गर्व होता ताठा

कित्येक विद्वान वर्षानुवर्षे संतसाहित्य विषयाचा सखोल अभ्यास करत आहेत. तसे पाहता हा काही माझा विषय नव्हे. पण तरीही एक प्रयत्न करीत आहे. या विषयातील घोर अज्ञानामुळे भरपूर चुका असण्याची शक्यता आहे. जाणकारांनी चुका व सुधारणा सुचवाव्या तसेच यात भरही घालावी. 

संतसाहित्यात मानवाच्या गुण-दुर्गुणांवर बरेच भाष्य केलेले दिसून येते. संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास इत्यादींनी आपल्या काव्यात सर्वसामान्यांत दिसणाऱ्या उणीवांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. तसेच कसे वागले पाहिजे याचीही शिकवण त्यात दिसून येते.


तर मंडळी या संतांनी माणसाला सुधारण्याचे अनेक प्रयत्न केले. माणसातला सर्वात मोठा दुर्गुण कुठला असेल तर तो 'अहंकार' ! अहंकार गळून पडल्याखेरीज बाकीचे दुर्गुण जाणार नाहीत. तसेच 'अहंकार' काठोकाठ भरला असल्याने एखाद्यातील सद्गुणांनाही काडीची किंमत उरत नाही. आत हेच पहा तुकाराम महाराज काय म्हणतात,

दुधाचे घागरी मद्याचा हा बिंदू । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥
तैसे खळामुखें न करावे श्रवण । अहंकारे मन विटाळले ॥
काय करावी ती बत्तीस लक्षणे । नाक नाही तेणे वाया गेले ॥
तुका म्हणे अन्न जिरो नेदी मासी । आपुलिया जैसी सवसंगे ॥

अहो आमच्या गायी, म्हशी सह्याद्रीच्या अनेकविध औषधी झाडे-झुडपे, गवत,पाला असलेल्या जंगलात चरायला जातात. नुकतेच कासंडीभर दूध काढले आहे वरून पाण्याचा एकही थेंब घातलेला नाही, जंगलात चरणाऱ्या गायीच्या दुधाची गोडी काय विचारता ? शुद्ध फेसाळ मधुर दूध, जणू अमृतच ! शुद्ध म्हणून लोक दूरवरून आमच्या गायीचे दूध विकत घ्यायला येतात. पण आमच्या गवळ्याच्या हातून त्यात मद्याचा एक थेंब पडला. दूध फेसाळ, मधुर आहे पण आता कसले राहिले आहे शुद्ध !


मी गायन, वादन, लेखन, वक्तृत्व इत्यादी सर्व कला-गुणांत पारंगत आहे पण त्यापायी माझ्यात अहंकार शिगोशीग भरला आहे आणि दुसऱ्या कुणाला मी कायमच तुच्छ लेखते. 'मी'च श्रेष्ठ असल्याने माझीच सर्व ठिकाणी सत्ता असावी असे मला वाटते. 'मी म्हणेन ती पूर्व दिशा' ! लोकांच्या तोंडी सदा माझेच नाव असावे असे जर मला वाटत असेल तर, जरी माझा माझ्या गळ्यातून दैवी सुर बाहेर पडत असतील, माझ्या हाताचा स्पर्श होताच वाद्यातून मधुर सुर निघत असतील, माझे लेखन वाचताना वाचक मंत्रमुग्ध होत असेल आणि माझ्या वाणीत साक्षात सरस्वती वसली असली तरी एका अहंकारापायी माझे कलागुण मातीमोल ठरतात ! 


समर्थ रामदास यावर म्हणतात, 


अहंतागुणे सर्वही दुःख होते । मुखे बोलिले ज्ञान जे व्यर्थ जाते ।
सुखी राहता सर्वही सुख आहे । अहंता तुझी तूच शोधून पाहे ॥


अहंतागुणे नीति सांडी विवेकी । अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ।
परी अंतरी सर्वही साक्ष येते । प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते ॥


एकदा अहंकार आपल्या मनात शिरला की त्यापाठोपाठ अनेक दुर्गुणही आपल्या नकळत आपल्या मनात प्रवेश करतात. इतरांची चेष्टा करणे, नावे ठेवणे, अगदी क्षुल्लक गोष्टींचे भांडवल करणे, आक्रस्ताळेपणा, आदळ-आपट, धुसफूस, मी म्हणतो तसे झाले पाहिजे, सतत कुठल्या ना कुठल्या बाबतीवरून वादवितंड करणे, मुद्दाम दुसऱ्याची कुरापत काढणे  ही अशा लोकांची लक्षणे.


आपल्याची गोही देऊ नये । आपली कीर्ती वर्णू नये । आपले आपण हासू नये । गोष्टी सांगोनि ॥
मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर । मी सकळांमधे थोर । म्हणे तो रजोगुण ॥
टवाळी ढवाळी निंदा । सांगणे घडे वेवादा । हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगुण ॥
भांडण लावून द्यावे । स्वयें कौतुक पहावे । कुबुद्धि घेतली जीवे । तो तमोगुण ॥
आपलेन ज्ञातेपणे । सकळांस शब्द ठेवणे । प्राणीमात्राचे पाहे उणे । तो येक पढतमुर्ख ॥


हे लोक मारे एखाद्या थोर व्यक्तीचे गुण गातात, इतकी मोठी व्यक्ती कशी विनम्र, विनयशील याची रसभरित वर्णन करतात पण 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण' अशी यांची अवस्था असते.


तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । विवेके अहंभाव याते जिणावे
अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥


नको रे मना वाद हा खेदकारी । नको रे मना भेद नाना विकारी ।
नकोरे मना शिकवू पुढिलांसि । अहंभाव जो राहिला तुजपासि॥


'असतील शिते तर जमतील भुते' या न्यायाला अनुसरून अनेक मतलबी लोक अशा लोकांच्या मागे लागतात. जागोजागी त्यांचा अहंकार कुरवाळत बसतात. अहो, आपल्याला चांगले म्हटलेले कोणाला आवडणार नाही ? मग 'मी', 'माझे', 'मला' ही भावना वाढीस लागते. पण केवळ स्वार्थासाठी, प्रसिद्धीच्या लालसेपायी स्तुती करणाऱ्या 'भाट' लोकांपायी आपण स्वतःचेच नुकसान करून घेत आहोत हे 'अहंकारी' लोकांच्या लक्षात येत नाही. मग अशावेळी एखाद्याने त्यांचे 'कौतुक न करणे' किंवा त्यांना 'विरोध करणे' हे त्यांना 'अपमानास्पद' वाटते. जणू काही आपल्या एकसंध वर्चस्वालाच कोणीतरी आव्हान दिले आहे असे यांना वाटू लागते. आणि मग कसलाही मागचा पुढचा विचार न करता वरकरणी विरोधक वाटणाऱ्यांना ठेचून काढणे, टोचून मारणे हेच या 'अहंकारी' लोकांचे ध्येय बनते.


क्रोधे अपमाने कुबुद्धि । आपणास आपण वधी ।
जयास नाही दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥


मंडळी हा 'अहंकार' आहे खरा कर्करोगासारखा. कधी नजर चुकवून शरीरात प्रवेश करेल आणि एखाद्या सुदृढ मल्लालाही ग्रासेल सांगता येत नाही. हा कर्क हळूहळू आपल्या मनावर ताबा मिळवत जातो आणि शेवटच्या घडीपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. तोपर्यंत या कर्कावर विजय मिळविणे अशक्यप्राय होऊन बसते. सदाचार आपण पूर्वीच सोडले असल्याने कर्काशी लढा देण्याची ताकदही उरत नाही. अशा वेळी एकही 'भाट' त्यांना सहानुभूती दाखविण्यापुरताही येत नाही.


ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला । कुसंगे नासला तैसा साधू ॥
विषाने पक्वान्ने गोड-कडू झाली । कुसंगाने केली तैसी परी ॥
भावे तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंगा हा फेरा चौऱ्यायंशीचा ॥


आता मंडळी अपचन झाले तर आपल्याला आपल्या आहारात बदल करणे भाग पडते की नाही ? मला सांगा अपचन झाले असता आपण मऊ भात खाल की मसालेदार, चटकदार, केवळ जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ खाल ?? अहो स्थळ, वेळ-काळ, प्रकृती न पाहता तुम्ही नको ते चरत राहिलात तर तुम्हाला कोण मूर्ख म्हणणार नाही ??  टवाळ लोक हसतात म्हणून आपण औषध घेणे थांबविणार आहोत का ? हसतील; हसू देत बापडे, काय लहान बाळासारखा वरणभात खातो असे टोमणे मारतील; मारू देत बापडे ! आपण ती घाण आपल्या अंगास का लावून घ्या ?


समर्थ रामदास म्हणतात,


औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा ।
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥


अहंकार कोणात नसतो ? तुमच्यात असतो, आमच्यात असतो पण काही जणांना तर आपल्याला 'ग' ची बाधा झाली आहे हेच लक्षात येत नाही किंवा निदान तसे मानण्याचे तरी टाळतात.


आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ।
रोग्या विष-तुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाही ।
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ।


अहंकाराच्या एव्हढ्या मोठ्या रोगाशी झुंज देण्यासाठी आपल्याला किती पथ्यपाणी करावे लागेल ?  इतरांनी आपल्या मताचा आदर करावा असे वाटत असेल तर आपणही इतरांच्या मताचा आदर करणे शिकले पाहिजे. आपल्यात अहंकार वाढीस लागू नये म्हणून आपणच जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेव्हा मंडळी 'अहंकार नाश ओढवतो' आणि 'अहंकाराला आमंत्रण देणारे यश ही अफूची गोळी आहे' हे लक्षात ठेवा. लोकहो, आपण ज्यांचे अभंग गातो अशा थोर संतांच्या काव्यातून आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे. तेव्हा नुसते टाळ कुटू नका किंवा नुसत्या तानाही मारू नका, तर संतांची शिकवण लक्षात घ्या आणि त्यानुसार कर्म करा !


जय जय रघुवीर समर्थ ।


बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ।
श्री ज्ञानदेव तुकाराम । पंढरीनाथ महाराज की जय !