वेळ देऊन इतर प्रशासकीय बाबींना कमीत कमी (प्रसंगी शून्यवत) वेळ देण्याचे धोरण ठरवलेले आहे. असे संपादनाचे प्रसंग तुलनेने अत्यल्प असून ह्यातल्याही पुष्कळ वेळा आपल्या लेखनाचे असे होणारे संपादन पाहून सदस्यांनी आपल्या शैलीत स्वागतार्ह बदल आपणहोऊन केलेले आहेतच.

जर एखाद्या सदस्याचे असे लेखन वारंवार काढून टाकावे लागले किंवा संपादित केले जाऊनही योग्य तो बोध घेऊन लेखनपद्धतीत बदल करण्यात असमर्थता दिसली तर अशा सदस्याचे लेखन प्रकाशनपूर्व परीक्षणासाठी ठेवून घेण्याचा उपाय केला जातो. ह्या धोरणाचाही अनेक सदस्यांना फायदा झालेला आहे.

ह्या धोरणात व/वा त्याच्या अवलंबात प्रसंगानुरूप बदल, अपवाद करण्याचे तारतम्य, क्षमता आणि अधिकार हे सर्व प्रशासनाकडे आहेच. मनोगतावरील लेखनाचे सार्वजनिक आणि सुसंबद्ध स्वरूप टिकवण्याचा प्रशासनाचा उद्देश ह्याद्वारे स्पष्ट होईल अशी आशा आहे.